एकनाथ खडसे: तीन पक्षांची रिक्षा टीकेला खडसेंनी दिले प्रत्युत्तर #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. महाविकास आघाडी तीन पक्षांची रिक्षा म्हणता, वाजपेंयींनी तर NDAचा महाट्रक चालवला होता - एकनाथ खडसे

महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचं असल्याने भाजपचे नेते आघाडीची रिक्षा म्हणून टीका करतात. पण,अटल बिहारी वाजपेयी यांनी तर NDAचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचं सरकार सांभाळलं होतं, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय बैठकीत एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी खडसे यांनी शरद पवार यांची मनमोकळेपणाने स्तुती केली. पवार इज पॉवर, पवारांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिणं अशक्य असल्याचं खडसे यांनी म्हटलं.

महाविकास आघाडी सरकार आणण्याचे काम शरद पवारांनी केले. हे कधीही न होण्यासारखे काम होते. ते पवारांनी शक्य केले. सरकार पडेल ही भाजपची भूमिका आहे, पण असं काही होणार नाही, असंही खडसे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. बॉलीवूड घेऊन जायला ते काय पाकिट नाही, आम्ही जागतिक फिल्मसिटी उभारतोय - योगी आदित्यनाथ

"मुंबईतील बॉलीवूड इथेच राहणार आहे. मुंबईतून घेऊन जायला काय ते काय पाकिट नाही. आम्ही काहीही घेऊन जायला आलो नाही. आम्ही उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची नवी फिल्म सिटी उभारत आहोत. पण यामुळे तुम्ही का चिंतित झाला आहात," अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टोला लगावला.

उत्तर प्रदेशातील गुंतवणूक वाढवणं, तसंच नोएडा येथील फिल्म सिटीबाबत सिनेजगतातील मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूड संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

"जिथे सुरक्षित वातावरण मिळेल, सामाजिक सुरक्षा असेल, भेदभाव नसेल, अशा ठिकाणी लोक जातील. उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीमध्ये सर्व सोयी-सुविधा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भात बॉलीवूड जगतातील दिग्गजांशी चर्चा केली. आम्ही जागतिक फिल्मसिटी उभारत आहोत. विरोधकांनी मोठा विचार करावा, असंही आदित्यनाथ म्हणाले," ही बातमी लोकमतने दिली आहे.

3. SEBC वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना तलाठी पदाची नियुक्ती देणार - थोरात

औरंगाबाद, बीड, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर या सात जिल्ह्यांतील SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यावेळी 26 जिल्ह्यांमध्ये भरती घेण्यात आली. पण वरील सात जिल्ह्यांतील भरतीवर वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी निर्बंध घातले होते. त्यामुळे या जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती.

पण थोरात यांच्या घोषणेमुळे सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार सात जिल्ह्यांतील सन 2019 तलाठी पदभरतीतील SEBC वगळता इतर प्रवर्गातील उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. वरील सातही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाबाबत कळवण्यात आल्याचंही थोरात यांनी सांगितलं. सकाळने ही बातमी दिली आहे.

4. 'शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळणार असल्यास पदकवापसी करणार'

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषि विधेयकांच्या विरोधात दिल्ली परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. आता पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंनीही या आंदोलनात उडी घेतली आहे.

सरकारने शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर करणं चुकीचं आहे. आम्ही याचा विरोध करतो. शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळणार असेल, तर आम्ही आमची पदकं परत करू, असा इशारा 30 खेळाडूंनी दिला आहे.

भारताचे माजी बास्केटबॉलपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता सज्जन सिंह चीमा, हॉकी खेळाडू राजबीर कौर यांच्यासह 30 खेळाडू यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी वेळ न दिल्यास 5 डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन आपले पुरस्कार राष्ट्रपती भवनाबाहेर ठेवू, असंही खेळाडूंनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

5. कोव्हिड-19 म्हणजे फक्त सर्दी-खोकल्याचा प्रकार, हायकोर्टात याचिका

कोरोना व्हायरस किंवा कोव्हिड-19 हा केवळ सर्दी खोकल्याचा गंभीर प्रकार आहे. याचा उगाच गाजावाजा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लागू केलेला संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 1897 मागे घेण्यात यावा, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येऊ नये, अशा आशयाची याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

ही उथळ याचिका ऐकावी, अशी इच्छा असेल तर 1 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून मुंबई उच्च न्यायालयात जमा करा, अन्यथा तुमची याचिका फेटाळण्यात येईल, अशी सूचना न्यायालयाने दिली आहे.

बुधवारी (2 डिसेंबर) मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी याचिकाकर्त्याला वरील निर्देश दिले. ही याचिका अॅड. हर्षल मिराशी यांनी केली आहे. अॅड मिराशी यांनी यापूर्वीही लॉकडाऊन लावू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात जावं, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने केली. त्यानुसार मिराशी यांनी बुधवारी ही याचिका मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सादर केली होती.

याचिकाकर्त्यांनी एकदा सेंट जॉर्ज किंवा KEM रुग्णालयाला एकदा भेट द्यावी, तेव्हा त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजेल, असंही कोर्टाने म्हटलं आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)