World Bicycle Day : 2020-21 दरम्यान सायकलींची मागणी अचानक का वाढली?

सायकल

फोटो स्रोत, Getty Images

जगभरातील गॅरेजमध्ये गंजत पडलेल्या सायकलींवर टाळेबंदीच्या काळात फडकी मारली गेली आणि नवीन सायकलींच्या विक्रीनेही उसळी मारली. सायकलींच्या बाजूने झुकलेला हा कल टिकून राहील का?

'कोव्हिड-19' साथीच्या काळात सायकलींच्या विक्रीत अचानक प्रचंड वाढ झाली. सार्वजनिक वाहतुकीसंबंधी वाढलेली चिंता आणि व्यायामावर दिला जाणारा भर, यांमुळे अधिकाधिक लोक वाहतुकीच्या प्राथमिक साधनांचा वापर करू लागले आहेत, त्यातूनच सायकलींच्या बाजारपेठेत तथाकथित तेजी आली आहे.

या प्रवाहाबद्दल बरंच वार्तांकन झालेलं आहे: सायकलींची मागणी पूर्ण करताना पुरवठादारांची दमछाक होते आहे; सायकलस्वारांचा लोंढा सामावून घेण्यासाठी काही शहरांमध्ये रस्त्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे; सायकलींची नव्याने वाढलेली लोकप्रियता टिकून राहील असा अंदाज उत्पादक वर्तवत आहेत. कोरोना साथीपूर्वीच भरभराटीला आलेला हा उद्योग अचानक आणखी गतिमान झाला आहे. पण सायकलींच्या भवितव्याबद्दल यातून कोणते संकेत मिळतात?

सायकल

फोटो स्रोत, @sharon tshipa

सायकल हे पूर्वीपासूनच वाहतुकीचं वेगवान, सर्वाधिक लवचिक आणि विश्वासू साधन राहिलेलं आहे. कोरोनाची साथ येण्यापूर्वीही लाखो लोक त्यांचं काम करण्यासाठी किंवा कामावर जाण्यासाठी सायकलींवर विसंबून होते. पण जगभरामध्ये टाळेबंदी लागू झाल्यानंतर सायकलींच्या भूमिकेत परिवर्तन घडलं.

अमेरिकेतील सरासरी दहापैकी एका प्रौढ व्यक्तीने कोव्हिड-19चा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षात (किंवा त्याहून दीर्घ कालावधीत) पहिल्यांदा सायकल चालवली, असं अमेरिकेतील कोलराडोस्थित 'पीपल फॉर बाइक्स' या उद्योग-संघाच्या संशोधनातून समोर आलं. अमेरिकेमध्ये सायकलवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मार्च 2019 च्या तुलनेत मार्च 2020 मध्ये तिप्पट झाल्याचं 'रेल्स-टू-ट्रेल्स कन्झर्व्हन्सी' या विनानफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं. अमेरिकेत वापरातून बाद झालेल्या रेल्वे-मार्गांचा वापर चालण्यासाठीच्या व सायकलींसाठीच्या वाटा विकसित करायला व्हावा, यासाठी ही संस्था कार्यरत आहे.

"लोकांना काहीच काम नसलेल्या अवस्थेत घरी बसावं लागलं, आणि गॅरेजमध्ये पंक्चर झालेली सायकलही बसून होती," असं 'पीपल फॉर बाइक्स' संस्थेतील सरकारी धोरण विभागाच्या संचालक मॉर्गन लॉमेली म्हणतात. "सायकल वापरण्याबाबत लोक अनुत्सुक असतात, त्याचं पूर्वीपासून एक कारण असं राहिलेलं आहे की- शंभर सुट्या भागांनी सायकल तयार होते, तर 'ते भाग मी कुठे साठवून ठेवू? त्यात काही लागलं तर दुरुस्त कसं करू?' अशी चिंता लोकांना सतावते." पण टाळेबंदीमुळे ही परिस्थितीच बदलली. "आता अचानक लोकांना छोट्यामोठ्या दुरुस्तीकामांसाठी वेळ मिळाला."

लॉस अँजेलीस आणि ह्यूस्टन यांसारख्या अनपेक्षित शहरांमध्येही सायकलप्रवासात मोठी वाढ झाल्याचं 'स्ट्राव्हा'सारख्या आरोग्यविषयक अॅपच्या आकडेवारीतून स्पष्ट होतं. युरोपातही अशाच प्रकारचा बदल दिसून आला आहे. "मार्चमध्ये टाळेबंदीची सुरुवात झाल्यापासून सायकलींची मागणी वाढती असल्याचं आम्हाला आढळलं," असं 'फुल स्पीड अहेड युरोप'चे महाव्यवस्थापक एदोआर्दो गिरार्डी म्हणतात. अनेक भागांमध्ये व्यायामशाळा आणि पोहण्याचे तलाव कित्येक आठवडे बंद होते, "त्यामुळेही सायकलींसाठीची मागणी वाढली असण्याची शक्यता आहे," असं गिरार्डी म्हणतात. "शिवाय सरकारी प्रोत्साहनदेखील याला कारणीभूत ठरलं असावं."

सायकल

फोटो स्रोत, Getty Images

साथीच्या रोगादरम्यान सायकलप्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी काही राष्ट्रांमध्ये नवीन सायकलच्या खरेदीवर किंवा सायकल देखभालीच्या खर्चावर खरोखरच सवलती देण्यात आल्या. उदाहरणार्थ, इटलीमध्ये इंजिनविरहित वाहन विकत घेणाऱ्या इटालियन रहिवाशांना 500 युरो (450 पौंड/590 डॉलर) भत्ता देण्यासाठी 21 कोटी युरोंचा रोख परतावा कार्यक्रम तयार करण्यात आला. फ्रान्समध्येही अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

टाळेबंदीच्या उपाययोजना आणि सामाजिक अंतराचे नियम काटेकोरपणे लागू झाल्यापासून सायकलींचे विक्रेते अचानक "अत्यावश्यक सेवां"मध्ये आले. अनेक ठिकाणी सरकारांनी त्यांना टाळेबंदीतून सूटही दिली, आणि किराणा दुकानांच्या बरोबरीने त्यांना मोकळीक मिळाली. पण सायकलींचे उत्पादक बहुआयामी, भौगोलिकदृष्ट्या गतिमान उत्पादनसाखळीवर अवलंबून असतात- सायकलींचे सुटे भाग जगभरातील विविध ठिकाणांवरून येतात- ही साखळी कोरोनाच्या साथीमुळे ठप्प झाली.

युनायटेड किंगडममधील 'ब्रॉम्पटन बाइक्स'चे व्यवस्थापकीय संचालक विल बटलर-अॅडम्स म्हणतात की, कंपनीचा कच्च्या खनिजाचा पुरवठादार बंद पडला, तर कंपनीचा माल वाहून आणणारं जहाज आठवडाभर रॉटरडॅमला अडकून पडलं, त्यामुळे काही सेवांमध्ये कपात करावी लागली आणि उपकरणांचा असमतोल तयार झाला. "टाळेबंदी प्रत्यक्षात येण्याच्या काही महिने आधीपासूनच आम्हाला तिची कुणकुण लागली होती, कारण आमचे अनेक पुरवठादार आशियात आहे," असं बटलर-अॅडम्स सांगतात. "पण ज्या वेगाने हा फटका बसला, त्यासाठी आम्ही तयार नव्हतो."

आरोग्यविषयक जोखीम कमी करण्याचा प्रयत्न म्हणून ब्रॉम्पटन कंपनीने फ्रेबुवारी महिन्याच्या आरंभी असुरक्षित कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं, आणि युनायटेड किंगडममधील कारखाने जवळपास एका रात्रीत बंद करण्यात आल्यामुळे आशियातील पुरवठादारांकडून कंपनीने तातडीचा साठा मागवून घेतला.

ड्राइव्हट्रेन, डेरेलर आणि ब्रेक्स यांच्यासारखे सायकलीचे अनेक घटक जवळपास केवळ आशियातच तयार केले जात असल्यामुळे सायकलनिर्मितीचा उद्योग कोरोना विषाणूमुळे युनायटेड किंगडमच्या दिशेने वळेल, असा अंदाजही उद्योगविश्वातील काहींनी वर्तवला, असं बटलर-अॅडम्स सांगतात. वास्तविक तैवानमधील ब्रॉम्पटनच्या पुरवठादारांनी सक्षम उत्पादन सुरू ठेवलं आहे, तर कंपनीला स्वतःच्या मायभूमीतच कच्च्या सामग्रीसाठी झटापट करावी लागली, कारण इंग्लंडमध्ये कारखाने कमी क्षमतेवर सुरू ठेवण्यात आले होते.

"आम्ही युरोपीय आणि युनायटेड किंगडममधील साठ्यासंदर्भात अडचणी आल्या," असं बटलर-अॅडम्स म्हणतात. "सुदैवाने ब्रेक्झिटमुळे आम्ही वाढीव पुरवठा ठेवला होता- आमच्याकडे तशी तातडीची सामग्री नसती, तर आम्हालाही काम बंद करावं लागलं असतं. पण आता आम्ही ब्रेक्झिट युगामध्ये ब्रेक्झिट नव्हतं तेव्हाच्या साठ्यासह प्रवेश करतो आहोत."

सायकलींची मागणी इतकी वाढल्यामुळे, ब्रॉम्पटन कंपनीला नवीन संधी दिसू लागल्या: नर्स, डॉक्टर आणि फिजिशिअन यांना सायकली पुरवल्या, तर ते रुग्णालयांमध्ये सायकलींवरून प्रवास करू शकतील आणि सार्वजनिक वाहतूक टाळतील, अशी तजवीज त्यांनी केली. 'व्हिल्स फॉर हिरोज्' या अभियानासाठी कंपनीने 3,75,000 पौंड इतकी रक्कम उभी केली. याद्वारे युनायटेड किंगडममधील तीन हजारांहून अधिक आरोग्यसेवकांना जवळपास 800 सायकली पुरवण्यात आल्या. ब्रॉम्पटनच्या उत्पादनातही 30 टक्क्यांची वाढ झाली आणि पुढच्या वर्षभरात जवळपास 200 कर्मचाऱ्यांची भरती करून घ्यायची कंपनीची योजना आहे.

या साथीच्या काळात आउटडोअर डायनिंग, विविध कोडी, सोअरडो ब्रेड बेकिंग अशा अनेक छोट्या-मोठ्या क्षेत्रांमध्ये तेजी आली, त्याचप्रमाणे सायकलींच्या विक्रीला गती मिळणं हा केवळ कोरोना साथीदरम्यानचा बाजारपेठीय प्रतिसाद आहे, की यातून खरोखरच काही बदल होतील? सायकलींसाठी नवीन मार्ग, सायकलस्वारांना मिळणाऱ्या सवलती आणि निवांत वेळी सायकल चालवणं, या गोष्टी पुढेली टिकून राहतील का? "आपण पाहतोय ती बहुतांश वाढ मनोरंजनात्मक सायकलिंगमधली आहे, हे प्रवासी सायकलिंगचं प्रवेशद्वार म्हणावं लागेल," असं लॉमेली सांगतात.

"कोव्हिड-19 मुळे शहरांमध्ये केलेले तात्पुरते बदल कोणते आहे, आणि हे बदल कायमस्वरूपी राहतील का, याचा अभ्यास 'पीपल फॉर बाइक्स' करते आहे." नवीन सायकलस्वारांना वाहतुकीचं साधन म्हणून सायकलला प्राधान्य देण्यासाठी कोणते घटक उद्युक्त करत राहतील, आणि कोरोना साथीदरम्यान नागरी रचनेमध्ये केलेले कोणते बदल सायकलस्वारांच्या प्रवासावर परिणाम करण्याची शक्यता आहे, असे काही प्रश्न यात विचारात घेतलेले आहेत.

सायकल

फोटो स्रोत, Getty Images

काही बदल कायमस्वरूपी टिकण्यासाठी केल्यासारखं वाटतं. पॅरिसमध्ये रूअ द्यू रिव्होली रस्त्यालगत शेकडो किलोमीटर लांबीचे सायकल-मार्ग वाढवण्यात आले आहेत, तर लंडनमध्ये हाईड पार्कजवळ सायकलींसाठी खास वाट करून देण्यात आली आहे. सायकलींसाठी असे अधिकाधिक मार्ग असतील, तर सायकलस्वारांना अधिक प्रोत्साहन मिळेल, त्यातून वाहतूक व उत्सर्जन कमी होईल.

दरम्यान, 500 डॉलर ते 1500 डॉलर या दरम्यान किंमती असलेल्या सायकलींची सध्याची वाढती मागणी पूर्ण करणं सायकलविक्रेत्यांना शक्य होत नसल्यामुळे काही ग्राहक वापरलेल्या सायकलींचा ऑनलाइन शोध घेऊ लागले आहेत, काहींनी स्वतःच्या जुन्या सायकलींची दुरुस्ती केली, तर काहींनी अधिक महागड्या मॉडेलच्या सायकली घेण्यासाठी आणखी काही पैसे खर्च करण्याची तयारी दाखवली.

ग्राहकांकडून वाढलेली खरेदी, नगररचनाकार आणि लोकनियुक्त पदाधिकारी यांनी दिलेलं प्राधान्य- हा सध्याचा कल सक्षम वाटत असला, तरी काही आघाडीचे उद्योजक या संदर्भात साशंक आहेत. 2020 सालच्या आर्थिक विसंगती विचारात घेता सायकलींच्या सध्या वाढलेल्या कार्यक्षमतेमध्ये गुंतवणूक करणं दीर्घकालीन संदर्भात अर्थपूर्ण आहे का, असा प्रश्न ते उपस्थित करतात. "ही मागणी टिकून राहण्याची शक्यता कमी आहे," असं गिरार्डी म्हणतात.

सायकलस्वारांची वाढणारी संख्या अर्थातच केवळ उत्पादकांचा विस्तार किंवा सायकलींच्या विशिष्ट भागांची उपलब्धता यावर अवलंबून नाही. यात इतरही काही दुर्लक्षित पैलू आहेत. उदाहरणार्थ- मालवाहतुकीसाठीच्या इ-सायकलींमध्येही या काळात वाढ झाली आहे. या बदलात मात्र वाहतुकीची पूर्णतः पुनर्रचना करण्याचं सामर्थ्य आहे.

दळणवळण उद्योगामध्ये या सायकली 'लाइट इलेक्ट्रिक फ्रेट व्हेइकल' (एलईएफव्ही) म्हणून ओळखल्या जातात. हलक्या वजनाचं सामान वाहून नेण्यासाठी सोयीच्या असणाऱ्या या ई-सायकलींच्या पेडलला इलेक्ट्रिक ऊर्जेची जोड दिलेली असते, त्यामुळे वाहतूककोंडीत न फसता किंवा गाड्यांमधला धूर फुफ्फुसांमध्ये घ्यायचं टाळत या सायकली इच्छित स्थळी वस्तू किंवा सेवा वेगाने पोहोच करू शकतात. अनेक शहरांमध्ये एलईएफव्ही सायकली पारंपरिक डिलिव्हरी वाहनाहून अधिक वेगाने प्रवास करू शकतात, कारण सायकलींसाठीचे पूल आणि इतर आडवाटांनी पुढे जाणं या सायकलींना शक्य असतं.

सध्या तरी, जुन्या ढंगाच्या सायकलसवारीचं पुनरुज्जीवन झाल्याचं दिसतं आहे. अत्यावश्यक सेवा देणारे आणि इतर प्रवासी यांना सायकलींमुळे सामाजिक अंतर राखून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होतो, व्यायामशाळा किंवा सब-वे यांना हा चांगला सुदृढ पर्याय आहे, आणि शहरांमधील रस्त्यांसाठीची नवीन दृष्टीही त्यातून मिळते.

"टाळेबंदीमुळे अचानक रस्ते शांत झाले, हवा स्वच्छ झाली आणि लोकांना सुरक्षित वाटू लागलं," असं बटलर-अॅडम्स म्हणतात. "सायकलसवारीमध्ये वाढ झाली, याला सार्वजनिक वाहतुकीबद्दल भीती कारणीभूत होती हे खरं, पण शहरं कशी असू शकतात हे अनुभवण्याचा आनंदही त्यात बहुतांशाने मिळत होता." असं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)