You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : सीरम आणि भारत बायोटेक यांच्यात नेमका का वाद झाला?
नवीन वर्षाची सुरूवात सर्व भारतीयांसाठी दिलासादायक ठरले. कोरोनावरील दोन लशींना भारत सरकारच्या औषध नियंत्रक (DCGI) संस्थेनं आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली.
दोन जानेवारीला देशभरात कोरोना लशीची ड्राय रन झाली. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली.
रविवारी (3 जानेवारी) ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) भारतात दोन कोरोनाविरोधी लशींना मंजुरी दिली.
पण सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे मालक अदर पूनावाला यांच्या एका विधानानं वादाला तोंड फुटलं.
नेमका वाद काय आहे?
एका मुलाखतीत अदर पूनावाला म्हणाले, "फायझर, मॉडर्ना आणि कोव्हिशिल्ड या तीन लशींनीच सर्व शास्त्रीय कसोट्या पार केल्या आहेत. इतर लशी सुरक्षित आहेत - पाण्यासारख्या सुरक्षित. त्यांच्या परिणामांचं अजूनही मूल्यमापन झालं नाहीय."
अदर पूनावाला यांच्या या वक्तव्यानंतर भारत बायटेकच्या 'कोव्हॅक्सीन' या लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं. त्यानंतर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा ईला यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं.
डॉ. कृष्णा ईला म्हणाले, "आम्ही आमच्या वैद्यकीय चाचण्यांबाबत 200 टक्के नम्र आहोत आणि तरीही आम्हाला टीकेचा सामना करावा लागतोय. जर मी चूक असेन, तर मला सांगा. काही कंपन्या आमच्या लशीला 'पाण्यासारखी' म्हणत आहेत. मी हे फेटाळतोय. आम्ही शास्त्रज्ज्ञ आहोत."
अर्थात, डॉ. कृष्णा ईला यांनी कुणाचं नाव घेतलं नसलं, तरी त्यांचा निशाणा हा अदर पूनावाला यांच्यावर होता.
राजकीय क्षेत्रातूनही याबाबत मतं व्यक्त करण्यात आली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्वीट करून म्हटलं की, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांमध्ये आपापसात झालेला वाद दुर्दैवी आहे.
पंतप्रधानांनी या वादात हस्तक्षेप करण्याची गरजही गहलोत यांनी व्यक्त केली.
हा वाद वाढत जात असल्याचं लक्षात आल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मालक अदर पूनावाला यांनी ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं. तसंच, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट संयुक्त पत्रक जारी करून स्पष्टीकरण देईल, असंही ते म्हणाले.
त्यानंतर काही वेळातच सीरम इन्स्टिट्यूटचे मालक अदर पूनावाला आणि भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा ईला यांनी संयुक्त पत्रक जारी केलं.
'सीरम' आणि 'भारत बायोटेक'च्या संयुक्त पत्रात काय आहे?
अदर पूनावाला आणि डॉ. कृष्णा ईला यांनी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांच्या वतीने संवाद साधला आणि कोरोनावरील लशीच्या उत्पादन, भारतासह जगभरात लशीचा पुरवठा करणं याबाबत चर्चा केली, अशी माहिती या पत्रकातून देण्यात आली.
भारतासह जगभरातील लोकांचे जीव वाचवणे हेच आमच्यासमोरचं मुख्य आव्हान असल्याचं दोघांनी या पत्रकात म्हटलं आहे.
"दोन्ही (कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन) लशींना EUA म्हणजे आपात्कालीन वापराची परवानगी मिळालीय. त्यामुळे आता उत्पादन घेणं, पुरवठा करणं आणि वितरण करणं यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे," असं त्यांनी म्हटलंय.
एकूणच अदर पूनावाला आणि डॉ. कृष्णा ईला यांनी या संयुक्त पत्रातून वादावर पडदा टाकण्याचा आणि दोनही लसनिर्मात्या कंपन्यांमध्ये सुसंवाद असल्याचं या पत्रातून सांगण्याचा प्रयत्न केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)