You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: लसीकरणासाठी नकार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं केलं जाणार समुपदेशन
राज्यात कोरोना लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह राज्यात बुधवारी 68 टक्के लसीकरण झालं. शनिवारी 16 जानेवारीला राज्यात लसीकरण मोहीम सुरू झाली होती.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात लसीकरणाचा टक्का कमी आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात लशीबाबत असलेली भीती आणि शंका. राज्यातील अनेक केंद्रांवर नावनोंदणी असूनही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिला.
लसीकरणासाठी नकार देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं समुपदेशन करण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे.
लसीकरणाची टक्केवारी
- शनिवार- 64
- मंगळवार- 52
- बुधवार- 68
बुधवारी राज्यात 18,166 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. आत्तापर्यंत 51,660 आरोग्य कोव्हिड योद्ध्यांनी लस घेतली आहे.
लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमी उपस्थितीबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 'लसीकरणासाठी सर्वांनी प्रतिसाद द्यावा. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पहावं. लशीला घाबरण्याचं कारण नाही. लोकांनी मनातील शंका काढून टाकावी.'
'कोविन अप अजूनही स्लो आहे. यात तांत्रिक बिघाड अजूनही पहायला मिळतोय. यामुळे आरोग्य कर्मचारी गोंधळून जात आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात शंका आहे. इतरांना घेऊ दे मग मी घेतो अशी काहींची मनस्थिती आहे. अशा आरोग्य कर्मचाऱ्यांचं समुपदेशन केलं जाईल.' असं आरोग्यमंत्री पुढे म्हणाले.
दुसरीकडे मुंबईत बुधवारी 1728 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मंगळवारच्या तुलनेत यात 200 आरोग्य कर्मचाऱ्यांची भर पडली.
मुंबईतील लसीकरणाबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, 'ज्या रुग्णालयात आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. त्याचं लिंकिंग लसीकरण केंद्रावर करण्यात आलंय. आरोग्य कर्मचाऱ्यांना मेसेज किंवा फोन आला नाही तरी, त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन विचारणा करावी. जागा उपलब्ध असेल तर त्यांना लस दिली जाईल.'
'सुरूवातीला अपेक्षेप्रमाणे कमी लसीकरण होईल असं वाटत होतं. लोकांमध्ये उत्सुकता आहे. काहींना माहिती मिळणं आवश्यक वाटत आहे. पण, एका आठवड्यानंतर आरोग्य कर्मचारी स्वत:हून पुढे येतील आणि लसीकरणाची टक्केवारी वाढेल,' असं ते पुढे म्हणाले.
राज्यातील अनेक केंद्रांवर लशीबाबत भीती आणि शंका यामुळे आरोग्य कर्मचारी पुढे येत नाहीयेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेट-अन्ड-वॉचची भूमिका घेतली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)