You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः परदेश प्रवास करून आलेल्यांच्या विलगीकरणाबाबत केंद्राला सूचना करणार- उद्धव ठाकरे
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे.
हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (4 जानेवारी) वर्षा येथे कोरोना लसीकरणाबाबत बैठक घेतली तसेच ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता ठेवण्याच्या सूचना दिल्या.
कोरोना लसीकरणाची ड्राय रन नुकतीच झाली. आता केंद्र शासनाकडून लस मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात होईल. त्याबाबतच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं, की ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते मात्र. गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे.
नव्या कोरोना विषाणूची लागण झालेले 8 प्रवाशी सध्या संस्थात्मक विलगिकरणात असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यांचा संपर्क कुणाकुणाशी आला ते काटेकोरपणे शोधण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी वर्षा येथील बैठकीत दिली
युकेमध्ये सापडली होती कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन
युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजात) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.
कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचं WHO ने बीबीसीला सांगितलं.
सध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
पण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)0000