You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : मुंबईत रात्रीची संचारबंदी, सर्व महापालिका क्षेत्रात नियम लागू
नाताळच्या सुट्टीत आणि नवीन वर्षाच्या सरतीला कोरोना संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेता उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू (रात्रीची संचारबंदी) लावण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात 22 डिसेंबरपासून रात्री 11 वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू असेल.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली.
युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसंच, अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्टेन) आढळून आल्याने राज्यात खबरदारी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. "येणारे 15 दिवस अधिक सतर्क रहावं लागेल," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवीन कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. या विषाणूची घातकता येणाऱ्या काही दिवसात कळेल. त्यामुळे राज्यात अधिकची सतर्कता बाळगली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत."
युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.
ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमानं उतरतात. अशा पालिका आयुक्तांनी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणं असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेत.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीतील महत्त्वाचे मुद्दे :
- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून (22 डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील.
- ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
- संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (RTPCR) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.
- ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
- अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
- युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणं गरजेचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)