You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शाह यांच्या पश्चिम बंगालमधील राजकारणावर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, कोलकात्याहून
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांची भाजपमध्ये 'मेगाभरती' होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहे. पण आता या मुद्द्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष वाढत आहे.
याविरुद्ध वक्तव्य केल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या दोन नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सायंतन बासू आणि अग्निमित्र पाल अशी या दोन नेत्यांची नावे आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना प्रवेश देण्यावरून पक्षांतील नेत्यांकडून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
ज्या भागात पक्ष मजबूत आहे, तिथंसुद्धा इतर पक्षातील नेत्यांना का प्रवेश देण्यात येत आहे, असं विचारण्यात येत आहे. तिथल्या मूळ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष का केलं जात आहे, असंही विचारलं जात आहे.
बाबुल सुप्रियो यांच्या नाराजीमुळे भाजप नेत्यांनी आसनसोल तृणमूल काँग्रेस अध्यक्ष, पांडवेश्वर येथून आमदार असलेल्या जितेंद्र तिवारी यांना प्रवेश नाकारला. त्यामुळे त्यांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये परतावं लागलं.
पण बाकीचे नेते बाबुल सुप्रियो यांच्याइतके शक्तिशाली नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा राष्ट्रीय नेत्यांवर प्रभाव पडत नाही.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट
बांकुडा जिल्ह्यातील बिष्णुपूरचे भाजप खासदार सौमित्र खाँ यांची पत्नी सुजाता मंडल खाँ यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना मलईदार पदांची लालुच दाखवून आपल्या गोटात सहभागी करून घेत असल्याचा आरोप मंडल खाँ यांनी केला होता.
त्यांच्या मते, "संधीसाधू आणि दलबदलू नेत्यांना पक्षात घेतलं जात आहे. यामुळे पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये असंतोष वाढत आहे."
गेल्या आठवड्यात जुन्या वादातून मेदिनीपूर आणि दुर्गापूर येथे भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली होती.
या परिसरात तृणमूल बंडखोर नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निषेध नोंदवत पोस्टरबाजीही झाली.
तृणमूल काँग्रेसच्या जितेंद्र तिवारी यांना पक्षात प्रवेश देण्याला सार्वजनिकपणे विरोध करणाऱ्या प्रदेश सरचिटणीस सायंतन बासू आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा अग्निमित्र पाल या भाजपच्या दोन नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आता या दोन्ही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
काही नेत्यांकडून खुलेआम विरोध
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सामील होणाऱ्या नेत्यांची संख्या वाढतच चालली आहे. भाजपचे मूळ नेते याचा पक्षांतर्गत आणि सार्वजनिकरित्याही विरोध करताना दिसत आहेत.
राज्यातील मूळच्या भाजप नेत्यांनी आपला जीव मुठीत घेऊन याच तृणमूल काँग्रेसविरुद्ध लढा दिला होता. आता त्याच पक्षातून येणाऱ्या नेत्यांना मलईदार पदे देण्यात येतील, तिकीट वाटपात त्यांना प्राधान्य दिलं जाईल, अशी भीती पक्षातील नेत्यांना आहे.
पण पक्षात असंतोष असूनसुद्धा भाजपचे वरीष्ठ नेते तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षातून उठणारा आवाज दाबण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. आतापर्यंत चार नेत्यांना पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपात कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
पश्चिम बंगाल भाजपकडून पक्षातील नेत्यांना कठोर इशाराही देण्यात येत आहे. प्रदेश भाजप प्रवक्ते शमिक भट्टाचार्य म्हणतात, "संघटनात्मक गोपनीयता, मूल्यांवर दृढ विश्वास आणि नेतृत्वाबाबतची निष्ठा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याची प्राथमिक अट असते."
प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या मते, "नेते नवे असोत किंवा जुने सर्वांनी नियम पाळले पाहिजेत. पक्षाविरुद्ध जाणाऱ्या नेत्यांवर कारवाई जरूर करण्यात येईल."
पण आसनसोलच्या जितेंद्र तिवारी यांचा विरोध तर स्थानिक खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनीच केला होता.
अशा स्थितीत फक्त सायंतन आणि अग्निमित्रा यांच्यावरच कारवाई का झाली? या प्रश्नावर उत्तर देताना घोष म्हणाले, "बाबुल यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कोणत्या नेत्याला प्रवेश द्यावा, याचा निर्णय शेवटी पक्षच घेईल."
एका वरीष्ठ नेत्याच्या मते, सायंतन आणि अग्निमित्रा यांना नोटीस बजावून बाबुल यांना अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे.
पक्षात वाढत चाललेल्या असंतोषाबाबत भाजप नेते बोलणं टाळत आहेत. पण इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांच्या इतिहासामुळेही मूळ नेत्यांना काळजीत टाकले आहे.
उदाहरणार्थ, उत्तर बंगालमध्ये नागराकाटा येथील तृणमूल आमदार सुकरा मुंडा यांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजप पहिल्या स्थानावर होता.
भाजपला किती फायदा?
अशा स्थितीत मुंडा यांच्या प्रवेशाने भाजपला किती फायदा होईल, हा प्रश्न आहे. असाच प्रश्न मालदा जिल्ह्यातील गाजोल येथून आमदार असलेल्या दीपाली विश्वाल यांच्याबाबतही विचारला जात आहे.
प्रदेश भाजपच्या नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर काही गोष्टी सांगितल्या. मागच्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी लक्षात घेतल्यास दीपाली यांच्या प्रवेशाना पक्षाला काही खास फायदा होईल, असे चिन्ह नाहीत.
पुरुलियाचे काँग्रेस आमदार सुदीप मुखर्जीही भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात भाजपला 53 टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला फक्त 4.6 टक्के.
त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने कुणाचं भलं होईल? जर या नेत्यांना प्रवेश दिल्याचा राजकीय लाभ होणार नसेल तर त्याचा उपयोग काय? इतर पक्षांना तोडल्याची बदनामी भाजप का सहन करत आहे?
या प्रश्नाचं उत्तर देणं प्रदेश भाजपच्या नेत्यांनी टाळलं.
प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष सांगतात, "पक्ष-संघटन मजबूत करण्यासाठीच इतर नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात येत आहे."
पण राज्यातील इतर नेते त्यांच्या मताशी सहमत नाही. त्यांच्या मते याचा मूळ नेत्यांवर परिणाम होईल. ते निष्क्रिय होतील. त्यामुळे पक्षाचं नुकसानच जास्त होईल.
पक्षविरोधी कृत्यांबाबत कारवाईच्या भीतीने कोणताही नेता सार्वजनिकरित्या काही बोलण्यास तयार नाही. एका असंतुष्ट नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर काही चर्चा केली.
बंगाल भाजपमध्ये सध्या केंद्रीय नेतृत्वाचं शासन सुरू आहे. कुणाला पक्षात प्रवेश द्यावा, याचा निर्णय दिल्लीत केला जातो. आमच्या मताला सध्या महत्त्व नाही, असं ते म्हणाले.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सौगत राय यांच्याशीही आम्ही चर्चा केली. इतर पक्षांना फोडल्यामुळे भाजपला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होईल. तृणमूल सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांना यावेळी तिकीट मिळण्याची शक्यता नाही. आता हे लोक भाजपमध्ये जाऊन असंतोषात भर घालत आहेत, असं त्यांनी म्हटलं.
तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि संसदीय कार्य मंत्री पार्थ चटर्जी यांच्या मते, "भाजप इतरांचं घर फोडत आहे. त्यामुळे त्यांच्या घरात वाद वाढला आहे. आपली कोणतीच संघटना नसल्यामुळे त्यांनी इतर नेत्यांना हाताशी धरून स्वतः मजबूत बनण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत."
दुसरीकडे, दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपने फक्त बंडखोर आणि वादग्रस्त नेत्यांच्या साहाय्याने तृणमूलचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतला का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
ही चर्चा निराधार अशी म्हणता येणार नाही. तृणमूल काँग्रेस सोडून दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले मुकूल रॉय किंवा नुकतेच दाखल झालेले शुभेंदू अधिकारी. कुणाचीही प्रतिमा स्वच्छ नाही.
दोन्ही नेत्यांवर शारदा चिटफंड घोटाळ्यात भ्रष्टाचाराच्या आरोप आहेत. त्याशिवाय मुकूल रॉय यांच्यावर तृणमूल काँग्रेस आमदार सत्यजित विश्वास यांच्या हत्येचाही आरोप आहे. हत्येचा तपास करण्यासाठी बनवलेल्या CID पथकाने आरोपपत्रात रॉय यांचंही नाव दिलं आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांकडून भाजपला खास काही फायदा होणार नाही. पण इतर पक्षांना थोडाफार फटका बसू शकतो.
राजकीय विश्लेषक विश्वनाथ चक्रवर्ती याबाबत सांगतात, "भाजप सध्या स्वतःला मजबूत बनवण्याऐवजी इतरांना कमकुवत बनवण्याच्या रणनितीनुसार काम करत आहे. वादग्रस्त नेत्यांना पक्षात प्रवेश मिळताच त्यांचे भ्रष्टाचाराचे जुने रेकॉर्ड मिटतात. उदाहरणार्थ, शुभेंदू अधिकारी पक्षात दाखल होताच भाजपने त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांचा एक व्हीडिओ हटवला. या व्हीडिओत शुभेंदू अधिकारी नारदा स्टींग प्रकरणात पैसे घेताना दिसत होते. युद्ध, प्रेम आणि राजकारणात सर्व काही माफ असतं, हेच भाजपला दर्शवून द्यायचं आहे, असं दिसतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)