औरंगाबाद नामांतर: काँग्रेसचा विरोध असताना शिवसेनेचा हट्ट का?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची शिवसेनेची बर्‍याच वर्षांची मागणी आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली. पण महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेस या नामकरणाला ठामपणे विरोध केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नामकरणाच्या या मुद्यांवरून महाविकास आघाडीमधली ही बिघाडी झालेली बघायला मिळतेय.

6 जानेवारीला औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढावी अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहीलं आहे. पण शहराच्या नामांतरावरून शिवसेना आणि कॉंग्रेस हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

नामांतराच्या मागणीची सुरूवात कुठे झाली?

32 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर करून संभाजीनगर असा उल्लेख केला. 1988 सालची ती घटना आहे. औरंगाबादच्या महापालिका निवडणुकीत तेव्हा शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मैदानावर विजयाची सभा घेतली.

त्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर करून शहराचे नाव संभाजीनगर असेल, अशी घोषणा केली. तेव्हापासून शिवसेनेच्या नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर असा केला जातो.

बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली असली तरी राज्यात कॉंग्रेसचं सरकार असल्यामुळे सरकार दरबारी हे नामकरण झालं नाही.

शिवसेनेचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट सांगतात, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचं नामांतर केले होतं. आता आमचे मुख्यमंत्री आहेत. सरकार दरबारी अधिकृतपणे हे नामांतर केलं जावं हीच आमची आग्रही भूमिका आहे. कॉंग्रेसला आम्ही आमचा मुद्दा पटवून देऊ."

निवडणूक आणि नामांतर..!

औरंगाबादच्या निवडणुकांमध्ये नामांतराचा मुद्दा गेली अनेक वर्षे बघायला मिळतो. 2005 साली राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाले.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत त्यांनी नामांतराचा मुद्दा मांडला. तुम्हाला शहराचं नाव औरंगाबाद पाहीजे की संभाजीनगर असा प्रश्न सभेत जमलेल्या लोकांना विचारला. त्यानंतर हा मुद्दा चर्चेला आला आणि निवडणूकीची हवा पालटल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

2010 च्या महापालिका निवडणुकीत नामकरणाचा हा मुद्दा पुन्हा आणला गेला. महापालिकेत युतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर 2011 ला नामांतराचा प्रस्ताव शिवसेनेने राज्य सरकारकडे पाठवला. पण कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारकडून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला.

2015 ला औरंगाबाद महापालिका निवडणूका होत्या तेव्हा राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं होतं. निवडणुकीच्या प्रचारात नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण त्यावर ठोस निर्णय झाला नाही.

आता 2021 मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. कॉंग्रेसचा शहराच्या शहराच्या नामांतराला पूर्वीपासून विरोध आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत औरंगाबाद विमानतळाला संभाजीराजेंचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहीलं आहे.

याबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, "औरंगाबाद विमानतळाचे नाव बदल्याचा ठराव आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. त्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. पण शहराचे नाव बदलायला आमचा विरोध आहे. जिथे शहरांची नावं बदलली गेली तिथे सामान्य लोकांच्या जीवनात काय फरक पडला आहे? आपण विकासासाठी एकत्र आलो आहोत नामांतरावरून तेढ निर्माण करण्यासाठी नाही".

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराच्या मुद्यावर बोलताना शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले "शिवसेनेला नामांतराच्या मुद्यावर फक्त राजकारण करायचं आहे. तुमचं सरकार आहे. अधिकृतपणे शहराचं नामांतर करा आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना संभाजीनगर अधिकृतपणे लिहायला लावा. तर त्याला अर्थ आहे".

मतांचं राजकारण?

औरंगाबाद महापालिकेत तिसऱ्यांदा शिवसेना सत्तेत आहे. 1988 पासून नामांतराच्या मुद्यावर शिवसेना आग्रही आहे.

औरंगाबादचे जेष्ठ पत्रकार प्रमोद माने सांगतात,"शिवसेना राज्याच्या सत्तेत तीन वेळा निवडून आली आहे. तरीही हे नामांतर झालेलं नाही. इकडच्या स्थानिक लोकांना शहराच्या नामांतरात फारसा रस नाही. याउलट शिवसेना औरंगाबाद महापालिकेत तिसऱ्यांदा सत्तेत असूनही वीज, पाणी आणि रस्ते याच मुद्द्यांवर निवडणूक लढते. औरंगाबाद शहराचा विकास तितकासा केलेला नाही. हिंदू-मुस्लीम मतांतराचा तेढ असल्यामुळे प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा शिवसेना समोर आणते आणि त्याचा फायदाही सेनेला होतो असं बर्‍याच वर्षांपासूनचं चित्र आहे. आताच्या निवडणुकीचं गणितही तेच असू शकतं".

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)