You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भंडारा आग : पीडित कुटुंबाला पंतप्रधान निधीतून 2 लाखांची मदत जाहीर
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे 10 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
शनिवारच्या (9 जानेवारी) मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आगीची घटना घडली. 17 बालकं अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये होती. त्यातील 7 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगीच्या घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी यासंदर्भातील माहिती ट्वीटरवरून दिली आहे.
यापूर्वी "भंडाऱ्यातील घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीची चौकशी पूर्ण झाल्यावर रिपोर्टच्या आधारे दोषींवर कारवाई करू. राज्यातील सर्व रुग्णाललयात फायर ऑडिट, स्ट्रक्टरल ऑडिट केलं जाईल," अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
"भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीच्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल," असंही राजेश टोपे यांनी म्हटलंय.
तर "भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या घटनेची उच्च स्तरीय चौकशी जाहीर करण्यात आली आहे. आगीच्या कारणांची चौकशी तज्ज्ञ मंडळी करत आहे. जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल," असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
"भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील SNCU मध्ये आग लागल्यानं 10 बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजता ही घटना घडली. सात बालकांना वाचवण्यात यश आलंय," अशी माहिती भंडारा जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी दिली.
दरम्यान, या घटनेच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
"मुलांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आग कशामुळे लागली याचं कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत," अशी माहिती भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आलं. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितलं असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले.
त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं.
या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेली 7 बालकं वाचवण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश
भंडारा रुग्णालयातील आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडिट करणार - अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भंडारा घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. "ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असं अजित पवार म्हणाले.
तसंच, अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
"आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
अशा घटना टाळण्यासाठी 'हे' करता येईल
याबाबत बीबीसीशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्टृचे अध्यक्ष डॅा अविनाश भोंडवे सांगतात राज्य सरकारने तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.
- रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांसाठी कडक मापदंड असले पाहिजेत.
- रुग्णालयातील इलेक्ट्रिक सर्किटसंदर्भात वारंवार तपासणी झाली पाहिजे
- इन्क्युबिटरसारख्या उपकरणांमध्ये अचानक बिघाड होण्याची शक्यता असते. यात स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे या उपकरणांची योग्य तपासणी करण्यात आली पाहिजे.
"अनेकवेळा सरकारी रुग्णालयांमध्ये उपकरणांच्या किंमतींवर तडजोड केली जाते. याचा थेट परिणाम अत्याधुनिक उपकरणांच्या दर्जावर फरक पडतो. ही उपकरणं थेट रुग्णांच्या जीवाशी संबंधित असतात. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे" असं डॅा भोंडवे पुढे म्हणाले.
भंडाऱ्यातील घटना हृदयद्रावक - पंतप्रधान मोदी
भंडाऱ्यातील घटनेबाबत सहवेदना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ही घटना हृदयद्रावक आहे.
महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भंडाऱ्यातील घटनेबाबत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी भंडारा घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे.
दोषींवर कारवाई व्हावी - फडणवीस
या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
भंडाऱ्यातील घटना दुर्दैवी - अमित शाह
भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी भंडाऱ्यातील घटनेबाबत ट्वीट केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून, या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या पालकांप्रती त्यांनी सहवेदनाही व्यक्त केल्या आहेत.
राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या सहवेदना
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भंडारा घटनेबाबत सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्ध राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारला केलं आहे.
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भंडारा घटनेत मृत्यमुखी पडलेल्या बालकांना श्रद्धांजली अर्पण केलीय.
डॉक्टरांवर कारवाई करा - नवनीत राणा
"महाराष्ट्रातल्या सगळ्याच सरकारी दवाखान्यांमध्ये वाईट परिस्थिती आहे. गरीब जनतेला तिथं जावं लागतं. आयसीयूमध्ये 10 बाळांचा जीव जातो, तर मला हॉस्पिटल अधिकाऱ्यांना विचारायचं आहे की, आग लागल्यानंतर अलार्म कधी वाजला? यात नेमकी चूक कुणाची आहे. बालकांच्या जीवाशी खेळणं बंद करा. भंडारा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा," अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलीआहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)