You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत : उद्धव ठाकरे यांना वाचवणारे की अडचणीत आणणारे नेते
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
"संजय राऊत यांनी कंगना राणावतविषयी वापरलेल्या भाषेतून दिसून येतं की त्यांना तिला धडा शिकवायचा होता. संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याला, संसदेच्या सदस्याला हे शोभत नाही," असं म्हणत मुंबई हायकोर्टाने संजय राऊत यांना फटकारलं. अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयासंदर्भातील सुनावणीदरम्यान कोर्टानं असं म्हटलं.
यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत चर्चेत आले. खरंतर ते कायमच चर्चेत असतात.
मात्र, आता थेट मुंबई हायकोर्टानेच फटकारलं आहे. हेच निमित्त साधत गेल्या वर्षभरात विशेषत: ठाकरे सरकार अस्तित्त्वात आल्यापासून संजय राऊत कसे चर्चेत राहिले, याचा बीबीसी मराठीनं आढावा घेतला आहे.
महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्र्रात येण्यासाठी आणि आल्यानंतर गेल्या वर्षभरात अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. या नाट्यात वेगवेगळ्या अंकांमध्ये वेगवेगळी पात्रं केंद्रस्थानी होती.
पण एका व्यक्तीच्या भूमिका मात्र जवळपास प्रत्येक अंकात होती, अगदी सुरुवातीच्या नांदीपासून, ती व्यक्ती म्हणजे संजय राऊत.
शिवसेनेसाठी निर्णय घेण्याचं आणि सरकारचं नेतृत्व करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, मात्र अशा सरकारची संकल्पना रुजवण्याचं, ती ठसवण्याचं आणि हे सरकार प्रत्यक्षात आल्यावर शिवसेनेच्या बाजूनं खिंड लढवत ठेवण्याचं काम मात्र संजय राऊतांनी केलं.
आता जेव्हा या वर्षपूर्तीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंची अजून एक मुलाखत घेऊन राऊत आले आहेत, तेव्हा त्यांनी स्वत:ही मुलाखतकाराच्या चेहऱ्यामागून वठवलेल्या भूमिकेचा उहापोह होणं स्वाभाविक आहे.
संजय राऊत 'सामना'चे कार्यकारी संपादक म्हणून आणि शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार म्हणून काम कायम चर्चेत होतेच. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि अवघ्या काही तासांमध्ये राऊतांचं शिवसेनेतलं स्थान जणू बदललं.
एका बाजूला शरद पवारांशी नव्या आघाडीसाठी बोलणं आणि दुसऱ्या बाजूला भाजपाला अंगावर घेणं, राऊत 'महाविकास आघाडी'च्या शिल्पकारांपैकी एक बनले. त्यांनी आजवर शिवसेनेमध्ये पार पाडलेल्या भूमिकेपेक्षा ही जबाबदारी वेगळी होती.
सरकार स्थापन झाल्यावरही ती थांबलेली नाही. गेल्या वर्षभरात जेव्हा जेव्हा हे सरकार अडचणीत आलं, विशेषत: ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना घेरली गेली, त्यावेळेस संजय राऊत हेच हत्यार म्हणून पुढे आले.
सरकारचा भाग नसूनही सगळ्या राजकीय भूमिका आणि वादांच्या काळात या सरकारचे प्रवक्ते बनले, संकटमोचक बनले. त्यामुळेच यापूर्वी न पाहिलेल्या समीकरणांच्या आधारे प्रत्यक्षात आलेल्या सरकारची वर्षपूर्ती होत असतांना राऊतांच्या या राजकीय भूमिकेची ही नोंद.
'महाविकास आघाडी'ची संकल्पना ठसवणं
विधानसभा निवडणुकींचे निकाल आले आणि संजय राऊतांच्या पत्रकार परिषदा सुरु झाल्या. 'शिवसेनेला युतीत मुख्यमंत्रिपद देणं ठरलं होतं, भाजपा शब्द फिरवते आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार' हे नरेटिव्ह त्यांनी मांडायला सुरुवात केली आणि तोपर्यंत महाराष्ट्राच्या पटलावर 'युती वगळता अन्य आघाडी' ही नसलेली शक्यता समोर आली.
राऊतांच्या रोजच्या वक्तव्यांच्या माऱ्याला भाजप सुरुवातीचा बराच काळ प्रभावी उत्तर देऊ शकली नाही आणि त्याच काळात पडद्यामागे राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना या आघाडीची प्रारंभिक रचना झाली.
उद्धव ठाकरे अद्याप बोलले नव्हते, पण तोपर्यंत राऊतांनी खिंड लढवून पायाभरणी करून ठेवली. ते कायमच शिवसेनेचे असून शरद पवारांशी जवळीक असलेले नेते मानले गेले होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलत शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये मैत्री घडवून आणण्याच्या कामातही राऊत होते असं म्हटलं गेलं.
"पवारांशी त्यांचे संबंध कायमच चांगले होते आणि त्यामुळे पवारांसोबत कॉंग्रेसशी चर्चा करणं हे राऊत करत होते," राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात.
"उद्धव ठाकरे सगळं पक्कं झाल्याशिवाय कोणाशी बोलू शकत नव्हते. तोपर्यंत सगळं राऊतांनाच घडवून आणायचं होतं. ते त्यांनी केलं. ते चांगले कम्युनिकेटर आहेत. दिल्लीत असल्यानं राष्ट्रीय पातळीवर उठबस आहे. तेही राऊतांच्या पथ्यावर पडलं," देशपांडे सांगतात.
हे सरकार घडवून आणण्याच्या काळात जसा त्यांचा रोख भाजपवर असायचा आणि त्याचे राजकीय परिणामही पाहायला मिळाले, तसा तो रोख या सरकारच्या वर्षभराच्या काळातही पाहायला मिळतो आहे.
हे सरकार पाडायचे प्रयत्न भाजपाकडून होतो आहे असे आरोप त्यांनी अनेकदा केले आहेत, त्यावर लिहिलं आहे. राजकारणात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी काही परसेप्शन्स तयार केली जातात, जिवंत ठेवली जातात आणि विरोधकांकडून सरकार बनवण्याचा प्रयत्न होणं हे तर स्वाभाविक आहे. पण त्याच्या आधारे राऊतांनी गेल्या वर्षभरात भाजपाला सातत्यानं धारेवर धरलं आहे.
राज्यपालांबरोबर 'सामना'
जिथं जिथं शिवसेनेचा आणि या सरकारचा गेल्या वर्षभरात संघर्ष झाला आहे, तेव्हा राऊतांनी तिथं उडी घेतलेली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसोबतचे या सरकारचे सातत्यानं उडत असणारे खटके आता नेहमीचे झाले आहेत.
मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण करून दिली आणि मग उद्धव ठाकरेंनीही त्यांना जाहीर प्रत्युत्तर दिलं.
पण त्याअगोदर जेव्हा जेव्हा वाद झाले, मग ते अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यावरून असो वा भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठी असो, राऊतांच्या लेखणी आणि वक्तव्यांतून राज्यपालही सुटले नाहीत. विरोधी पक्षांच्या नेत्यांसमवेत पंतप्रधानांच्या झालेल्या बैठकीतही त्यांनी शरद पवारांच्या साथीनं हा मुद्दा मांडला.
सुशांत सिंग राजपूत प्रकरण
कोरोनाकाळातही एका घटनेनं राजकीय विश्व आणि माध्यमविश्व भरून गेलं, ती घटना म्हणजे अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मुंबईत झालेला मृत्यू.
सुरुवातील आत्महत्या असं सांगण्यात आलेल्या मृत्यूवरून लवकरच गजहब सुरू झाला आणि त्यात मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय आणि त्यानंतर नार्कोटिक्स ब्यूरो अशा सगळ्या तपास यंत्रणा पडल्या.
मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त झाला, तपास कोणाकडे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं. राजकीय पक्ष, माध्यमं, सेलिब्रिटीज सगळे यात पडले.
टीकेचा रोख 'महाविकास आघाडी' सरकार, मुंबई पोलीस यांच्याकडे वळला. संशयाची, आरोप प्रत्यारोपाची चर्चा ठाकरेंपर्यंतही पोहोचू लागली.
तेव्हा नेहमीप्रमाणे शिवसेनेची खिंड लढवायला संजय राऊतच पुढे आले. राऊतांनी हे संशय कसं राजकीय षडयंत्र आहे हे सांगायला सुरुवात केली.
रोज माध्यमांमध्ये बाजू मांडली. त्यात सुशांत सिंगच्या कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. पण राऊतांनी त्यांच्या प्रतिहल्ल्यातला आक्रमकपणा कमी केला नाही.
कंगना राणावत आणि 'उखाड दिया'
सुशांत सिंग रजपूत प्रकरणाच्या चर्चेतूनच शिवसेना विरुद्ध अभिनेत्री कंगना राणावत वाद सुरू झाला. बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा वापर होतो का या मुद्द्यावरून तिनं काही दावे केले आणि पुढे हा वाद राजकीय झाला.
मुंबईचा उल्लेख 'पाकव्याप्त काश्मीर' असा झाला आणि अस्मितेच्या मुद्द्यावरुन राऊतांनी टिकेचा रोख कंगनाकडे वळवला.
त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानंही शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलणं सुरु केलं. पण कंगनाला भाजपाचा पाठिंबा आहे असं सूचित करत राहून राऊत हेच शिवसेनेकडून या वादाचा सामना करत राहिले.
जेव्हा कंगनाच्या कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेनं हातोडा चालवला तेव्हा दुसऱ्या दिवशी 'सामना'तल्या त्याविषयीच्या बातमीला 'उखाड दिया' असा मथळा देण्यात आला. राऊतांनी या 'उखाड दिया'चा उल्लेख कॉमेडियन कुणाल कामराला दिलेल्या मुलाखतीतही केला.
राऊत विरुद्ध अर्णब गोस्वामी
याच काळात 'रिपब्लिक टिव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धही शिवसेनेचा वाद सुरु झाला.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गोस्वामींनी आक्रमक भूमिका घेतली, शिवसेनेला टीकेचं लक्ष्य केलं. त्याविरोधात संजय राऊतच मैदानात उतरले.
गोस्वामी यांची पत्रकारिता, त्यांचे भाजपशी संबंध असल्याचे प्रतिआरोप त्यांनी केले. गोस्वामी भाजपाचे कार्यकर्ते आणि 'रिपब्लिक' हे त्यांचा लाऊडस्पीकर असल्याचं राऊतांनी म्हटलं.
गोस्वामींविरुद्ध अन्वय नाईक प्रकरणात कारवाई झाली, त्यावरून सरकारवर सूडबुद्धीन् वागल्याची टीका झाली तेव्हा त्याला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी राऊतांवर येऊन पडली. या प्रकरणाच्या आधारेही त्यांनी भाजपावर पलटवार करण्याची संधी गमावली नाही.
"मुळातच भाजपाच्या 'शाऊटींग ब्रिगेड'ला त्यांच्याच भाषेत उत्तर देणं ही राजकीय गरज आहे. जी वक्तव्य वा आरोप त्यांच्याकडून होतात ती तशीच न राहता त्यांचं खंडन होणं हे गरजेचं आहे. तसं करायच असेल तर आक्रमकपणा पाहिजे आणि ते नेमकं राऊत यांच्याकडे आहे. गेल्या वर्षभरात या सरकारसाठी त्यांनी ते वारंवार करून दाखवलं आहे. ते कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाहीत," अभय देशपांडे त्यांचं निरिक्षण सांगतात.
मुलाखतींतून सरकारची भलावण
'महाविकास आघाडी' सरकारची, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून प्रतिमा सांभाळण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी जणू राऊतांकडे आहे. गेल्या वर्षभरात म्हणून काही मुलाखतींमधून त्यांनी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला. 'सामना'तून उद्धव ठाकरे यांच्या दोन मुलाखती त्यांनी घेतल्या.
कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू झालेले असतांनाही सरकारने कसे सर्वतोपरी प्रयत्न केले असं या मुलाखतींतून ठसवण्यापासून ते राजकीय विरोधकांना जशास तसं उत्तर या मुलाखतींतून देण्यात आलं.
'सामना'मध्ये ठाकरे कुटुंबीय वगळता अन्य कोणाचीही विस्तृत, अनेक भागांमधली मुलाखत संजय राऊतांनी याअगोदर घेतली नाही.
पण या वर्षी मात्र त्यांनी अपवाद केला आणि शरद पवारांची मोठी मुलाखत 'सामना'मध्ये छापली गेली. या मुलाखतीत शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना काम चांगलं सुरू असल्याचं प्रमाणपत्र राऊतांनी मिळवून दिलं.
स्वत: राऊत यांनी विविध माध्यमांना वर्षभरात दिलेल्या मुलाखती चर्चेत राहिला. मुलाखतींतून राऊत एकहाती या सरकारची प्रतिमा घडवत राहिले.
संजय राऊत वठवत असलेली भूमिका सत्तेचं नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेसाठी अतिशय महत्वाची आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे सहाजिकच त्यांच्या आक्रमकतेला आता मर्यादा आहे. पण तरीही शिवसेनेचं मूळ आक्रमक रुप संपलं आहे हे पक्षासाठी राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. ती आक्रमक भूमिका सरकारबाहेर असलेले राऊत पक्षासाठी वठवत आहेत.
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाईंच्या मते संजय राऊत वठवत असलेली ही भूमिका शिवसेनेसाठी फायद्याची असली तरीही काही वेळेस ती अडचणीची ठरते आहे.
"सुशांत, रिया, अर्णब प्रकरण असेल वा पालघरसारखं प्रकरण असेल, राऊतांची काही वक्तव्य ही पक्षाला अडचणीत आणणारीही ठरली. एका बाजूला उद्धव ठाकरे समन्वयाची भूमिका घेत असतांना राऊत मात्र आक्रमक होतात. ही कदाचित रणनीतीही असू शकेल.
अजून एक जाणवतं म्हणजे, शिवसेनेत सध्या केवळ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच बोलतात. इतरही प्रवक्ते आहेत, पण वादाच्या कोणत्याही प्रसंगी ते बोलायला टाळतात. ज्येष्ठ नेतेही बोलत नाहीत. याने असंही चित्र तयार होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेच शिवसेना चालवताहेत. एक मात्र नक्की की बाळासाहेबांसारखी जी आक्रमक लाईन आहे, ती राऊत यांनी सरकार आल्यावरही धरून ठेवली आहे," देसाई म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)