कोरोना लस : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात

आजपासून (16 जानेवारी) कोरना लसीकरण मोहिमेला भारतात सुरुवात होतेय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलं.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील कोरोना लसीकरण केंद्रांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

नरेंद्र मोदी म्हणाले, "सगळेजण कोरोनाच्या लशीबद्दल विचारत होते. आता लस उपलब्ध झालीय. या क्षणी देशातील सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो."

जगातल्या इतर लशींच्या तुलनेत भारतातील लस सर्वात स्वस्त असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • कोरोनाविरोधातील आपली लढाई आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेची होती
  • भारतात बनलेल्या लशी संपूर्ण जगात विश्वसनीय आहेत
  • दुसऱ्या टप्प्यात आपल्याला कोरोनाची लस 30 कोटी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे
  • कोरोना लशीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे
  • इतिहासात अशा प्रकारची सर्वात मोठी लसीकरण मोहीम कधीच झालं नाहीय
  • लस घेतल्यानंतरही सावध राहणं आवश्यक आहे, मास्क लावणं, अंतर पाळणं गरजेचं आहे
  • कोरोना काळात टाळ्या-थाळ्या वाजवून, दिवे लावून देशाचा आत्मविश्वास वाढवला
  • भारताने 24 तास सतर्क राहून प्रत्येक घटनाक्रमावर लक्ष ठेवलं आणि वेळेत उपाययोजना केल्या
  • 30 जानेवारी 2020 रोजी पहिला रुग्ण सापडला, आठवड्याभरात उच्चस्तरीय समिती बनवली होती
  • भारताने देशवासियांसह इतर देशातील नागरिकांनाही मदत केली
  • भारताने बनवलेल्या लशीकडे इतर देश आशेनं पाहतायेत
  • जगातील अनेक देशांना भारताच्या अनुभवाचा लाभ होईल
  • भारताचे प्रयत्न संपूर्ण मानवतेसाठी उपयोगी येईल
  • प्रत्येत जीवाला वाचवण्यासाठी योगदान देण्याची संधी भारताला मिळाली
  • 'दवाई भी, कडाई भी' ही नवी आपली घोषणा असायला हवी
  • शास्त्रज्ज्ञ, संशोधक, वैद्यकीय कर्मचारी या सगळ्यांचे आभार मानतो

महाराष्ट्रात 285 लसीकरण केंद्रं

महाराष्ट्रातील लसीकरणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोव्हिड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.

महाराष्ट्रातही कोरोना लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झालीय. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महाराष्ट्रात 285 लसीकरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे 28 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलंय.

ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना काल सायंकाळपर्यंत मेसेज पाठविण्याचे काम सुरू होते. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला किती वाजता, कोणत्या केंद्रावर, कुठल्या कंपनीची लस दिली जाणार याची माहिती देण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

एका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी 5 जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

लसीकरणाची सुरुवात होताना देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील कूपर हॉस्पिटल, मुंबई आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच माहिती घेतील. या दोन्ही ठिकाणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगची यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

महाराष्ट्राला कोव्हिशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस आणि कोव्हॅक्सिन लशीचे 20 हजार डोसेस मिळाले आहेत. ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचवण्यातही आलेत.

कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये (मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर) आणि 2 जिल्हा रुग्णालयांचा (पुणे आणि अमरावती) समावेश आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत लसीकरण केले जाईल.

आरती ओवाळून लशीच्या डब्यांचं स्वागत

मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये आरती ओवाळून आणि टाळ्यांच्या गजरात कोरोना लस घेऊन येणाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. कूपर हॉस्पिटल लसीकरणाचं केंद्र आहे.

औंधमध्ये लसीकरण केंद्रात रांगोळ्या काढल्या

पुण्यातील औंध येतील कोरोना लसीकरण केंद्रात महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रांगोळ्या काढल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)