यशोमती ठाकूर: काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या नेत्या

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठी

"शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर चित्र काही वेगळच असतं. शरद पवार काळाची गरज आहेत. कोणी कितीही तीर मारले तरी सरकार अस्थिर होणार नाही," असं वक्तव्य महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली.

यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या आक्रमक आणि निष्ठावान नेत्या म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. यापूर्वीही त्या विविध कारणांनी चर्चेच्या केंद्रस्थानी होत्या.

याआधी पोलीस हवालदारावर हात उगारल्या प्रकरणात अमरावती जिल्हा न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजाराचा दंड सुनावला होता. त्यावेळी बीबीसी मराठीनं यशोमती ठाकूर यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला होता.

हे काही एकच प्रकरण नाही, याआधी आणि नंतरही यशोमती ठाकूर वेगवेगळ्या प्रसंगावेळी त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत आल्या आहेत.

खरंतर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेपासून राजकीय संघर्ष करत महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत यशोमती ठाकूर पोहोचल्या आहेत. त्यांच्या या राजकीय प्रवासाबद्दल आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी, ज्या वादामुळे त्या आता चर्चेत आल्या आहेत, ते नेमकं काय प्रकरण आहे, हे थोडक्यात पाहू.

यशोमती ठाकूर आता चर्चेत का आल्या आहेत?

आठ वर्षांपूर्वी म्हणजे 2012 साली अमरावती शहर वाहतूक पोलिसांशी यशोमती ठाकूर यांचा वाद झाला होता. अमरावतीच्या वरिष्ठ पोलिसांच्या आदेशावरून गांधी चौक ते चुना भट्टी असा 'वन वे' ठरवण्यात आला होता आणि बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. मात्र, एका कार्यक्रमानिमित्त जाण्यासाठी निघालेल्या यशोमती ठाकूर यांनी वन वेमधूनच गाडी नेली. त्यामुळे पोलीस हवालदाराने त्यांची गाडी अडवली.

आमदारांची गाडी अडवल्याने यशोमती ठाकूर यांच्यासोबतचे तीन कार्यकर्ते संतापले. पोलीस हवालदार आणि त्यांच्या बाचाबाची झाली. हा वाद काहींनी मोबाईलमध्ये शूट केला. त्यामुळे यशोमती ठाकूर यांच्यासह चार जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि ड्यूटीवरच्या पोलिसाला मारहाण करणे असे गुन्हे दाखल झाले.

याच प्रकरणात अमरावती जिल्हा न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजाराचा दंड ठोठावला.

असा आहे यशोमती ठाकूर यांचा प्रवास

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला व बालविकास मंत्रिपदाचा कार्यभार आला.

अॅड. यशोमती ठाकूर या मूळच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी इथल्या आहेत. त्या 2009 पासून तिसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

यशोमती ठाकूर यांना त्यांच्या वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला. त्यांचे वडील भैयासाहेब उर्फ चंद्रकांत ठाकूर यांनी देखील तिवसा मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केलं. काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते होते. त्यामुळे यशोमती ठाकूर यांच्यावर लहानपणापासून काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांच्या आजीदेखील जिल्हा परिषद सदस्य होत्या.

2004 मध्ये तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पराभवानंतर त्या खचून गेल्या नाही. त्या अधिक जोमाने कामाला भिडल्या. त्यानंतर लवकरच काँग्रेसच्या युवा नेता म्हणून त्या पुढे आल्या.

2004 ते 2009 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी निवड झाली. या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

राहुल गांधीच्या यंग ब्रिगेडमध्ये त्यांचा समावेश झाल्यावर गुजरात, दीव-दमण, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्याच्या निरीक्षकाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली. यासोबतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव पदावरही त्यांची निवड झाली. सध्या त्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव आणि महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत.

2004 मध्ये राजकीय आखाड्यात पराभूत झाल्यानंतर, मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक धडक आंदोलने केली. या कामाच्या जोरावर 2009 मध्ये यशोमती ठाकूर पहिल्यांदा विधानसभेत गेल्या. त्यानंतर सलग तीनवेळा त्या तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

मात्र 2014 ची निवडणूक यशोमती ठाकूर यांच्यासाठी भावनिक आणि तेवढीच आव्हानात्मक होती. कारण या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी होती, त्यांचीच सख्खी बहीण. दोन सख्या बहिणी एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. 2014 मध्ये यशोमती ठाकूर दुसऱ्यांदा आमदार झाल्या, मात्र राज्यात भाजप- शिवसेना यांचं सरकार सत्तेवर आले. या कार्यकाळात त्यांनी अनेक आंदोलन करुन स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं.

2019 च्या निवडणुकीतही यशोमती ठाकूर यांनी बाजी मारली. यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिऴून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं.

मात्र, मंत्रिपदानंतर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या सतत चर्चेत राहिल्या. 'विरोधी पक्षाकडे भरपूर पैसा आहे तो घ्या पण मतदान पंजालाच द्या', 'गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते', अशा वादग्रस्त विधांनामुळे त्या प्रचंड वादात सापडल्या होत्या.

गेल्यावर्षी कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेच्या घडामोडी घडत होत्या, त्यावेळी बंडखोर काँग्रेस आमदारांनी मुंबईत आश्रय घेतला होता. त्यावेळी कर्नाटकमधील काँग्रेस आमदार श्रीमंत पाटील यांना हृयासंबंधीच्या आजारावर उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी डॉक्टरांशी बाचाबाची केली होती. 'कार्डिअॅक यूनिट नसताना पाटील यांच्यावर कसे उपचार करत आहात, मला आमच्या आमदाराला भेटू द्या', असा सवाल करत हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला होता.

यशोमती ठाकूर यांच्या आक्रमक स्वभावाचे सार्वजनिक स्तरावर अनेक प्रसंग समोर आले आहेत.

वरिष्ठ राजकीय पत्रकार प्रमोद चुंचूवार यांनी यशोमती ठाकूर यांचा राजकीय प्रवास जवळून पाहिला आहे. त्यांच्याशी बीबीसी मराठीनं यशोमती ठाकूर यांच्या या आक्रमक स्वभावाबद्दल बातचीत केली.

'हमरीतुमरीची आक्रमकता योग्य दिसत नाही'

प्रमोद चुंचूवार म्हणतात, "राडा संस्कृती ही काही काँग्रेसची ओळख नाही. काँग्रेस भवनात राहून पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केलीय. पण बाहेर जाऊन कुणा अधिकाऱ्याशी बाचाबाची करणं वगैरे करत नाहीत. मात्र, यशोमती ठाकूर याला अपवाद ठरत आहेत. हमरीतुमरीची आक्रमकता योग्य दिसत नाही. शिवाय या वर्तनातून अहंकारसुद्धा दिसून येतो."

कायद्याच्या चौकटीत राहून आपले प्रश्न सुटू शकत नाहीत, असं आमदारांनाच वाटत नसेल, तर लोकांनी कुणावर विश्वास ठेवावा? असा सवाल प्रमोद चुंचूवार उपस्थित करतात.

मात्र, त्याचवेळी प्रमोद चुंचूवार असंही सांगतात की, "यशोमती ठाकूर यांच्या अशा वागण्यामागची कारणमीमांसा करायला हवं. तर असं लक्षात येईल की, यशोमती ठाकूर यांना मोठा संघर्ष करावा लागला. पुरुषसत्ताक वर्तुळात त्यांनी स्वत:चं नेतृत्त्व आता सिद्ध केल्याचं दिसतं. पण त्यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे. पुरुषप्रधान राजकारणात त्यांना अशी आक्रमकता कदाचित अपरिहार्यही वाटली असावी."

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील या अमरावती जिल्ह्यातीलच. प्रतिभा पाटील काँग्रेस पक्षातूनच पुढे आल्या. याच अनुषंगाने चुंचूवार सांगतात, "प्रतिभा पाटील काय किंवा काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव काय, यांच्या पावलांवर पाऊल यशोमती ठाकूर यांनी ठेवणं आवश्यक आहे. संयमीपणेही वाटचाल करता येऊ शकते. विदर्भाचा काँग्रेसला खूप पाठिंबा दिसून येतो. अशा काळात यशोमती ठाकूर यांना मोठी संधी आहे. मात्र, आक्रमकतेला आवर घालून संयमीपणा अंगी बाणवणं आवश्यकच आहे."

लोकांचे प्रश्न मांडताना प्रशासनाशीही सुसंवाद साधत त्यांना सोबत घेतलं पाहिजे, असंही प्रमोद चुंचूवार म्हणतात.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या मते, "काँग्रेसमध्ये अशी राडा संस्कृती नाहीच, असं म्हणता येणार नाही. तिथे बऱ्याच लहान-मोठ्या अशा घटना घडल्या आहेत. मात्र, यशोमती ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांकडून अशा पद्धतीची आक्रमकता अपेक्षित नाही."

यशोमती ठाकूर यांच्या राजकीय संघर्षाची आणि पक्षनिष्ठेचं कौतुक करतानाच हेमंत देसाई म्हणतात, "पुरुषप्रधान राजकीय वर्तुळात त्यांनी स्वत:चं नेतृत्त्व निर्माण केलं हे मान्य, मात्र प्रशासनातील कुणा कर्मचारी-अधिकाऱ्याशी बाचाबाची करणं, हे त्यात बसत नाही. आक्रमकता कुठे वापरावी, याचेही भान हवे."

याचवेळी हेमंत देसाई हेही म्हणतात की, "अशा गोष्टींमुळे यशोमती ठाकूर यांच्या वाटचालीत नकारात्मक प्रसंग जोडले जातील, पण त्याहीपेक्षा पक्षाला दोन पावलं मागे यावी लागतात, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)