You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राम मंदिर: अनेक भाजप नेते कोरोनाग्रस्त, भूमीपूजनाची वेळ योग्य आहे?
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तर प्रदेशसह देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. हे लक्षात घेऊन येत्या पाच ऑगस्टला होऊ घातलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांची संख्या कमी असावी, या दृष्टीने श्रीराम जन्मभूमि न्यास विचार करत आहे.
जिथे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे, त्या अयोध्येतही कोरोनाची लागण गंभीर बनली आहे. अयोध्येतील रुग्णसंख्याही चिंताजनक आहे.
कोरोनाची स्थिती पाहता पाच ऑगस्टच्या कार्यक्रमात केवळ 150 लोकांनाच सहभागी करून घेतलं जाईल, असं आधी ठरलं होतं. कारण सोशल डिस्टन्सिंगचे नियम योग्यपणे पाळले जाऊ शकतील. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपस्थितांची संख्या आणखी कमी करण्यावर विचार केला जात आहे.
अमित शाह यांनी काल (3 ऑगस्ट) ट्वीटमधून आवाहन केलं की, जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वत:हून अलगीकरण कक्षात राहावे आणि स्वत:ची चाचणीही करावी.
त्यामुळे अर्थात प्रश्न उपस्थित होतो की, अमित शाह यांच्या संपर्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा होते? किंवा अयोध्येत भूमिपूजनाला आमंत्रित असलेले भाजपचे वरिष्ठ मंत्री आणि नेतेही शाह यांच्या संपर्कात होते?
कालच (3 ऑगस्ट) उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षण मंत्री कमलराणी वरुण यांचं कोरोनामुळे निधन झालं. भाजपच्या उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
शिवाय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही कोरोनानं गाठलं आहे. हे दोघेही भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. तामिळनाडूच्या राज्यपालांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
अडवाणी, जोशी आणि उमा भारती
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी आज ट्वीट करून सांगितलं की, त्या अयोध्येत जातील, मात्र भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी जाणार नाहीत. कार्यक्रमस्थळी उपस्थित लोक आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्याची काळजी वाटते, असं त्या म्हणाल्या.
उमा भारती या भोपाळ ते अयोध्या असा ट्रेनने प्रवास करणार आहेत. कोरोनाच्या काळात असा प्रवास केल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणं योग्य होणार नसल्याचं त्यांचं उमा भारतींचं म्हणणं आहे. त्या शरयू नदीच्या किनाऱ्यावर दुसऱ्या कुठल्यातरी ठिकाणी पूजा करतील.
राम मंदिर आंदोलनाशी जोडलेले भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
मात्र, श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्राचे प्रवक्ते अनिल मिश्र यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, कार्यक्रमाला किती लोक येतील, याबाबत अजूनही विचार सुरू आहे.
अनिल मिश्र यांच्या मते, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला 150 लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं होतं आणि आता त्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यावर अजून विचारच सुरू आङे, त्यामुले नेमके किती लोक हजर असतील, हे निश्चित सांगता येत नाही.
मात्र, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला नेमके किती लोक उपस्थित अशतील, याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, असंही ते म्हणाले.
निर्मोही आखाड्याचा आक्षेप
भूमिपूजनाची आयोजनाची वेळ आणि आमंत्रितांची नावं, यावर केवळ राजकीय पक्षांसह राम जन्मभूमी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या निर्मोही आखाड्यानेही आक्षेप नोंदवला आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मनोज झा म्हणतात, सुप्रीम कोर्टानेच राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिल्यानं राम मंदिर बनणार हे निश्चित होते. त्यामुळे कोरोनाच्या काळात भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता होती.
"मंदिर बांधण्यास सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली आहे. मात्र, सध्या परिस्थिती अशी आहे की, एखाद्या ठिकाणी बऱ्याच जणांनी गर्दी करणं कुणालाच परवडणारं नाही," अशं मनोज झा म्हणतात.
निर्मोही आखाड्यालाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
निर्मोही आखाड्याचे प्रवक्ते कार्तिक चोप्रा यांनी बीबीसीशी बोलताना आरोप केला की, "भूमिपजूनाच्या कार्यक्रमाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष आणि उद्योगपतींपर्यतच मर्यादित केलं आहे."
"ट्रस्टमध्ये निर्मोही आखाडा असतानाही, आखाड्यातील कुणाचीही प्रतिनिधी म्हणून निवड केली गेली नाही. सरकराने निर्मोही आखाड्याशी चर्चा न करताच प्रतिनिधी निवडले. हे सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे," असं कार्तिक चोप्रा म्हणतात.
"निर्मोही आखाड्याने 1866 पासून रा मंदिरासाठी कायदेशीर लढाई लढली आहे. त्यामुळे मंदिर उभारणीसाठीची पहिली वीट ठेवण्याचा मान निर्मोही आखाड्याला मिळायला हवा. सोन्यापासून बनलेली सूर्य भगवानाची शिला सर्वात आधी ठेवावी. कारण सर्वात आधी सूर्य, मग सर्व ग्रह," असं निर्मोही आखाड्याचं म्हणणं आहे.
राम मंदिर भूमिपूजनासाठीचा मुर्हूर्त पाच ऑगस्ट असून, दुपारी 12 वाजून 15 मिनिट आणि 15 सेकंद या वेळेचा मुहूर्त आहे. केवळ 32 सेकंदांपर्यंतच मुहूर्त आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)