ख्रिसमसच्या दिवशी अमेरिकेत स्फोट, पोलिसांकडून तपास सुरू

अमेरिकेच्या टेनेसी प्रांतातील नॅशविल शहरात ख्रिसमसच्याच दिवशी एक स्फोट झाला.

या बॉम्बस्फोटाचा संबंध एका वाहनाशी असून हा स्फोट हेतूपुरस्सरपणे करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यानंतर सिटी सेंटर परिसरात धुराचे लोळ उठले होते.

या स्फोटात तीन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

स्फोटामुळे एका पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला जखम झाली आहे. पोलिसांनी एका संशयित वाहनाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. घटनास्थळी हे वाहन संशयास्पदरित्या फिरताना आढळून आलं होतं.

हेतूपुरस्सरपणे केलेला स्फोट

पोलिसांचे प्रवक्ते डॉन आरॉन यांनी पत्रकारांना या स्फोटाबाबत माहिती दिली. सध्यातरी हा स्फोट हेतूपुरस्सरपणे केला आहे, एवढं आपण सांगू शकतो.

अल्कोहोल, टोबॅको आणि फायरआर्म्स ब्युरोचे तपासकर्ते आणि FBI चं पथक घटनास्थळी उपस्थित आहे. पण या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

सकाळी सहा वाजता गोळीबाराची तक्रारही आल्याचं प्रवक्त्यांनी सांगितलं.

"बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोहोचलं, त्यावेळी तिथं एक वाहन संशयास्पदरित्या उभं होतं. काही वेळात या वाहनात स्फोट झाला. त्यावेळी वाहनात कुणी बसलेलं होतं किंवा नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही," असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)