उद्धव ठाकरेंवर सतत टीका केल्याने त्यांना फायदा होईल की नुकसान?

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याची वर्षपूर्ती पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये होईल. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि इतिहासात पहिल्यांदाच 'ठाकरे' मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेला वर्ष होत आले तरी मुख्यमंत्रिपदाचा मुकूट काटेरी असल्याची जाणीव विरोधकांकडून सतत करून दिली जात आहे.

ठाकरे सरकार स्थिरावलं नाही तोवर कोरोना आरोग्य संकटाने हाहाकार माजवला. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा कसोटीचा काळ होता. या दरम्यानही आरोग्य व्यवस्था, स्थलांतरितांचा विषय आणि मराठा आरक्षणासारख्या मुद्यांवरून भाजपने ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

लॉकडॉऊनमुळे सर्वकाही ठप्प असल्याने राज्यासमोर पुन्हा नवीन संकट उभं ठाकलं ते म्हणजे आर्थिक संकट. त्यापाठोपाठ सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरूनही ठाकरे सरकारला घेरण्यात आलं.

दुसऱ्या बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून वेळोवेळी जाब विचारला जात होता. पदवी परीक्षांचा निर्णय असो वा प्रार्थनास्थळं खुली करण्याबाबतचा निर्णय राज्यपालांनीही उद्धव ठाकरेंकडे स्पष्टीकरण मागितले.

एवढेच नव्हे तर अभिनेत्री कंगना राणावत आणि अमृता फडणवीस यांच्यासारख्या विरोधकांकडूनही थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जाते.

सध्या चहूबाजूंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली जातेय. अशा सततच्या आरोपांमुळे किंवा टीकेमुळे ठाकरे कुटुंबातील पहिल्यावाहिल्या मुख्यमंत्र्यांचे राजकीयदृष्ट्या नुकसान होईल की त्यांना याचा फायदा होईल ?

उद्धव ठाकरेंना टार्गेट केले जात आहे का?

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून विरोधी पक्ष असलेला भाजप सतत नेतृत्त्वावर टीका करत आहे. नेतृत्त्व सक्षम नसून कामाचा अनुभव नाही इथपासून ते मुख्यमंत्री घरी बसून राज्याचा गाडा हाकतात असा आरोप भाजप आणि मनसेकडून करण्यात येतो.

नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात धार्मिकस्थळं खुली करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. या पत्रात हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही उद्धव ठाकरेंच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

हिंदुत्ववादी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरेंवर सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड केल्याची टीका भाजपकडून केली जात आहे.

कोरोना संकटकाळात गर्दी होऊ नये या उद्देशाने राज्यातील धार्मिकस्थळं खुली करण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले आहे.

असे असले तरी भाजपने राज्यव्यापी आंदोलन करून या मुद्यावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याची टीका, कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि स्थलांतरितांचा मुद्दा, पदवी परीक्षा, सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाची चौकशी आणि युवा नेता, मराठा आरक्षण, चाकरमान्यांसाठी रेल्वे लोकल आणि आता धार्मिकस्थळं खुली करण्याचा विषय अशा सर्व मुद्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येतोय.

अभिनेत्री कंगना राणावतने तर उद्धव ठाकरेंचा एकरी उल्लेख केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना 'बेभरवशाचा प्राणी' असे म्हटले आहे.

राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सांगतात, "उद्धव ठाकरेंवर चहूबाजूंनी टीका करण्याचे कारण म्हणजे ते राज्याचे नेतृत्व करत आहेत. नेतृत्वावर टीका म्हणजे सरकारवर टीका असते. नेतृत्वाकडून एखादी चूक झाल्यास त्याचा परिणाम निर्णयक्षमतेवर होतो."

भाजप आणि मनसे पाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीकडूनही सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. धार्मिकस्थळं खुली करण्याचे आंदोलन प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरहून सुरू केले होते. तर आता राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "ठाकरे सरकारवर टीका करणारी सर्व मंडळी ही एकाच वर्गातील आहे. संघ विचारधारेचे लोक उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात. भाजप विस्तारित गट सोडला तर कुणीही ठाकरे सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करत नाही."

सततच्या टीकेचा उद्धव ठाकरेंना फायदा होणार की तोटा?

आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर अनेक बड्या नेत्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अशा टोकाच्या द्वेषाला सामोरं जावं लागलं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितूनच मोठे नेते जन्माला आल्याचीही उदाहरणं आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचं धनुष्य पेलणार का अशी शंकाही अनेकांना होती.

प्राध्यापक प्रकाश पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "उद्धव ठाकरेंबद्दल लोकांना आधी स्पष्ट आणि सविस्तर माहिती नव्हती. उद्धव ठाकरे राजकारणात नवीन आहेत असा एक चुकीचा ग्रह सुरूवातीला केला गेला. पण मुख्यमंत्रिपदाच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनाही थेट जनतेशी संपर्क साधण्याची संधी मिळाली."

"उद्धव ठाकरे हे ज्येष्ठ लेखक प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे राजकारण आणि समाजकारणाची समज त्यांच्या उपजत आहे हे लोक विसरले होते." असंही प्रकाश पवार सांगतात.

गेल्या दहा महिन्यांपासून उद्धव ठाकरेंना प्रशासकीय कामापासून ते कौटुंबिक अशा सर्व आरोपांना सामोरे जावे लागले. "भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याने त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले जात आहे हे उघड आहे." असं सुनील चावके सांगतात.

सत्ताधारी कोणताही पक्ष असो विरोधकांकडून टीकेचा धनी मुख्यमंत्र्यांना व्हावे लागते. एखाद्या नेत्यावर सतत टीका होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

"एकेकाळी नरेंद्र मोदींवरही प्रचंड आरोप करण्यात येत होते. केवळ गुजरातमध्येच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही त्यांचे नाव चर्चेत राहू लागले. आज ते देशाचे पंतप्रधान आहेत." असंही सुनील चावके सांगतात.

आज उद्धव ठाकरे केवळे मुंबईचे नेते म्हणून नाही तर महाराष्ट्राचे नेते म्हणून ओळखले जातात. "त्यांची प्रतिमा आता केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. कोरोना संकट काळात त्यांनी सतत जनतेशी संवाद साधला आहे. कितीही टीका होत असली तरी हे संकट जनता विसरणार नाही." असं विजय चोरमारे सांगतात.

एखाद्या नेत्यावर सातत्याने जेव्हा टीका केली जाते तेव्हा त्या नेत्याची दखल माध्यमांकडूनही अधिक घेतली जाते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या विरोधात भूमिका घेतली गेली किंवा त्यांच्या निर्णयावर टीका करण्यात आली की माध्यमांमध्येही त्याची चर्चा होते.

"ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप राज्यपालांचाही वापर करून घेत आहे हे लोकांनाही दिसते आहे. ही भाजपची अनाठायी ओरड आहे असाही लोकांचा समज होऊ शकतो. यामुळे उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेत वाढच होईल." असंही सुनील चावके सांगातात.

उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्युत्तरादखल पाठवलेल्या पत्राचीही प्रचंड चर्चा झाली.

प्रकाश पवार सांगतात, "उद्धव ठाकरेंनी बहुजन हिंदुत्व आपल्या पत्रातून मांडले आहे. बहुजन हिंदुत्व हा गाभा असलेल्या या पत्राची भाषा आणि सुस्पष्टता लोकांच्या मनाला भावली आहे. या पत्राचे दाखले पुढील अनेक वर्ष दिले जातील."

उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर ही टीका पडू शकते का?

शिवसेना आणि भाजप सध्या आमने-सामने असले तरी भविष्यात हे विरोधक म्हणूनच राहतील की पुन्हा युती होईल याबाबतही अनिश्चितता कायम आहे.

शिवसेनेकडून राज्यातील भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले जात असले तरी थेट नरेंद्र मोदींवर टीका करणं टाळले जाते याची प्रचिती कृषी विधेयकावेळीही आली आहे.

"उद्धव ठाकरे त्यांच्या भूमिकांवर कधीपर्यंत ठाम राहतात हे पहावे लागेल. भाजपविरोधी मते कायम राहतील का यावर सर्व अवलंबून आहे. भाजपसोबतचा दरवाजा उघडा ठेवला आहे." असं विजय चोरमारे सांगतात.

ठाकरे सरकारविरोधात भाजप भूमिका घेत असले तरी विरोधक म्हणून सरकारच्या निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार त्यांना असल्याचं नाकारता येत नाही. 105 आमदार असलेला भाजप ताकदवान विरोधी पक्ष आहे.

"विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांच्यावरही विरोधकांकडून प्रचंड टीका होत होती. पण विरोधकांसमोरही हसतमुखाने काम करण्याची शैली त्यांच्याकडे होती. अनेक वेळा मंत्र्यांपेक्षा जास्त कामं विरोधकांची केली जायची असेही मुख्यमंत्री होते. त्यामुळे विरोधकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना काम करावं लागणार आहे," असंही सूर्यवंशी म्हणाले.

पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना कायम राहील याचीही शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिकूल परिस्थितीत मोठे झालेले नेते

1993 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टोकाचे आरोप झाले होते. भाजपकडून मुंबई बाँबस्फोटानंतर दाऊदसोबत संबंध असल्याच्या आरोपांची राळ उठवली गेली होती. त्यानंतर 1995 मध्ये काँग्रेसचे सरकार पडले आणि भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. पण यानंतरही शरद पवारांचा आलेख मोठाच होत गेला. राष्ट्रीय पातळीवर ते मोठे होत गेले.

2004 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधीवर परदेशी असल्याची वारंवार टीका करण्यात आली होती. त्यांना हिंदी बोलता येत नाही म्हणून विरोधकांकडून त्यांची खिल्ली उडवण्यात आली. पण जनमत तयार करण्यात भाजपला यश आले नाही आणि 2004 मध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली.

आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांना मात्र काँग्रेसमध्ये डावलण्यात आले. यामुळे त्यांनी वायएसआर काँग्रेस हा दुसरा पक्ष काढला. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते.

जगनमोहन रेड्डी यांच्यावर अवाजवी मालमत्ता जमवल्या प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली. प्रसंगी जेलमध्येही जावे लागले. पण यातून बाहेर आल्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी निवडणूक लढली आणि ते जिंकलेही. आता ते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)