You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांना ममता बॅनर्जींचा फोन, भाजपविरोधी मेळाव्यासाठी तृणमूलची तयारी
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. भाजप विरोधी मेळाव्यासाठी ममता बॅनर्जी यांची शरद पवारांशी फोनवरून चर्चा
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. मुख्य लढत ही तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात होणार आहे. यासाठी मुख्यमंत्रीआणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी पुढील महिन्यात भाजपच्या विरोधात मेळावा घेणार असल्याचे वृत्त आहे. झी 24 तासने हे वृत्त दिले आहे.
या मेळाव्यासाठी ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधी पक्षांशी संपर्क साधल्याचेही समजते. यासाठी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरचर्चा केली.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टालिन यांनाही ममता बॅनर्जी यांनी संपर्क केल्याचे समजते.
ममता बॅनर्जी यांच्या भाजप विरोधी मेळाव्यात या नेत्यांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे.
2. परदेशी निधी मिळण्यावरून बँकेचा इशारा, आंदोलक शेतकरी संघटनेची माहिती
पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका शेतकरी संघटनेवर परवानगी न घेता परदेशी निधी स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारतीय किसान युनियनचा दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग आहे. या संघटनेला बँकेने परदेशी निधीसंदर्भात इशारा दिला असून अनिवार्य असलेली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. एनडीटिव्हीने हे वृत्त दिले आहे.
संघटनेचे सचिव सुखदेवसिंह कोकरी कलान यांनी सांगितले, पंजाब आणि सिंध बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोलवून फॉरेक्स विभागाच्या एका मेलची माहिती दिली.
गेल्या दोन महिन्यात संघटनेला 8-9 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केल्याचंही ते म्हणाले.
हा निधी सहसा परदेशात राहणाऱ्या पंजाबी लोकांकडून पाठवला जातो. समाजकार्यासाठी असा निधी पंजाबी लोक देत असतात असंही सुखदेवसिंह कोकरी कलान यांनी स्पष्ट केले.
3. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यातील हजारो शेतकऱ्यांची नाशिक ते हरियाणा वाहन रॅली
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून पाच हजारांहून अधिक शेतकरी सोमवारी (22 डिसेंबर) नाशिक ते दिल्ली वाहन रॅली निघाली आहे. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
अखिल भारतीय किसान सभा या रॅलीचे उद्घाटन करणार असून राज्यातील 20 जिल्ह्यांतून शेतकरी या रॅलीत सहभागी होणार आहेत.
1,226 किमी प्रवास करत वाहन रॅली राजस्थान-हरयाणा सीमेवर 24 डिसेंबरला पोहचेल.
अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी सांगितले, "दिल्लीत जे काही चाललंय ते फक्त पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांमुळेच आहे, असा प्रचार सरकार करत आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी सुमारे 1300 किलोमीटरचा प्रवास करतील तेव्हा सरकारपर्यंत आमचीही भूमिका स्पष्टपणे पोहचेल."
4. पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजप खासदाराचा घटस्फोटाचा इशारा
आपल्या पत्नीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आपण घटस्फोटासाठी अर्ज करणार असल्याचे भाजपच्या एका खासदाराने सांगितले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सुजाता मंडल-खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पती भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राजकारणाने आमचे लग्न मोडले अशी प्रतिक्रिया दिली.
सौमित्र खान तृणमूल काँग्रेसचे माजी नेते आहेत. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला असून ते आता पश्चिम बंगालच्या भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
सुजाता खान यासुद्धा भाजपच्या नेत्या होत्या. एका अभियानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही त्या व्यासपीठावर दिसल्या. पण भाजपमध्ये माझ्या मेहनतीचा आदर केला जात नसल्याचा आरोप सुजाता खान यांनी केला आहे.
"माझ्या पतीचा लोकसभा निवडणुकीत विजय व्हावा यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. सौमित्र खान यांना निवडणुकीपूर्वी मतदारसंघात जाण्यापासून न्यायालयाने बंदी घातली होती. एका फौजदारी खटल्यात जामीनासाठीही अट घालण्यात आली होती. यावेळी आपणच खान यांचा प्रचार केला होता," असा सुजाता यांचा दावा आहे.
5. केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं - रोहित पवार
दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन, ऊस, कडधान्य आणि भातशेतीला फटका बसला होता. याची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ही बातमी पुढारीने दिली आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे 'पेशंट दगावल्यानंतर डॉक्टर येणं', असला प्रकार असल्याचं म्हणत रोहित पवारांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)