You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वर्षा संजय राऊत यांना ईडीने कोणत्या प्रकरणासाठी नोटीस बजावली आहे?
खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली. वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वर्षा राऊत चौकशीला हजर रहातील का? यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'आम्ही नोटीसला घाबरत नाही. या नोटीशीचं उत्तर दिलं जाईल. चौकशीला जायचं का नाही यावर शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नेत्यांशी चर्चाकरून निर्णय घेतला जाईल.'
पण, सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षा राऊत मंगळवारी ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाहीत.
PMC बॅंक घोटाळ्याप्रकरणी नोटीस?
वर्षा राऊत यांना कथित PMC बॅंक घोटाळ्याप्रकरणी नोटीस दिल्याची बातमी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिली आहे.
ईडीने मात्र, PMC बॅंक प्रकरणी नोटीस दिल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी राऊत कुटुंबाला HDIL कडून PMC बॅंक घोटाळ्यातील पैसे मिळाले का? असा सवाल उपस्थित केलाय.
'माधुरी आणि प्रवीण राऊत यांना HDIL कडून 55 लाख रूपये मिळाले. त्यानंतर हे पैसे वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात झाले,' असा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे.
मात्र, सोमय्या यांच्या आरोपाबद्दल माधुरी आणि प्रवीण राऊत यांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्यात पत्नीच्या नावावर 10 वर्षापूर्वी झालेल्या 50 लाख रूपयांच्या व्यवहाराची त्यांनी माहिती दिली.
'व्यवहार 10 वर्षापूर्वीचा, पण सरकारला आता जाग आली' असं राऊत म्हणाले.
हा व्यवहार नेमका काय होता?
वर्षा राऊत यांनी घर घेण्यासाठी त्यांच्या मैत्रिणीकडून 50 लाख रूपयांचं कर्ज घेतल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
'कर्ज 10 वर्षापूर्वी घेतलं. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली,' असं म्हणत संजय राऊत यांनी आर्थिक व्यवहाराप्रकरणी नोटीस आल्याचं मान्य केलं.
निवडणूक शपथपत्रात 50 लाखांच्या कर्जाची माहिती
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पत्नीने घेतलेल्या कर्जाची माहिती निवडणूक शपथपत्र आणि आयकर विभागाला दिली असल्याचं सांगितलं.
आम्ही खासदार संजय राऊत यांचं राज्यसभा निवडणुकीवेळी दिलेलं शपथपत्र तपासलं. ज्यात वर्षा राऊत यांनी 55 लाख रूपये कर्ज घेतल्याचं आढळून आलं.
वर्षा राऊत यांनी हे कर्ज माधुरी प्रवीण राऊत यांच्याकडून घेतल्याचं शपथपत्रात नमूद आहे.
कोण आहेत माधुरी प्रवीण राऊत कोण आहेत?
वाधवान यांच्या HDIL चीच एक कंपनी गुरूआशिष कंस्ट्रक्शनचे संचालक होते प्रवीण राऊत. माधुरी राऊत, प्रवीण राऊत यांच्या पत्नी आहेत.
प्रवीण राऊत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्याकडून 55 लाखांचं कर्ज घेतल्याची संजय राऊत यांच्या शपथपत्रात नोंद आहे.
यावर्षीच्या सुरूवातीला फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना 1030 कोटींच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अटक केली होती. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.
गुरूआशिष कंस्ट्रक्शनमध्ये प्रवीण राऊत यांच्यासोबत सारंग आणि राकेश वाधवान संचालक आहेत.
PMC बॅंक प्रकरणाशी संबंध काय?
कथित PMC बॅंक घोटाळा प्रकरणी HDIL कंपनीचे संचालक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक करण्यात आली होती. वाधवान यांनी PMC बॅंकेकडून कर्ज घेऊन परतफेड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
माधुरी राऊत यांनी वर्षा राऊत यांना दिलेल्या कर्ज प्रकरणाची ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती हवी आहे, अशी माहिती एबीपी न्यूजने दिली आहे. पण ईडीने अधिकृत दुजोरा दिला नाहीये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)