You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यशोमती ठाकूर यांना पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारल्याप्रकरणी 3 महिन्यांची शिक्षा
पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. 2012 मध्ये यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहरात एका ट्रॅफिक पोलिसावर हात उगारला होता.
24 मार्च 2012 रोजी अमरावतीमधल्या अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिसासोबत अॅड. यशोमती ठाकूर यांनी वाद घातला आणि मारण्याचा प्रयत्न केला. यशोमती ठाकूर तेव्हा आमदार होत्या. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर 2012मध्ये दाखल करण्यात आला होता.
आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा न्यायालयात हे आरोप सिद्ध झाले आणि न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड सुनावला.
ठाकूर यांच्यासोबतच त्यांचे कार चालक आणि दोन कार्यकर्त्यांनाही दोषी ठरवण्यात आलेलं आहे. तर फितूर होऊ साक्ष दिल्याबद्दल एका पोलिसालाही शिक्षा सुनावण्यात आलीय.
या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना जामीन मिळालेला आहे.
न्यायालयाने सुनावलेल्या या निर्णयाबद्दल बोलताना महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, " न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. याक्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल."
"कर्तव्य करणाऱ्या एका पोलिसावर हात उचलण्याचा गंभीर गुन्हा यशोमती ठाकूर यांनी केला असल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही," अशी मागणी भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.
याविषयी प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, "बाकी राजीनामा देण्याच्या मागणीबाबत, तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे, आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील."
तर "एका जुन्या केस चा निकाल लागला त्या आधारे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचा राजीनामा भाजपा मागत आहे. त्यांचा या देशाच्या न्याय प्रक्रियेवरच विश्वास नाही. या प्रकरणात यशोमती ठाकूर यांनी हायकोर्टात जायचा निर्णय घेतला आहे. बाकी जलयुक्त शिवारची चर्चा मीडियातून गायब करण्यासाठी भाजपं याचा राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करतेय. पण राज्याची जनता सूज्ञ आहे, ती भाजपच्या अजेंड्याला बळी पडणार नाही," असं महारष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)