2020: कोरोनाबद्दल आणि कोरोनाबरोबर जगताना- ब्लॉग

कोरोना उपचार

फोटो स्रोत, Siddhanath Ganu

फोटो कॅप्शन, तिन्ही त्रिकाळ औषधाचे डोस
    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

जसं इसवी सन किंवा हिजरी सन असतं तसं बहुतेक येणाऱ्या काळात कोव्हिड सन किंवा कोरोना सन अशाही नोंदी सापडल्या तर आश्चर्य वाटायला नको. मनात आणलं तर 2019 पर्यंत 'कोरोनापूर्व' आणि 2020 पासून 'कोरोनोत्तर' जग अशी स्वतंत्र कालगणना करता येईल.

यातला गमतीचा भाग सोडून द्या पण खरंच या एका वर्षात आपलं जगणं अंतर्बाह्य बदललं हे नाकारता येणार नाही. एक पत्रकार म्हणून कोरोना व्हायरसबद्दल बोलत-लिहित आणि व्यक्तीशः कोव्हिडचा अनुभव घेत हे वर्षं कसं सरलं याचा हा लहानसा लेखाजोखा.

प्रवासी पाहुण्याने तळ ठोकला

नोब्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या काळात 'बीबीसी विश्व'मध्ये आम्ही करोना व्हायरसबद्दल अनेकदा बोललो. पण तेव्हा ऐकणाऱ्यांना ती बातमी 'चीनचा कुठलासा हुबे प्रांत, तिथलं कोणतंतरी वुहान शहर जिथे कोरोना नावाचा एक काहीतरी व्हायरस पसरतोय' इतपतच रस घेण्यायोग्य वाटली असेल.

पण फेब्रुवारीपासून हे चित्र बदलायला लागलं. हा-हा म्हणता हा प्रवासी भारतात दाखल झाला आणि त्यानंतर जे जे घडलं त्याची कल्पना आपण कुणीच केली नव्हती. राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर झाला त्या रात्री बुलेटिन्स संपल्यानंतर घरी कसं जायचं हा प्रश्न आमच्याही समोर होता, पण यथावकाश घरी जाण्याची सोय झाली. देशातल्या लाखो स्थलांतरित मजुरांसाठी अशी सोय होऊ शकली नाही ही एक शोकांतिकाच.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पत्रकार म्हणून हा सगळाच काळ अकल्पित आव्हानांचा होता. डिजिटल माध्यमात काम करण्याचा 'थंबरूल' म्हणजे adaptation किंवा अनुकूलन. मोठाले कॅमेरे, कंट्रोल रूम, स्टुडिओ, सॅटेलाईट बीमिंग यांसारख्या अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज ऑफिस असताना तिथे न जाता घरातूनच बातमीदारी करायची ही कल्पना एरव्ही अतर्क्य वाटली असती पण कोव्हिडच्या काळात आम्ही ती एका मिनिटांत स्वीकारली.

घरातलं बाळ तेव्हा सहा महिन्यांचं होतं त्यामुळे ट्रायपॉड, माईकसारख्या वस्तूंना तसा धोका नव्हता, पण ती परिस्थिती लवकरच बदलणार याचा पूर्ण अंदाज होता. माझ्यासारख्या नव-पालकांसाठी या 2020 मधला 'वर्क फ्रॉम होम' चा 'न्यू नॉर्मल' पथ्यावर पडला. उगीचच 'दमलेल्या बाबाची कहाणी' वगैरेचा मेलोड्रामा त्यामुळे टळला आणि रांगण्यापासून ते धावण्यापर्यंतचा प्रवास व्हीडिओवर नाही तर प्रत्यक्षात पाहायला मिळाला.

आरोग्यम् धनसंपदा

पत्रकार अनेकदा 'बीट्स'बद्दल बोलतात. राजकारण, अर्थकारण, क्राइम, आरोग्य अशी असंख्य वेगवेगळी क्षेत्रं म्हणजे वेगवेगळ्या 'बीट्स' असतात. 2020 ने सगळ्याच बीट्सना एका विषयाशी बांधून ठेवलं- आरोग्य. आरोग्य आणि विज्ञान या गोष्टींकडे सहसा अनेकजण पुरवणीतले विषय किंवा विकेंडला वाचण्याचे विषय म्हणून पाहतात. पण 2020 ने आरोग्य तसंच विज्ञानाबद्दलचं आपलं गांभीर्य आणि त्याचा अभाव या दोन्हीची जाणीव करून दिली. शाळेत असताना व्हिजन 2020 किंवा भारत 2020 ची महासत्ता वगैरे विषयांवरचे निबंध आणि भाषणं आठवली.

महासत्ता वगैरे क्षणभर बाजूला ठेवा पण अजूनही आपल्याला हात धुवा, उघड्यावर थुंकू नका यांसारख्या सामान्य गोष्टी पाळण्यासाठी सतत विनवण्या कराव्या लागतात या वास्तवाने कमालीचा खेद वाटला. नाही म्हणायला हे वर्षं संपता संपता या सवयी अनेकांच्या अंगवळणी पडल्या आहेत ही जमेची बाब. पण त्यासाठी एका आरोग्य संकटाची वाट पाहावी लागली ही बोच जाणार नाही.

गंमत सांगतो, आमचा सव्वा वर्षाचा मुलगा घरात कुणीही आलं की त्यांना हात धुण्याची नक्कल करून दाखवतो आणि बाथरूमकडे बोट दाखवतो. या पिढीने जन्मापासून हेच पाहिलंय त्यामुळे भविष्यात या गोष्टींसाठी कंठशोष करावा लागणार नाही अशी आशा करायला हरकत नाही.

17 दिवसांच्या क्वारंटाईननंतर बाहेर पडताना

फोटो स्रोत, Siddhanath Ganu

फोटो कॅप्शन, 17 दिवसांच्या क्वारंटाईननंतर बाहेर पडताना

शिफ्टच्या वेळांचं बंधन, पर्सनल आणि प्रोफेशनल यातली सीमारेषा आणि कालरेषा यांसारख्या गोष्टींचे पाश या वर्षभरात सैल झाले. घरगुती जबाबदाऱ्यांबद्दल ऑफिसवाल्यांनी आणि ऑफिसच्या बांधिलकीबद्दल घरच्यांनी समजून घेतलं नसतं तर कोणताच नोकरदार या वर्षातून सुखासुखी तरला नसता. बातम्या, मुलाखती, व्हीडिओ, लाईव्हस्, पॉडकास्ट या सगळ्या माध्यमातून प्रामुख्याने कोरोना व्हायरस आणि अधेमधे इतर गोष्टींबद्दल लिहीत-बोलत होतो.

या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकीकडे शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, औषध निर्माते यांचा अव्याहत खटाटोप थक्क करणारा होता. दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषाणू आणि आजाराबद्दल येणारे असंख्य दावे 'पालथ्या घड्यावर पाणी' या म्हणीचा प्रत्यय आणत होते. मेसेज करून, फोन करून 'काय कोरोनाबद्दल काय नवीन?' असा प्रश्न अनेकजण विचारत.

जगभरातलं लेटेस्ट संशोधन त्यांना सांगावं आणि मग त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर 'लसूण खाल्ल्याने कोरोना मरतो' किंवा 'कोरोना ही फार्मा कंपन्यांचा खिसा भरण्यासाठीची अफवा आहे' अशाच पोस्ट्सचा खच पडलेला पाहावा असेही अनुभव आले आणि या फेक न्यूजच्या व्हायरसवर लस कधी येणार असा विचार मनात डोकावून गेला.

रोजगार, घरदार, आप्तेष्ट गमावलेल्यांचं दुःख मोठंच होतं, पण या काळ्या ढगालाही एक चंदेरी किनार होती. एरव्ही आपल्या कोशातून बाहेर न आलेल्या अनेकांना आपल्या भोवतालाची जाणीव झाली, इतरांची मदत करण्याची प्रेरणा मिळाली आणि अनेकांनी त्यावर अंमल करत माणुसकीचा एक भलामोठा सेतू उभा केला. शाळेत लिहिलेल्या, ऐकलेल्या '2020 सालचा माझ्या स्वप्नातला भारत' मधली ही एक गोष्ट तरी प्रत्यक्षात उतरली झाली याचा आनंद आणि अभिमान दोन्ही वाटलं.

'पॉझिटिव्ह नको रे बाबा!'

अनेक आठवडे बीबीसी मराठीच्या पॉडकास्टमध्ये मी न चुकता, किमान एकदा तरी हात धुवा, मास्क वापरा, अंतर राखा ही त्रिसूत्री प्रेक्षकांना सांगायचो. कोरोना तुमच्या जवळ आला तर इलाज नाही पण तुम्ही त्याला खेटायला जाऊ नका असंही म्हणायचो. काही जण तक्रारही करायचे की 'तू फार उपदेश देतोस'. पण स्वतः ही सगळी काळजी घेऊनही या व्हायरसने कसा आमच्या घरात शिरकाव केला हे अजूनही कोडंच आहे.

आयुष्यात 'पॉझिटिव्ह रिझल्ट नको रे देवा' अशी इच्छा यापूर्वी कधी झाल्याचं आठवत नाही पण कोरोनाच्या बाबतीत ते ही घडून गेलं. घरातले आबालवृद्ध कोव्हिड पॉझिटिव्ह निघाले आणि मग सुरू झाला क्वारंटाईनचा अध्याय.

17 दिवस! तिन्ही त्रिकाळ औषधांचे डोस, बोटाला ऑक्सिमीटर लावणं, तापमान मोजणं या सगळ्या कसरतीत दिवस उजाडत होते आणि मावळत होते. चव जाणं, वास न येणं या 'कोव्हिड एक्सक्लुझिव्ह' लक्षणांचा अनुभव घेत आम्ही एक-एक दिवस 'आज काय नवीन?' या पद्धतीने घालवत होतो.

बीबीसी विश्व
फोटो कॅप्शन, बीबीसी विश्व

ज्या आरोग्य यंत्रणेतील त्रुटी इतरांच्या अनुभवांतून कळत होत्या त्या आता प्रत्यक्षात अनुभवता येत होत्या. देशातील एकूण कोव्हिड रुग्णांच्या आकड्यात आम्ही मोजले गेलो असलो तरी ज्या दिल्लीत राहतो त्या सरकारच्या दफ्तरी आमची गणतीच झाली नाही. राज्य सरकारच्या कोव्हिड हेल्पलाईनला स्वतःहून माहिती देऊनही परिस्थिती बदलली नाही.

14 दिवसांनंतर 'आरोग्य सेतू' स्वयंप्रेरणेने लालचा हिरवा झाला आणि सरकार दरबारी आम्ही आपोआप बरे झालो. कुठलाही व्हायरस शरीर पोखरत जातो. त्याला रोखण्यासाठीची औषधं तेव्हाच जोमाने काम करतात जेव्हा रुग्ण मनानेही तयार असतो. कोव्हिडच्या बाबतीत औषधोपचारांइतकंच आपलं मानसिक स्वास्थ्य जपणंही मोलाचं आहे याची फिरून जाणीव झाली.

कोव्हिडच्या काळात प्रवास जवळजवळ खुंटला. जिथे कुटुंबीयांच्या भेटी होत नव्हत्या आणि वर्षभर आपल्याच घरी जाता येणं शक्य नव्हतं तिथे नव्या जागा आणि नव्या लोकांच्या भेटीगाठी होण्याची काय कथा. पण एरव्ही जे स्मार्टफोन्स आणि चॅटिंग अॅप्स पालक आणि मुलांमध्ये वादाचा मुद्दा ठरतात तीच यावेळी मदतीला धावून आली. लोक एकमेकांच्या संपर्कात राहू शकले, अडीअडचणीला मदतीला धावून जाऊ शकले आणि कमी होत चाललेला संवाद व्हर्चु्अली का असेना सुरू ठेवू शकले हे ही नसे थोडके.

प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष आपल्याला कळत नकळत काहीतरी शिकवून जात असतं. 2020 ने सुद्धा खूप काही शिकवलं. काळाच्या पटावरचं माणसाचं अत्यंत सूक्ष्म स्थान, पुरून उरण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हा सगळा खटाटोप सार्थ ठरवण्यासाठी लागणारं कोंदण म्हणजे माणुसकी. समुद्राप्रमाणेच काळाच्या लाटाही एकापाठोपाठ एक थडकत राहतात. अथांग काळातून आपण आपल्या छोट्याशा होडीतून प्रवास करत असतो. लाटा त्यांचं काम करत राहतात, आपलं काम फक्त वल्हवण्याचं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)