MPSC परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर, मार्च आणि एप्रिल महिन्यात होणार परीक्षा

ऑक्टोबर 2020मध्ये रद्द करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा आता मार्च आणि एप्रिल महिन्यात घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

MPSCच्या तीन परीक्षांच्या नवीन तारखा आज जाहीर करण्यात आल्या. MPSCच्या वेबसाईटवर याविषयीची माहिती आहे.

यानुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा -2020 ही रविवार 14 मार्चला घेण्यात येईल.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-2020 आता 27 मार्चला होईल.

तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही परीक्षा 11 एप्रिल 2021ला घेण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने - MPSCने नियमांमध्ये बदल करत परीक्षार्थींच्या प्रयत्न किंवा संधीच्या संख्येला मर्यादा घालून दिली होती.

MPSCचे नवीन नियम काय आहेत?

नव्या बदलानुसार, त्याप्रमाणे आता प्रत्येक खुल्या गटातील प्रत्येक उमेदवाराला सहा संधी मिळतील अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील.

तसंच, उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.

एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल.

परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू होण्यात येईल.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे IAS, IPS या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांसाठी सुद्धा संधीची संख्याही अशीच आहे. MPSC परीक्षांसाठी खुल्या वर्गासाठी सध्या वयोमर्यादा 38 वर्षे आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)