उद्धव ठाकरे मुलाखत: 'तुम्हालाही मुलंबाळं आहेत, उद्या तुमच्यावर ही वेळ आणायला लावू नका'

"तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, आमच्या मुलाबाळांवर येणार असाल, तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना, ज्यांना ज्यांना मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतल्या तांदळाचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची, आम्ही शिजवू शकतो.." या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिलाय.

महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे सरकारला एक वर्षं पूर्ण होतंय. या निमित्ताने संजय राऊत यांनी 'सामना'साठी त्यांची मुलाखत घेतली.

ईडी आणि सीबीआयचा गैरवापर?

देशामध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का या संजय राऊत या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, "मी शांत, संयमी आहे याचा अर्थ नामर्द नाही. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू आहेत ही महाराष्टृाची संस्कृती नाही. तुम्ही कुटुंबीयांवर येणार असाल, आमच्या मुलाबाळांवर येणार असाल, तर आमच्या अंगावर येणार्यांना ज्यांना ज्यांना मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतल्या तांदूळाचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची, आम्ही शिजवू शकतो.

"महाराष्ट्रात हा असला विचार कधीच रुजलेला नाहीच. सूडाचा विचार...शत्रूला पराभूत करणं हा आहे. पण या पद्धतीने कारण नसताना...राजकीय शत्रूचा काटा काढणं ही संस्कृती नाही.

राज्यात सीबीआयसाठी परवानगीची आवश्यकता आहे. त्याबाबत बोलताना ते म्हणाले, "तुम्ही सीबीआयचा दुरूपयोग करायला लागलात तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय सीबीआय काय, त्यावर राज्य सरकारचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची? सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा, आम्ही दहा काढतो."

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यामध्ये नक्की काय होणार आहे याविषयी आपल्याला माहिती नसल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत सांगितलंय.

लॉकडाऊनविषयी...

पुन्हा लॉकडाऊन लावण्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, "पुन्हा निर्बंध नको असतील तर जनतेने ही त्रिसूत्री पाळावी आणि काही प्रमाण सोडलं तर बरीचशी लोकं ती पाळत आहेत. लॉकडाऊनचा जो मुद्दा होता, तुम्ही म्हणताय की तो पुन्हा लावाला लागेल का? तर आपण काय पत्करणार? आयुष्य की धोका? हे ठरवा. मला असं वाटतं की जवळपास सगळा महाराष्ट्र आपण उघडलेला आहे. तो पुन्हा बंद करावा अशी माझी काय कोणाचीच इच्छा नाही. पण बंद होऊ न देणं हे प्रत्येकाचं काम आहे."

मुख्यमंत्री फक्त हात धुवा हे सांगण्यापलीकडे काय करतात या विरोधकांच्या टीकेबद्दलच्या संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "ठीक आहे. हात धुतो आहे. जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन."

तर शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा राज्यपाल आणि भाजपच्या आरोप असल्याचं राऊत यांनी विचारल्यावर 'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?' असा सवाल ठाकरेंनी केला.

महाराष्ट्रातलं सरकार चालवण्याचा वर्षभरातला अनुभव, राज्यातली शिक्षण स्थिती शेतकऱ्यांचे प्रश्न, हिंदुत्व या सगळ्याविषयीही उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या या मुलाखतीत भाष्य केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)