अहमद पटेल राज्यसभाः भाजपाने निवडणूक आयोगाकडे ज्यांच्या निवडणुकीचा दाखला दिलाय ते अहमद पटेल कोण होते?

अहमद पटेल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आदिती फडणीस
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं 25 नोव्हेंबर 2020 निधन झालं. अहमद पटेल यांना काँग्रेसमध्ये एक वेगळं स्थान होतं. त्यांच्या शब्दाला पक्षात प्रचंड वजन असल्याचं अनेक प्रसंगांमध्ये दिसून आलं होतं.

राज्यसभा निवडणूक 2017. गुजरातमधील तीन जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होती. यामध्ये सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल उभे होते.

अहमद पटेल यांचा पराभव म्हणजेच सोनिया गांधींचा पराभव, असं त्यावेळी म्हटलं जात होतं. लढतही अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. हा विजय म्हणजे सोनिया गांधी यांचाच विजय असल्याचं म्हटलं गेलं.

काँग्रेस सत्तेत असो वा सत्तेबाहेर, अहमद पटेल हे पक्षात केंद्रस्थानी असायचे. पण, अहमद पटेल यांना काँग्रेसमध्ये इतकं जास्त महत्त्व कशामुळे होतं?

अहमद पटेल यांचं महत्त्व

अहमद पटेल तीनवेळा लोकसभेत काँग्रेसकडून निवडून आले, तर पाचवेळा ते काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते. पण फक्त यामुळेच त्यांना मोठा नेता मानलं जायचं नाही.

काँग्रेसमधील गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांना काँग्रेसमध्ये प्रचंड महत्त्व होतं.

1977 ची गोष्ट आहे. त्यावेळी काँग्रेस पराभवाच्या जखमांनी घायाळ झालेली होती. त्यावेळी अहमद पटेल आणि त्यांचे सहकारी सनत मेहता यांनी इंदिरा गांधींना आपल्या मतदारसंघात भरुचला बोलावलं. याच दौऱ्यांनंतर इंदिरा गांधी यांचं पुनरागमन सुरू झालं होतं.

राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसोबत अहमद पटेल

फोटो स्रोत, Getty Images

पण अहमद पटेल काँग्रेसच्या पहिल्या फळीत 1980 आणि 1984 दरम्यान आले. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यानंतर जबाबदारी सांभाळण्यासाठी राजीव गांधी यांना तयार केलं जात होतं. तेव्हा लाजाळू स्वभावाचे अहमद पटेल राजीव गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये आले.

तो काळ जवळून पाहिलेले लोक सांगतात, की राजीव गांधी गुजरात दौऱ्यावर यायचे तेव्हा अहमद पटेल त्यांना शेव, चिवडा आणि शेंगदाणे हे पदार्थ द्यायचे. राजीव गांधींना हे पदार्थ खूप आवडायचे.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी 1984 मध्ये लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता हस्तगत केली. यावेळी अहमद पटेल खासदार म्हणून निवडून आले होते. सोबत त्यांना संयुक्त सचिवही बनवण्यात आलं. पुढे काही काळ त्यांना संसदीय सचिव आणि त्यानंतर काँग्रेसचे महासचिवही बनवण्यात आलं.

नरसिंह राव यांच्या काळात काहीसे दुर्लक्षित

पण पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान बनल्यानंतर गांधी कुटुंबीयांच्या जवळीकी मुळेच अहमद पटेल यांना बाजूला करण्यात आलं होतं.

काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या सदस्यतेसह इतर सर्व पदावरून अहमद पटेल यांना हटवण्यात आलं.

त्या काळात काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबीयांचा प्रभाव कमी झाला होता. त्यामुळे कुटुंबाचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांसाठी तो काळ कठिण होता.

दिग्विजय सिंह यांच्यासोबत अहमद पटेल

फोटो स्रोत, SHEKHAR YADAV/THE INDIA TODAY GROUP/GETTY IMAGES

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीव गांधी फाऊंडेशनला 20 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. पण सोनिया गांधी यांनी हा निधी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनसाठी निधी जमा करण्याची जबाबदारी अहमद पटेल यांच्याकडे दिली.

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी पटेल यांना मंत्रिपदाचा प्रस्तावदेखील दिला होता. पण पटेल यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. अहमद पटेल गुजरातमधून लोकसभा निवडणूकही हरले. सरकारी निवासस्थान रिकामं करण्यासाठी त्यांना सतत नोटीस येऊ लागल्या.

त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या नजमा हेपतुल्ला यांनी त्यांच्यासाठी इतर सरकारी निवासस्थानांचे पर्याय शोधले. पण यासाठी राव सरकारची मंजुरी मिळणं आवश्यक होतं. अहमद पटेल यांनी नजमा हेपतुल्ला यांचे आभार मानले पण ही मदत स्वीकारली नाही.

पटेल यांच्या समर्थकांच्या मते, ही मदत स्वीकारणं म्हणजे नरसिंह राव सरकारकडून मदत घेणं, असा त्याचा अर्थ होता.

अहमद पटेल अन्य काँग्रेस नेत्यांसोबत

फोटो स्रोत, Getty Images

अहमद पटेल हे अत्यंत धार्मिक म्हणून ओळखले जायचे. यामुळेच नरसिंह राव यांच्या काळात आपण एकटे पडलो, असं त्यांना वाटायचं, हेसुद्धा एक कारण सांगितलं जातं.

धार्मिक ओळखीपासून स्वतःला ठेवलं दूर

बाबरी मशिद प्रकरणात नरसिंह राव यांनी घेतलेली भूमिका पटेल कधीच माफ करू शकले नाहीत.

पण धार्मिक असूनसुद्धा दाढी आणि शेरवानी यांच्यासारख्या धार्मिक चिन्हांपासून पटेल दूर राहायचे.

काँग्रेसच्या विचारसरणीनुसार हिंदुत्वासह इतर सर्व धर्मांचा स्वीकार आपण करत असल्याचं पटेल सांगायचे.

पण अहमद पटेल यांची भाषणं साधारणच असायची. त्यांचा करिश्माही तितका नव्हता. ते एक साधारण सवयी असलेले सामान्य व्यक्ती होते.

अहमद पटेल

फोटो स्रोत, Getty Images

त्यांची मुले, सुना किंवा जावई कुणीही राजकारणात येण्याची इच्छा दाखवलेली नाही. त्यांचे जावई वकील आहेत, ते अत्यंत साधं जीवन जगतात.

काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचे आपण जावई आहोत, ही ओळखही ते दाखवत नाहीत.

कार्यकर्त्यांवर पकड

लोकांना नावासहित ओळखणारे नेतेच राजकारणात यशस्वी होतात, असं म्हटलं जातं.

अहमद पटेल काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांना ओळखायचे, ज्यांची नावं जास्त लोकांना माहिती नव्हती.

अहमद पटेल यांना भेटणार आहे, ती व्यक्ती काय बोलेल याचा ते अंदाज घेत. त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याची माहिती ठेवत. यामुळेच पक्षात त्यांचं स्थान वेगळं होतं.

अहमद पटेल

फोटो स्रोत, Getty Images

ते रात्री उशिरापर्यंत काम करत बसायचे. कोणत्याही वेळी रात्री एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्याला फोन करून ते एखादं काम सोपवायचे.

अत्यंत नियोजनबद्धरित्या ते काम करायचे. त्यांचा एक फोन सतत त्यांच्या जवळ असायचा. हा नंबर कुणाकडेच नव्हता. त्यावर फक्त 10 जनपथवरून फोन यायचे.

पण काँग्रेसमध्ये दुसरं मुस्लीम नेतृत्व तयार झालं नाही, यावरून अहमद पटेल यांच्यावर टीकाही झालेली आहे. सलमान खुर्शीद यांना कांग्रेसमध्ये मुस्लीम नेता म्हणून ओळख मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. यावरून हे लक्षात येऊ शकतं.

( हा लेख ज्येष्ठ पत्रकार आदिती फडणीस यांनी 2017 मध्ये राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस बीबीसी हिंदीसाठी लिहिला होता.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)