भंडारा आग : 'माझ्या बाळाच्या शरीराचा कोळसा झाला होता'

    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठी

"डीएनए टेस्टमुळे कळलं की, माझं बाळ कुठलं आहे ते, कारण आगीत माझ्या बाळाच्या शरीराचा पूर्णपणे कोळसा झाला होता."

पोटचा गोळा आगीत गमावलेल्या भंडाऱ्यातल्या योगिता घुळशे यांचं काळीज चिरत जाणारे हे शब्द.

भंडाऱ्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केयर यूनिट (SNCU) मध्ये आग लागली आणि या आगीत 10 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला.

या आगीत योगिता घुळशे यांच्या दोनच दिवसांपूर्वीच जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू झाला.

भंडारा जिल्ह्यातील श्रीनगरसारख्या छोट्याशा गावातील योगिता घुळशे आणि विकेश घुळशे हे रहिवाशी आहेत. दोन दिवसांपूर्वी या दांपत्याला मुलगा झाला.

मुलगा झाल्याचा आनंद साजरा करण्याआधीच त्यांना काळजीनं घेरलं. बाळाचं वजन जन्मत:च अपेक्षित वजनापेक्षा कमी असल्यानं तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं.

आपल्या पोटचा गोळा बरा होईल आणि आपण त्याला अंगाखांद्यावर घेऊ, अशा अपेक्षेनं अतिदक्षता नवजात केयर यूनिटकडे डोळे लावून बसलेल्या योगिता घुळशे आणि विकेश घुळशे यांच्यावर काळानं घाला घातला.

9 जानेवारी 2021 च्या पहाटे रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केयर यूनिटमध्ये आग लागली. या युनिटमध्ये एकूण 17 बाळांना ठेवण्यात आलं होतं. त्यातील 10 जणांचा जीव गेला.

या दुर्दैवी बाळांमध्ये योगिता आणि विकेश या दाम्पत्याचा दोन दिवसांचा मुलगाही होता.

या घटनेतील दहापैकी सात बाळांचा आगीच्या धुरामुळे गुदमरून, तर तीन बाळांचा होरपळून मृत्यू झाला होता. होरपळलेलं बाळ नेमकं कुणाचं, हे कळण्यासाठी डीएनए टेस्ट करण्याची वेळ आली.

योगिता घुळशे सांगतात, "पहाटे दोन वाजता रुग्णालयात मोठा आवाज झाला आणि धुराचे लोट दिसले. तेव्हा कळलं की आग लागलीय. आम्ही वर जाऊन पाहिले तर संपूर्ण वार्ड जळून खाक झाला होता."

"डीएनए टेस्टमुळे कळलं की, माझं बाळ कुठलं आहे ते, कारण आगीत माझ्या बाळाच्या शरीराचा पूर्णपणे कोळसा झाला होता," असं सांगताना योगिता यांचा आवाज थरथरत होता आणि त्यांना रडू कोसळलं.

योगिता आणि विकेश यांनी दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाचं अजून नावही ठेवलं नव्हतं.

या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा हे दाम्पत्य व्यक्त करत आहे.

आरोग्य खाते जबाबदार की बांधकाम खातं, हे आता चौकशी समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल.

महाराष्ट्र सरकारनं घोषणेप्रमाणे योगिता आणि विकेश यांना पाच लाखांचा धनादेश मदतनिधी म्हणून दिला खरा, पण यातली रक्कम काही या दांपत्याचा पोटचा गोळ पुन्हा आणणार नाही आणि दु:खही कमी करणार नाही.

आणि अशाच आणखी नऊ आई आहेत, ज्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)