शिवसेना नेत्याच्या 'अजान' स्पर्धेला भाजपचा विरोध, बाळासाहेब ठाकरेंची काय होती भूमिका?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लीम मुलांसाठी 'अजान पठण' स्पर्धा आयोजित करण्याच ठरवलं आहे. मात्र, या 'अजान' पठण स्पर्धेवरून मुंबईत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

'अजान' पठण स्पर्धा शिवसेना नेत्याकडून आयोजित केली जात असल्याने भाजपला शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, "शिवसेना नेत्यांचं 'अजान' पठण स्पर्धेबाबत वक्तव्य म्हणजे सत्तेनंतर बदललेलं शिवसेनेचं स्वरूप स्पष्ट करणारं आहे."

त्यामुळे ही स्पर्धा शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय वादाचा पुढचा अंक ठरेल हे स्पष्ट आहे.

कोण करणार 'अजान' पठण स्पर्धा

शिवसेनेचे दक्षिण मुंबईच्या गिरगाव परिसरातील विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी मुस्लीम समाजातील मुलांसाठी 'अजान' पठण स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. मुस्लीम समाजातील मुलांना 'अजान'ची गोडी लागावी म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं ते सांगतात.

"आम्ही भगवत गीता पठणाची स्पर्धा आयोजित करतो. त्याच धर्तीवर मुस्लीम समाजातील मुलांसाठी 'अजान' पठण स्पर्धा आयोजित करावी अशी सूचना मी मुस्लीम समाजाच्या पदाधिकाऱ्यांना केली. मुस्लिम मुलांना प्रोत्साहन मिळावं हा यामागचा हेतू आहे," असं ते पुढे म्हणतात.

ही 'अजान' पठण स्पर्धा ऑनलाईन असणार आहे. 'अजान' च्या निमित्ताने मुलं घराबाहेर फिरणार नाहीत आणि घरीच राहून स्पर्धेत भाग घेतील, अशी त्यांना अपेक्षा आहे.

'हे सत्तेनंतर शिवसेनेचं बदललेलं स्वरूप' - दरेकर

शिवसेना नेत्याकडून 'अजान' पठण स्पर्धा आयोजित केली जात असल्यामुळे भाजपला शिवसेनेवर आरोप करण्याची संधी मिळाली.

भाजप आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी "शिवसेना नेत्याचं वक्तव्य म्हणजे शिवसेनेचं सत्तेनंतर बदललेलं स्वरूप आहे. सत्तेच्या नादात हिंदुत्वाच्या भूमिकेत सरमिसळ झाली" असं म्हणत त्यांनी टीका केली.

बाळासाहेब म्हणाले होते 'प्रत्येक धर्म प्यारा' - सपकाळ

तर सपकाळ पुढे म्हणतात, "बाळासाहेब म्हणायचे, आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे. त्यात राष्ट्रीयत्व असायला पाहिजे. जे मुस्लीमधर्मीय राष्ट्रीयत्व मानतात ते आमचे आहेत. मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांनी मुस्लीम जोडप्याला नमाज पढण्याची परवानगी दिली होती. शेवटी मानवता हा धर्म महत्त्वाचा आहे,".

भाजपचा आरोप

'अजान' पठण स्पर्धेबाबत बोलताना शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दाखला दिला.

तर भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, "शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित करणं म्हणजे आता हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे. मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी कधीच केलं नाही. कॉंग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करतयात."

"हिंदू-मुस्लीम या मुद्यावर राजकारण करण्याची त्यांना पहिल्यापासून सवय आहे. त्यांची ही सवय जाणार नाही," असं म्हणत पांडुरंग सपकाळ यांनी भाजपकडून या मुद्यावर राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला.

हिंदुत्वावरून आमने-सामने

शिवसेनेने 2019 साली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हातमिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर कायम प्रश्न चिन्ह उभं करण्यात आलं.

कोरोना काळात मंदिरं न उघडण्याच्या मुद्यावरूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना "तुम्ही हिंदुत्व विसरलात का?" असा सवाल करत डिवचलं होतं.

त्यावर "माझ्या हिंदुत्वाला तुमच्या सर्टिफिकिटची गरज नाही," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.

शिवसेना-भाजपची केंद्रात आणि राज्यात युती हिंदुत्वाच्या मुद्यावर होती. मात्र, ही युती तुटल्यानंतर भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलं जाऊ लागलं.

दोन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, "आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेनेने सोडलंय"

तर "हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? हिंदुत्व आमच्या धमन्यांत आहे," असं उद्धव ठाकरे सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

आदित्य ठाकरेंनी 'अजान'साठी थांबवलं होतं भाषण

औरंगाबादमध्ये 2018 साली एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनीही 'अजान' सुरू असताना भाषण थांबवण्याची सूचना केली होती.

"हिंदुत्व आमची राष्ट्रीयता आहे. माझे आजोबा बाळासाहेब ठाकरेंकडून आम्हाला अजान सुरू असताना भाषण न करण्याची शिकवण मिळाली आहे म्हणून मी महापौरांचं भाषण थांबवलं," असं आदित्य ठाकरेंनी त्यावेळी म्हंटलं होतं.

औरंगाबादच्या राजकारावर गाढा अभ्यास असलेले पत्रकार माधव सावरगावे सांगतात, "आदित्य ठाकरे एका कार्यक्रमासाठी 2018 मध्ये औरंगाबादला आले होते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बाजूच्या मशिदीतून 'अजान' सुरू झाली. आदित्य ठाकरेंनी महापौर नंदकुमार घोडले यांना 'अजान' सुरू असताना भाषण थांबवण्याची सूचना केली. अजान संपल्यानंतर पुन्हा भाषण सुरू झालं."

बाळासाहेबांचा 'अजान' ला विरोध होता?

मशिदीवरील भोंग्यातून देण्यात येणाऱ्या अजानला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी व्यासपिठावरून विरोध केला होता. मग, बाळासाहेब अजानच्या विरोधात होते?

यावर बोलताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई सांगतात, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 'अजान' ला कधीच विरोध केला नाही,".

ते पुढे सांगतात, "बाळासाहेबांचा विरोध मशिदीवरच्या भोंग्यातून ओरडून दिल्या जाणाऱ्या 'अजान' ला होता. 'अजान' शांततेत झाली पाहिजे. यामुळे लोकांना त्रास होऊ नये. अजान ऐकू येण्यासारखी, लोकांना नमाज पढण्यासाठी साद घालणारी असावी, गोंधळ केल्यासारखी असू नये," असं बाळासाहेबांचं मत होतं.

"बाळासाहेबांचा मुसलमानांमधील जातीयवादाला विरोध होता. महाराष्ट्रात राहणाऱ्या मुस्लीम धर्मीयांचा त्यांनी कधीच विरोध केला नाही. उलट कोकणात शिवसैनिकाला निवडून आणलं म्हणून बाळासाहेब लोकांसमोर नतमस्तक झाले होते," असं दलवाई पुढे सांगतात.

पांडुरंग सकपाळ यांच्याकडून खुलासा

अजानच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापल्यानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी खुलासा केला आहे.

पांडुरंग सकपाळ म्हणाले, "मुंबादेवी विधानसभेतील फाउंडेशन फॉर युथ' नावाच्या संस्थेच्या सदस्यांनी अजानची खुली स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले. खुली स्पर्धा केल्यास नियमांची पायमल्ली होईल हे निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात असं सूचवलं."

"अशा शुभेच्छा देताना माझ्या मनात धार्मिक किंवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टीचे राजकारण करण्यात येऊ नये," असंही सकपाळ म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)