अहमद पटेल यांची काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणण्यामागे काय भूमिका होती?

आदित्य ठाकरे आणि सोनिया गांधी भेट

फोटो स्रोत, @INCIndia

फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे आणि सोनिया गांधी भेट (नोव्हेंबर 2019)
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी

काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे आज (25 नोव्हेंबर) निधन झालं. अहमद पटेल यांचं पक्षात एक महत्त्वाचं स्थान होतं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि रणनितीकार असल्याने त्यांच्या शब्दाला पक्षात वजन असल्याचं अनेक प्रसंगांमधून दिसून येतं.

महाराष्ट्राच्या राजकारणातही अहमद पटेल यांनी वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेतही त्यांचा मोठा वाटा होता. विशेषत: काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी दिल्ली दरबारी त्यांनी बरेच प्रयत्न केल्याचं बोललं जातं.

वयाच्या २६ व्या वर्षी अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनितीकार म्हणून त्यांची ओळख होती.

राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत अहमद पटेल

फोटो स्रोत, Getty Images

तीन वेळा लोकसभेचे खासदार आणि पाच वेळा राज्यसभेचे खासदार म्हणून ते निवडून गेले. अनेकवेळा मंत्रिपदाची संधी असताना त्यांनी ती स्वीकारली नाही.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर ते कार्यरत होते.

काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणण्यात भूमिका

2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली. यानंतर राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीसंदर्भातील घडामोडींना सुरुवात झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. पण केवळ या दोन पक्षांचं संख्याबळ महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्यासाठी पुरेसं नव्हतं. यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नव्हता.

काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या आधारावर चालणाऱ्या पक्षाला हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी पटवून देणं आव्हानात्मक होतं. यावेळी काँग्रेस हाय कमांडचं मन वळवण्यात अहमद पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Twitter@shivsena

नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडीची घोषणा करण्यापूर्वी शिवसेना नेत्यांना भेटणे, काँग्रेसची बाजू मांडणे, जागावाटपासाठी बोलणी करणे अशा सर्वच महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अहमद पटेल यांचा सक्रिय सहभाग होता.

28 नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगतात, "अहमद पटेल यांच्याशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या कामानिमित्ताने पटेल यांच्याशी गाठीभेटी आणि चर्चा होत असत. महाराष्ट्रातही विद्यमान महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि मार्गदर्शन होतं."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेत अहमद पटेल यांचा मोलाचा वाटा होता असं त्यांनीही सांगितलं.

ते म्हणाले, "अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने 'चाणक्य' गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला. महाविकास आघाडीने आपला मार्गदर्शक गमावला आहे."

देशभरात काँग्रेसचे संघटनात्मक बळ कमकुवत होत असताना आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष असताना अहमद पटेल यांनी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत काँग्रेसचं स्थान मजबूत करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.

ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "2019 ला महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळीही काँग्रेसकडून बोलणी आणि चर्चा करण्यासाठी अहमद पटेलच पुढे होते. त्यांनी आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापनेबद्दल माहितीही दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन कायम राहिलं."

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

मुख्यमंत्री ठरवण्यात भूमिका

अहमद पटेल यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यात मोलाची भूमिका पार पडली आहे. तसंच आघाडी सरकारमध्येही काँग्रेसकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अहमद पटेल यांच्या शब्दाला महत्त्व होतं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच आघाडीचं सरकार असतानाही सत्तास्थापनेपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असताना अहमद पटेल काँग्रेसचे पारडं सांभाळत असत.

काँग्रेसकडून वाटाघाटी करण्यासाठी अहमद पटेल यांचंच नाव दिल्लीकडून पुढे केलं जायचं.

यासंदर्भात बोलताना सुनील चावके सांगतात, "2004 ची गोष्ट आहे. तेव्हा काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 69 तर राष्ट्रवादीला 71 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू झाली. यावेळी काँग्रेसकडून बोलणी करण्यासाठी अहमद पटेल होते. तर शरद पवार यांच्याकडून प्रफुल्ल पटेल बोलणी करत होते. यावेळी अहमद पटेल यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी सोडली नाही आणि अखेर संख्याबळ कमी असूनही त्यांचाच मुख्यमंत्री झाला."

अहमद पटेल स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी ओळखले जायचे. आपल्या भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहित सर्वांत प्रथम ठेवणं, देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद ठेवणं अशी त्यांच्या कामाची ओळख होती.

नारायण राने

नारायण राणेंचा काँग्रेस प्रवेश

सध्या भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचा प्रवेश झाला.

त्याबाबत ज्येष्ठ पत्रकार दीपक भातूसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "राणेंना काँग्रेसमध्ये आणण्यातही अहमद पटेल यांची भूमिका होती. नारायण राणे यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती."

अहमद पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन बोलवलं होतं असं नारायण राणे यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे. त्यावेळी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राणेंना महसूलमंत्रिपद देण्यात आलं होतं.

अहमद पटेल अन्य काँग्रेस नेत्यांसोबत

फोटो स्रोत, Getty Images

अहमत पटेल यांची कार्यपद्धती

असं सांगितलं जातं अहमद पटेल काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांना ओळखायचे, ज्यांची नावं जास्त लोकांना माहिती नव्हती.

ज्येष्ठ पत्रकार अदिती फडणीस यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस आपल्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे, अहमद पटेल यांना भेटणार आहे, ती व्यक्ती काय बोलेल याचा ते अंदाज घेत. त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याची माहिती ठेवत. यामुळेच पक्षात त्यांचं स्थान वेगळं होतं.

ते रात्री उशिरापर्यंत काम करत बसायचे. कोणत्याही वेळी रात्री एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्याला फोन करून ते एखादं काम सोपवायचे.

अत्यंत नियोजनबद्धरित्या ते काम करायचे. त्यांचा एक फोन सतत त्यांच्या जवळ असायचा. हा नंबर कुणाकडेच नव्हता. त्यावर फक्त 10 जनपथवरून फोन यायचे.

पण काँग्रेसमध्ये दुसरं मुस्लीम नेतृत्व तयार झालं नाही, यावरून अहमद पटेल यांच्यावर टीकाही झालेली आहे. सलमान खुर्शीद यांना काँग्रेसमध्ये मुस्लीम नेता म्हणून ओळख मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. यावरून हे लक्षात येऊ शकतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)