भंडारा आगः 10 बालकं जिथं होरपळली त्या भंडारा रुग्णालयात आता कशी आहे परिस्थिती?

भंडारा जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती

भंडारा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सात बालकांना वाचवण्यात यश आलं.

भंडाऱ्यातील घटनेबाबत सहवेदना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ही घटना हृदयद्रावक आहे. नवजात अर्भकांचा दुर्देवी मृत्यू होणं क्लेशदायी आहे. बालक गमावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात देशवासीय सहभागी आहेत. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी सदिच्छा असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी भंडाऱ्यातील घटनेबाबत ट्वीट केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या पालकांप्रती त्यांनी सहवेदनाही व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भंडारा घटनेबाबत सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्ध राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला केलं आहे.

भंडारा रुग्णालयातील आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भंडारा घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. "ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असं अजित पवार म्हणाले.

तसंच, अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

"आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भंडारा येथील घटना ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. आगीत दगावलेल्या १० नवजात बालकांच्या परिवाराच्या दु:खाची कल्पनाही करता येत नाही. बातमी ऐकल्यापासून मन सुन्न झालंय. या आगीत जखमी झालेल्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूयात असं महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)