You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बजेट 2021 : काय स्वस्त झालं? काय महाग झालं?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2021-22 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सामान्यांना पडणारा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या खिशावर किती भार पडणार? कोणत्या वस्तू महाग होतील आणि कोणत्या स्वस्त होणार आहेत?
निर्मला सीतारमन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत आणि कोणत्या स्वस्त हे पाहूया.
काय महागलं?
- मोबाइलच्या सुट्ट्या भागांवर 0 टक्के कस्टम ड्युटी होती ती आता 2.5 टक्के वाढवण्यात आल्याने मोबाईल फोन महागण्याची चिन्हं आहेत.
- केवळ मोबाईल नाही, तर मोबाईलचे चार्जर त्याचप्रमाणे हेडफोनही महाग होऊ शकतात.
- पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू करण्यात आला आहे. पेट्रोलवर अडीच तर डिझेलवर चार रुपयांचा अधिभार लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकतं.
- निर्मला सीतारमन यांनी दारूशी संबंधित पेय पदार्थांवरील अधिभार वाढविल्यामुळे मद्याच्या किंमतीही वाढतील.
- निवडक ऑटो पार्ट्सवरची ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीतही वाढ होऊ शकते.
- सोलर इन्व्हर्टरवरची ड्यूटी वाढवून 20 टक्के करण्यात आली आहे.
- कापसावरील कस्टम ड्युटी वाढवून दहा टक्के करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परदेशातून आयात होणारे कपडेही महाग होतील.
- कच्चं रेशीम आणि रेशमाच्या धाग्यांवरील सीमाशुल्क कर 15 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या गोष्टीही महागतील.
काय स्वस्त होणार?
- सोनं आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करून 12.5 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे सोनं-चांदी स्वस्त होऊ शकते.
- लेदरच्या वस्तूही स्वस्त होऊ शकतात.
- स्टील उत्पादनांवरची कस्टम ड्युटी घटवून 7.5 टक्क्यांवर आणण्यात आली आहे. तांब्यावरची ड्युटी कमी करून 2.5 टक्क्यांवर करण्यात आली आहे. त्यामुळे स्टील आणि तांब्याची उत्पादनं स्वस्त होतील.
- नायलॉन चिप, नायलॉन फायबरवरची बीसीडी घटून 5 टक्के करण्यात आली आहे.
- टनेल बोअरिंग मशीनवरची सूट रद्द करण्यात आली आहे. एमएसएमईला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)