2020मधील आयुष्य : घरी आलेलं ऑफिस, विरलेली झप्पी आणि एकट्याची गर्दी

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
नवीन वर्षाचे पडघम वाजू लागले की रेझोल्युशन आणि संकल्पांच्या फैरी हवेत झडू लागतात. 31 डिसेंबरच्या रात्री ते आणखी तडतडतात. एक तारखेच्या दुपारी जडशीळ डोळ्यांनी जाग येते तेव्हा अनेक संकल्प भवतालातल्या अस्ताव्यस्ततेत विखरून गेलेले असतात. आठवडा सरतो तसं आपण गेल्या वर्षीचंच टू बी कंटिन्यूड जगतोय याची जाणीव होते.
जानेवारी संपेपर्यंत आपण गेल्या वर्षीचेच चाकरमानी बनून राहतो. मर्त्य माणसांच्या मनाचे हिंदोळे साकळत असताना एका विषाणूने एंट्री घेतली होती. तो काय संकल्प करून अवतरला माहिती नाही पण आपल्या आयुष्यात पूर्वीसारखं काही राहणार नाही याची दक्षता त्याने पुरेपूर घेतली. मिस्टर इंडिया रुपात वावरणाऱ्या त्याने आपलं आयुष्य कातरायला सुरुवात केली. या कातरण्यातून सुरेख नक्षी चितारली गेली नाही, आपलं आयुष्य उसवलं गेलं. कोरोना नावाच्या तीन अक्षरी अदृश्य दैत्यामुळे काय काय बदलत गेलं याचा घेतलेला आढावा.
1.डेली सोपचा साबण संपला?
घरातल्या प्रत्येकाला स्वतंत्र खोल्या असूनही मध्यमवर्गीय म्हणवणारं कथानक, मेकअपच्या पुटासह झोपेतून उठणारी माणसं, मुलगा-मुलगीची ओळख होताच त्यांना थेट लग्नाच्या बोहल्यावर चढवणारी प्रेमकहाणी अशा आशयाच्या डेली सोप्स अर्थात टीव्हीच्या पडद्यावर संध्याकाळी सात ते दहा वेळेत लागणाऱ्या मालिका पाहणं हे अनेकांसाठी आद्य कर्तव्य होतं. कोरोनाने लॉकडाऊन आणला, तो वाढतही गेला आणि डेली सोप्सचे बँक केलेले एपिसोड संपले.

फोटो स्रोत, MARTIN BUREAU
त्याच मालिकेचे जुने भाग बघायचा कंटाळा आल्यावर मंडळी ओटीटीकडे वळली. टीव्ही बघणं सामूहिक अॅक्टिव्हिटी होती. कोरोनाने ते पाहणं मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबकडे सरकवलं. पेड बुस्टर लावूनही जे जमलं नसतं ते कोरोनाने करून दाखवलं. काही पाहण्यासाठी अमुक वेळी टीव्हीपुढे बसायला हवं या पद्धतीला हात घातला गेला. आपल्याला हवं त्या वेळेला, हवं ते बघता येतं याचा सुगावा अनेकांना लागला.
2.एकट्याची गर्दी
गर्दीत खूप कचकचाट असतो. त्या गोंगाटात काय चाललंय समजत नाही असं अनेकजण म्हणतात. आजूबाजूला ढिगावरी माणसं असूनही हरवल्यासारखं वाटतं. शेकडो दुष्परिणाम असले तरी गर्दीच्या ठिकाणी गर्दी करणं हे आपलं व्यवच्छेदक लक्षण होतं. शोभायात्रांपासून लोकप्रिय हिलस्टेशनपर्यंत आणि जॉगिंग ट्रॅक असलेल्या गार्डनपासून गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारात जाऊन घासाघीस करत वस्तू घेणं अनेकांना पराक्रमी वाटतं.

फोटो स्रोत, Nathan Stirk
कोरोनाने गर्दीचा सोस लयाला नेला. गर्दीत गेलं की सुरक्षित वाटतं, एकटं वाटत नाही या विचारांना अलगीकरण-विलगीकरण या द्वयीने गुंडाळून टाकलं. गर्दीचा भाग होणं म्हणजे मुख्य प्रवाहाचा भाग होणं, ट्रेंडच्या लाटेवर स्वार होणं. कोरोनाने घराबाहेर तर काहींना खोलीबाहेर पडणं महाग केलं. गर्दीत ठळकपणे मिरवण्याची हौस कोरोनाने फिटवून टाकली. एकटं पाडणं या वाक्प्रचाराला आपण एकटं पाडलं होतं. कोरोनाने शब्दांच्या समृद्ध अडगळीतून त्याला बाहेर काढत आपल्याला एकटं पाडलं.
3.आखों आखों में
आखों आखों में इशारे हे बॉलीवूडच्या प्रेमकहाण्यांसंदर्भात म्हटलं जातं. पण कोरोनाने फक्त डोळ्यांनिशी माणसं ओळखायला शिकवली आहेत. काही वर्षांपूर्वी टीव्हीवर गेम शो लागायचा. त्यात माणसाचं चित्र ओळखायला सांगायचे. पण त्या माणसाच्या चेहऱ्याचे भाग ब्लर केलेले असायचे. अनेकजण डोळ्यांवरून माणूस ओळखून दाखवायचे. कोरोनाने तो खेळ जिवंत केला.

फोटो स्रोत, NurPhoto
इतके दिवस आपण माणसं अख्ख्या चेहऱ्याने ओळखायचो. मोठ्ठा मास्क, त्याच्या नाड्या लावल्यावर माणूस एकदम परका वाटू लागतो. अशावेळी त्याला ओळखण्याचं साधन म्हणजे डोळे. गेल्या अनेक वर्षात समोर येणाऱ्या माणसाचे डोळे आपण इतक्या बारकाईने पाहिल्याचं तुम्हाला आठवतंय का? (युगुलांचा अपवाद सोडून).
4.अपना सपना मनी मनी
खात्यात व्हर्च्युअली जमा झालेले पैसे हाती मिळण्याचं ठिकाण म्हणजे एटीएम. पैसे काढण्यासाठी लागणाऱ्या लांबचलांब रांगा बँकांना नकोशा झाल्याने एटीएम सुरू झाली. एटीएममध्ये गेल्यावर तुम्ही नीट आठवा- गार एसीची झुळुकू अंगावर येते. अनेक बहिर्वक्र आरसे बसवलेले असतात. वर पाहिलं की एक सीसीटीव्ही आपल्याला टिपत असतो. त्याच्या बाजूला फलक असायचा- मास्क, हेल्मेट बाजूला करा.

फोटो स्रोत, NurPhoto
पैशासारखा संवेदनशील विषय असल्याने त्याठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी तिथे येणाऱ्या माणसाचा चेहरा स्पष्ट टिपला जावा यासाठी ते लिहिलेलं असायचं. आता आपण मास्कधारी आत जातो. डाकूच्या थाटात मशीनला किती पैसे हवेत ते सांगतो. ताज्या नोट्या बाहेर येतात आणि अकाऊंट तुटपुंजं वाटू लागतं. कोरोना काळात पैसे तरी मिळालेत या विजयी भावनेने आपण मास्कधारी बाहेर पडू लागलो.
5.जादू की झप्पी विरली
मिठी, आलिंगन आणि जादू की झप्पी या तिन्हीमधला फरका तुम्ही जाणताच. संपर्कात येणारा प्रत्येक माणूस आपल्याकडे विषाणू संक्रमित करू शकतो या समीकरणामुळे जादू की झप्पी निकाली निघाली. दूर निघालेल्या माणसाचा निरोप घेताना, जुना दोस्त भेटल्यावर, एकूणातच ब्रो कोड जपण्यासाठी मिठी मारली जायची. कॉर्पोरेट कल्चरमध्ये अमुकशी किती सलगी आहे हे दाखवण्यासाठीचा याचा वापर केला जायचा. बाकी मिठ्यांचा तपशील सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

फोटो स्रोत, JOSE JORDAN
माणसापासून अंतर ठेवायचं असल्याने झप्पीचा विषय कट झाला. लॉकडाऊन हटला, बंधनं थोडी शिथिल झाली. एका मास्कधारी माणसाने दुसऱ्या मास्कधारी माणसाला झप्पी देणं म्हणजे माणसाने रोबोलो मिठी मारल्यासारखं वाटतं. बरं अशी मास्की मिठी मारतानाही संक्रमणाचा धोका आहेच. जेंडर भेद कमी करत शारीरिकपेक्षाही मानसिक आधार देणारी मिठी कोरोनाने सैल केली. अनेक दिवस बायोबबलमध्ये राहणारे खेळाडू खेळताना एकमेकांना झप्पी देऊ लागल्यावर अनेकांनी हेवा वजा असूया व्यक्त केली.
6. सुरक्षित अंतर ठेवा (एसटी महामंडळ झिंदाबाद)
काही माणसं, संस्था द्रष्टी असतात. एसटी अर्थात राज्य परिवहन मंडळाच्या शेवटाकडे एक ओळ लिहिलेली असते. गाडी कुठल्या मेकची असली तरी ती ओळ कायम असते- सुरक्षित अंतर राखा. धाडकन आवाज करून बंद होणाऱ्या दरवाजेवाल्या खडखड एसटीऐवजी प्रवास हा सुखद अनुभवही असू शकतो याचा फील देणाऱ्या शिवनेरी, हिरकणी आल्या पण हे वाक्य बदललं नाही. हे वाक्य एसटीत बसून प्रवास करणाऱ्यांना शब्दश: पाळायला लागेल असा विचार कुणी केला नव्हता.

फोटो स्रोत, Michael Ciaglo
आऊट ऑफ बॉक्स वगैरे म्हणतात ते कोरोनाने सगळं प्रत्यक्षात आणलं. एका माणसाने दुसऱ्या माणसापासून किती मिलीमीटर, सेंटीमीटर, इंच, फूट अंतर राखायचं हे वेळोवेळी ठरत गेलं. जवळीक करणं गुन्हा वाटावा एवढं हे अंतर लांबत गेलं.
7.पेपरचा झाला हिशोब
कितीही महागमोलाचा स्मार्टफोन असला तरी सकाळी उठल्यावर चहा पित पेपर वाचणं हे अनेकांसाठी आन्हिक होतं. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये पेपर निघत होते. मात्र विषाणू पसरण्याच्या भीतीने लोकांनी पेपर वाचणं टाकलं. अनेक सोसायट्यांच्या गेटवर पेपरच्या चळत्या जमा व्हायचा. तिथेच त्याची रद्दी होऊन जायची. वर्षानुवर्षे जी सवय अनेकांच्या आयुष्याचा भाग होती ती कोरोनाने हाणून पाडली.

फोटो स्रोत, Pallava Bagla
वर्तमानपत्रांच्या माध्यमातून कोरोना पसरत नाही हे पटवून देण्यासाठी वेगळ्या कॅम्पेन राबवाव्या लागल्या. आता खरंतर पेपर सगळीकडे येऊ लागले पण कोरोनाच्या धसक्याने अनेकांनी पेपर विकत घेणंच सोडून दिलं. तुम्ही विचार करा- पहाटेच्या थंडवेळी ताज्या पेपरांचं सॉर्टिंग करणाऱ्या माणसांचं आणि सायकलवर ते पेपर टाकणाऱ्या पोरांचं काय झालं असेल? आपल्या हातातल्या वस्तूमधून आजार पसरतोय या गैरसमजातून एक इंडस्ट्री पोखरुन निघाली. अनेकांनी ईपेपर वाचायला सुरुवात केली. अनेकांनी पेपरवाल्याचा फायनल हिशोब केला.
8.पाणी, गुळखोबरं नव्हे सॅनिटायझर
कोणी घरी आलं की पाणी देणं स्वाभाविक. गावाकडे गुळखोबरं देतात. आता दारी आलेल्या माणसाच्या हाती सॅनिटायझरची बाटली किंवा त्याचे थेंब ओतले जातात. हळदीकुंकवाचं वाण म्हणून सॅनिटायझरच्या बाटल्या दिल्या जाऊ शकतात इतक्या त्या आपल्या आयुष्याचा भाग झाल्या आहेत.

फोटो स्रोत, NurPhoto
एखाद्या घरी गेलं आणि त्यांनी हातावर चोपडायला सॅनिटायझर दिलं नाही तर हेल्थ बॅकवर्ड समजले जातात. काही ऑफिसांमध्ये तर सॅनिटायझरच्या स्प्रेने न्हाऊमाखू घालतात. काही कचेऱ्यात सॅनिटायझरचे स्टँड अवतरले. पायाने प्रेस केलं की सॅनिटायझर हाती येतं.
9.धुवा हातपाय
बाहेरून आल्यावर हातपाय धुवावेत हे सगळ्यांचे आईवडील सांगतात पण सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी ऐकायच्या नसतात या तत्वाने आपण हे हळूहळू सोडून देतो. कोरोनाने या जुन्या सवयीला जागृत केलं आहे. हात धुणं या गौण झालेल्या क्रियेला कोरोनाने एकदम देव्हाऱ्यात नेऊन ठेवलं. हात कसे धुवावेत याचे व्हीडिओ येऊ लागले. धुवा हातपाय, चला भोजनाला असा एक श्लोक असायचा. हात धुवायला हवेत हे खरं पण ज्यांच्याकडे प्यायला पुरेसं पाणी नाही त्यांनी हात धुवायला कुठून पाणी आणायचं असाही प्रश्न उपस्थित झाला. हात धुतलेलं असतानाही पुन्हा हात धुवावे वाटण्याचा आजारही बळावला. कोरोना हात धुवून मागे लागल्याने आपला पार नाईलाज झाला.
10. गरम पाणी, हळद दूध आणि काढा
आंघोळ आणि चांगल्या हॉटेलात जेवण झाल्यावर हात धुवायला फिंगरबोल येतं त्यात जनरली गरम पाणी वापरलं जायचं. हळद हा लग्नापूर्वी होणारा सांस्कृतिक कार्यक्रम होता तर दूध पिणं हा वैयक्तिक आवडीचा विषय होता. काढा हा एकूणातच ज्येष्ठ नागरिकांसाठीचा राखीव मुद्दा होता. कोरोनाने सगळ्या विषयांचं सपाटीकरण केलं आणि त्यांना सरसकट सगळ्यांच्या आयुष्याचा भाग बनवलं. प्रचंड उकाड्यातही माणसं गरम पाणी पित होती. कपाच्या तळाशी गाळ साठत असतानाही माणसं हळद दूध पिऊ लागली. मधाचं चाटण देऊन माणसं काढा पिऊ लागली.
11. ग्लोव्ह्जमधून पाणीपुरी
नखाने पुरी फोडून मग त्यात ऐवज भरून त्यानंतर दोन प्रकारच्या पाण्यांमध्ये बुडवून तुमच्या ताटलीत येणाऱ्या पाणीपुरीचा आनंद तुम्ही घेतला असेल. बटाट्याचं आलू-लसूण मिरचीचं सारण बेसनात घोळवून कढत तळणीतून पोहून पावात जाणारा वडा, त्यावर पेरली जाणारी लाल चटणी, तळलेली मिरची आणि भुस्काट हे सगळं तुम्ही अनेकदा खाल्लं असेल.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
या दोन्ही गोष्टी मास्कधारी माणूस, हँडग्लोव्ह्ज घालून तुम्हाला देऊ लागला तर?? कोरोनाने बाहेर खाणं मोठ्या प्रमाणात आत ढकललं. तुम्ही आठवा, भूक लागली की कुठल्याही गाडीवर जाऊन हादडणारे आपण आता नको जाऊदे असं म्हणतो. कटिंगचे अड्डेही ओस पडले. आपण इतके दिवस हायजिन वगैरे गोष्टी पार गुंडाळून ठेवल्या होत्या याचा खेद अनेकांना वाटू लागला.
12. ऑफिस घरी आलं
ऑफिसला जाणं हा अनेकांसाठी दिवसभराचा खटाटोप असे. ऑफिसला जाण्यासाठी तयार होणं, प्रवास करणं, जाऊन काम करणं, पुन्हा प्रवास असा माणूस रगडून जात असे. कोरोनाने अनेकांचं ऑफिस घरी आणलं. रोज जायची कटकट वाचणार असं वाटून अनेकांना आनंद झाला. पण ऑफिस घरी आलं की काम संपणारच नाही हे त्यांच्या ध्यानी आलं नाही. कुकरच्या शिट्ट्या, लहान मुलांचं खेळणं हे सुरू असताना काम करणं शिकावं लागलं.

फोटो स्रोत, Getty Images
घरात असलो तरी ऑफिसचं काम सुरू आहे यामुळे योग्य कपड्यात आवरून बसण्याचं तंत्र अनेकांना समजून घ्यावं लागलं. मीटिंगवेळी व्हीडिओ सुरू केल्यानंतर अनेकांची त्रेधातिरपीट उडू लागली. ऑफिस मीटिंग आणि कॉनकॉलचे एटिकेट्स अनेकांना घोटावे लागले. काहींनी वर्क फ्रॉम होम म्हणजे 24 तासाची दावण वाटू लागली. घरची कामंधामं आवरत काम करता येत असल्यामुळे अनेकांना हायसं वाटलं, दुसरीकडे ऑफिसमुळे आयुष्यात होणारं हॅपनिंग वजा झाल्याने अनेकांना खुडकल्यासारखं वाटू लागलं. वर्क फ्रॉम होम बेस्ट असं म्हणणारे नको रे ते बाबा म्हणू लागले आणि व्हाइस वर्सा.
13. दिल, दोस्ती, दुनियादारी
मित्रमैत्रिणी हे एक्सटेंडेड कुटुंबाप्रमाणे असतात असं म्हणतात. घर-संसार धबडग्यात अडकल्याने अनेकांचा शाळा-कॉलेजातल्या मित्रमैत्रिणींशी संपर्क तुटला होता. कोरोनाने तो सांधून टाकला. अनेक व्हर्च्युअल रियुनियन झाली. अनेकांनी खूप वर्षात काहीही संपर्क नसलेल्या मित्राला फोन केला. काहींनी हळव्या कोपऱ्याची विचारपूस केली. नियम पाळून भेटणं शक्य आहे त्यांनी भेटणंही जमवलं. व्हॉट्सअप ग्रुपवर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काहींनी अडचणीत असलेल्या दोस्तांसाठी मदतही उभारली.
14.वर्किंग वुमनचं जग
नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना वर्किंग वुमन म्हटलं जातं. परंतु घरी राहून नवरा-मुलगा यांचं जेवणखाण, लादी-केर अशी साफसफाई, किराणा-भाजीपाला आणणं, स्वयंपाक करणं हे 365 दिवस करणाऱ्या वर्किंग वुमनच्या योगदानाची आपण दखल घेत नाही. कोरोनाने अनेकांना नाईलाजास्तव या भूमिकेत गेल्यानंतर असं वर्किंग वुमन होणं किती आव्हानात्मक आहे याची जाणीव झाली. घरातल्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन चहा, नाश्ता, चहा, जेवण, चहा, नाश्ता, जेवण हे चक्र सांभाळणं किती अवघड हे अनेकांना लक्षात आलं. हा आपला 'कप ऑफ टी' नाही हे अनेकांनी मान्य केलं.
15. मिनिमलिस्ट अप्रोच
गेल्या काही वर्षात मिनिमलिस्ट जीवनशैली विकसित होते आहे. भारंभार खरेदी करण्यापेक्षा कमीत कमी संसाधनांमध्ये राहता येतं असा एक प्रवाह रुजतो आहे. कोरोनाने या प्रवाहाला खतपाणी घालून जोम दिला. दूध, भाजीपाला आणि किराणा यांच्या बळावर अनेक महिने काढता येतात हे आपल्याला समजलं. अगदी जुजबी गोष्टींमध्ये जगता येतं हे लक्षात आलं. घरातल्या अनेक वस्तूंची आवश्यकता भासत नसल्याचं ध्यानी आलं.
16. प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ ही असतेच
आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही केलं नाही किंवा करावं लागलं नाही अशा गोष्टी कोरोनाने कराव्या लागल्या. कोणी पहिल्यांदा लादी पुसली, कोणी पहिल्यांदा स्वयंपाक केला. अशी शेकडो उदाहरणं. आपल्याला हेपण येतं याचा शोध अनेकांना लागला. वेळ पडली तर हे जमू शकतं हा विश्वास अनेकांना मिळाला. काहींची मात्र पार भंबेरी उडाली. जगण्याच्या शाळेत आपली इयत्ता प्राथमिकचीच आहे याची जाणीव कोरोनाने करून दिली.
17. अॅम्ब्युलन्सचा आवाज
गाड्यांचे हॉर्न, अचानक ब्रेक मारल्यानंतरचा आवाज, हिरोगिरी करण्यासाठी जोरात बाईक चालवल्याचा आवाज, काही गाड्या खिंकाळल्यासारखं करतात तो आवाज असं सगळं आपल्या परिचयाचं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना काळात, शांत पहुडलेल्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या अॅम्ब्युलन्स काळजात धस्स करून सोडायच्या. अॅम्ब्युलन्स आली म्हणजे काहीतरी बरंवाईट घडलं असणार. काही शहरांमध्ये अचानक कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढली, त्या काळात सतत अॅम्ब्युलन्सचा तो आवाज मनात खोलवर घाव करत असे.
18. त्या मेल/फोनची भीती
कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली. आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी नोकरीच गेल्याने हजारो लोकांना उदरनिर्वाहासाठी वणवण करावी लागते आहे. एका मेलद्वारे किंवा फोन करून तुमची नोकरी गेलेय असं कळवण्यात येत आहे. पुढच्याच क्षणी तो माणूस जॉबलेस होतो आहे. तो दुर्देवी इमेल कधी येऊन इनबॉक्समध्ये थडकेल याची शाश्वती नाही. कोरोनाने अनेकांना आपलं मूळचं कामाचं क्षेत्र सोडून पडेल ते काम करायला लावलं आहे. ज्यांची नोकरी टिकली आहे त्यांच्या पगारात कपात झाली आहे.
19. आम्ही जातो आमुच्या गावा
कोरोनाच्या भीतीने असंख्यजणांनी शहराची वाट सोडून गावची वाट धरली. स्थलांतरितांचे तांडे आपण सगळ्यांनी अनुभवले. पण हे गावी परतणं सोपं नव्हतं. कोरोनाच्या सावटाखाली, वाहतुकीची साधनं नसताना, पोटात भूक पेटलेली असताना घरी परतणं अवघड होऊन बसलं. काही महिने गावी काढल्यानंतर यांच्यापैकी अनेकजण शहराकडे परतले. लाखो लोकांची ही घुसळण पाहणं अस्वस्थ करून टाकणारं होतं.
20. त्याची भीती
कोरोना झाला तर काय? माझ्यावर घरीच उपचार होतील का हॉस्पिटलात अॅडमिट करावं लागेल? घरच्यांना त्रास तर होणार नाही ना? औषधं मिळतील ना? मी बरा होईन ना? मला पूर्वीसारखं जगता येईल ना? माझ्यामुळे अन्य कोणाला हा आजार झाला नसेल ना? अशा शेकडो प्रश्नांनी सर्वसामान्य माणूस चिंतित आहे. लस कधी येणार? आली तर मला केव्हा मिळणार? त्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? एकदा लस घेतली की धोका नाही ना? लशीचे दुष्परिणाम असतात का? प्रचंड अशा अनिश्चिततेचं सावट आपल्यावर आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं सरकारकडे, शास्त्रज्ञांकडे, डॉक्टरांकडेही नाहीत. पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय आपल्याला माहिती नाही.
नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर प्रश्न आहेत, भीती आहे पण त्याचवेळी आशा आहे नव्याने उभं राहण्याची.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








