राम मंदिर भूमिपूजन: '... तर बाबरी उद्ध्वस्त करण्याचे श्रेय घ्यायलाही लाजू नका' #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. '... तर बाबरी उद्ध्वस्त करण्याचे श्रेय घ्यायलाही लाजू नका -ओवेसींची प्रियंका गांधींवर टीका

राम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक संगमाचे प्रतीक असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (4 ऑगस्ट) व्यक्त केली. प्रियंका यांनी एका निवेदनाद्वारे राम मंदिराचं समर्थन केलं.

प्रियंका यांच्या या निवेदनावर एमआयएम'चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. कट्टर हिंदुत्ववादी विचार स्वीकारणे खूप चांगली गोष्ट आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली. बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेतील पक्षाचा 'सहभागा'चे श्रेय घ्यायला लाजू नका, असाही टोमणा त्यांनी लगावला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेसची उत्तर प्रदेशमधील जबाबदारी आहे. त्यांनी राम मंदिराचे समर्थन करताना म्हटलं आहे की, राम सगळ्यांबरोबर असतो. सभ्यपणा, धाडस, त्याग, वचनाला जागणारा, करुणामय राम हे जीवनाचे सार आहे.

2. माझ्या मनातलं स्वप्न पूर्ण होतंय- लालकृष्ण अडवाणी

अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. 'माझ्या मनातील स्वप्न पूर्ण होत आहे. हा दिवस ऐतिहासिक आहे,' असं अडवाणी यांनी म्हटलं.

राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान 1990 मध्ये सोमनाथ ते अयोध्या रथ यात्रेच्या स्वरुपात मी एक कर्तव्य पार पाडलं, त्यामुळे अनेक लोकांच्या आकांक्षेला, ऊर्जेला बळकटी मिळाली, असं अडवाणी यांनी आपल्या या व्हीडिओ संदेशात म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

3. रामाचा वनवास संपला- राज ठाकरे

"आपल्या रामाचा वनवास संपला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे," असं म्हणत राज ठाकरे यांनी राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिराबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

या फेसबुक पोस्टमधून त्यांनी राम मंदिर व बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

'या मंगलप्रसंगी बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता,' असं राज यांनी म्हटलं आहे.

4. असुरक्षित वाटत असेल तर राज्य सोडून जाणं हा उपाय- अनिल परबांचा अमृता फडणवीसांना टोला

भाजप सरकार सत्तेत असताना गेली पाच वर्षं अमृता फडणवीस यांनी पोलिसांचं कौतुक केलं. मात्र भाजपचं सरकार गेले आणि सत्ता गेली म्हणून त्यांना आता असुरक्षित वाटू लागलंय. असं असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणं हाच एक उपाय असू शकतो, असं म्हणत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

मुंबईतील असा कुठला नागरिक म्हणला आहे की, आम्ही असुरक्षित आहोत? अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखं काय घडलंय? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाबद्दल भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही.

5. इब्राहिम अल्काझी यांचे निधन

सलग 15 वर्षे एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक राहिलेले नाट्यप्रवर्तक, भारतीय नाट्याला मॉडर्न थिएटरची ओळख करून देणारे रंगकर्मी इब्राहिम अल्काझी याचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. NDTV नं ही बातमी दिली आहे.

त्यांचे नाट्यक्षेत्रातील अपूर्व योगदान लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गोरवण्यात आलं आहे. शिवाय, प्रतिष्ठीत संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार त्यांना दोनदा लाभले.

विजया मेहता, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, रोहिणी हट्टंगडी, ज्योती सुभाष, बी. जयश्री यांचे ते गुरू मानले जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)