You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यशोमती ठाकूर यांचा इशारा : 'स्थिर सरकार हवं असेल तर काँग्रेस नेतृत्वाविषयी वक्तव्यं करणं थांबवा'
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची नुकतीच वर्षपूर्ती झाली. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीलाही महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरी गेली. या निवडणुकीतील विजय साजरा केल्यानंतर काही तासातच महाविकास आघाडीत पहिली ठिणगी पडल्याचं चित्रं आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांना स्थिर सरकार हवं असेल, तर त्यांनी काँग्रेस नेतृत्त्वाविषयी वक्तव्य करणं थांबवावं, असा इशारा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आणि काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?
"महाराष्ट्रात स्थिर सरकार हवं असेल तर काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करणं थांबवावं, असं आवाहन मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्ष या नात्याने महाविकास आघाडीतील सहकारी नेत्यांना करते. प्रत्येकाने आपल्या आघाडीचे मूलभूत नियम पाळावेत," असं ट्वीट मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं.
"आमचं नेतृत्व हे अतिशय शक्तिशाली आणि स्थिर आहे. आमचा लोकशाही मूल्यावर प्रचंड विश्वास असल्यानेच राज्यात महाविकास आघाडी सरकार बनू शकलं," असंही ठाकूर पुढे म्हणाल्या.
यशोमती ठाकूर यांनी शनिवारी (5 डिसेंबर) सकाळी हे ट्वीट केलंय. यात त्यांनी काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणूगोपाल, एच. के. पाटील, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही टॅग केलंय.
हे ट्वीट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाच्या वक्तव्याबाबत ही प्रतिक्रिया दिली, याचा उल्लेख केला नाही. पण या ट्वीटवरून राज्य तसंच देशातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
3 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकमत मीडिया ग्रुपचे अध्यक्ष विजय दर्डा यांना एक मुलाखत दिली होती.
या मुलाखतीत शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्याच्याकडेच यशोमती ठाकूर यांचा रोख असल्याचं सांगितलं जात आहे.
विजय दर्डा यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी काँग्रेसमधील नेतृत्त्व आणि पक्षाची पुढील दिशा या विषयावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.
याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची मान्यता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किती आहे, हे महत्त्वाचं असतं. आज काँग्रेस पक्षातील रँक अँड फाईटची मनस्थिती लक्षात घेतली तर अजूनही नेहरू घराण्याविषयीची आस्था काँग्रेस पक्षात आहे. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी हे दोघेही त्या कुटुंबाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने बहुसंख्य लोक त्या विचारांचे आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे."
दरम्यान, दर्डा यांनी पवार यांना ओबामा यांच्या राहुल गांधीवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली. त्याबाबत बोलताना ओबामा यांनी भारताच्या अंतर्गत विषयांवर वक्तव्य केलं नसतं तर बरं झालं असतं, असंही पवार यांनी म्हटलं.
यामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात सातत्य कमी आहे, या शरद पवारांच्या वक्तव्यावरूनच वाद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये आहे आणि याच वक्तव्याला डोळ्यांसमोर ठेवून यशोमती ठाकूर यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलं जातंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)