अहमद पटेल यांचं निधन, मुलाने ट्वीट करून दिली माहिती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे 3.30 वाजता निधन झालं. त्यांचे पुत्र फैसल पटेल यांनी ट्वीट करून ही माहिती दिला.

एकाचवेळी त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे अहमद पटेल यांचं निधन झाल्याचं फैसल यांनी म्हटलं.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, कोरोनाच्या नियमांचं काटेकार पालन करत सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि कोणत्याही सामूहिक कार्यक्रमाचं आयोजन करू नका, असं आवाहन मी सर्व हितचिंतकांना करतो.

एक महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 71 वर्षांचे पटेल यांनी दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

अहमद पटेल काँग्रेस पक्षाचे खजिनदार होते. अहमद पटेल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते, तोपर्यंत पक्षात त्यांचं मोठं वजन होतं. 1985 साली ते राजीव गांधींचे संसदीय सचिवही होते.

2018 साली काँग्रेसचे खजिनदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. पटेल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले होते, तर पाच वेळा राज्यसभेवर. 2017 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीची खूप चर्चाही झाली होती.

अहमद पटेल यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेत्यांनी दुःख व्यक्त केलं.

"अहमद पटेल यांच्या निधनामुळे दुःखी झालो. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षं घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यांमुळे ते नेहमीच लक्षात राहतील. त्यांचा मुलगा फैसलशी बोललो आणि सहानुभूती व्यक्त केली," असं मोदी यांनी ट्वीट करून म्हटलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना म्हटलं, "अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. काँग्रेस त्यांचा श्वास आणि ध्यास होता. सर्वांत कठीण काळात ते पक्षासोबत उभे राहिले होते."

ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करून म्हटलं की, एक जिवलग मित्र आणि विश्वासू जोडीदार निघून गेला.

त्यांनी लिहिलं आहे, "अहमद पटेल आता आपल्यामध्ये नाहीत. एक जिवलग मित्र आणि विश्वासू जोडीदार निघून गेला. आम्ही 1977 पासून सोबत आहोत. ते लोकसभेत निवडून गेले आणि मी विधानसभेमध्ये. मृदूभाषी, व्यवहार चतुर आणि नेहमी हसतमुख राहणं ही त्यांची वैशिष्ट्यं होती. माध्यमांपासून ते दूर राहायचे, पण काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग होता. काँग्रेस पक्ष त्यांचं योगदान विसरू शकणार नाही.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही ट्वीट करून अहमद पटेलांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, "त्यांच्या निधनामुळे मी खूप दुःखी झालोय. त्यांचा मुलगा फैसलशी रोज बोलणं होत होतं. अहमद पटेल अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. त्यांचं जाणं हे काँग्रेससाठी नुकसान करणारं आहे."

गांधी परिवाराच्या जवळचे असणारे नेते

अहमद पटेल यांचा जन्म 21 ऑगस्ट 1949 साली गुजरात मधील भरूच जिल्ह्यातल्या पिरामल गावात झाला होता.

80 च्या दशकात भरूच हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. अहमद पटेल इथून तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्याच दरम्यान 1984 साली ते दिल्लीत काँग्रेसचे संयुक्त सचिव म्हणून पोहोचले. त्यानंतर ते तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव बनले.

1986 साली अहमद पटेल यांना गुजरात काँग्रेसचं अध्यक्ष बनविण्यात आलं.

1988 साली ते गांधी-नेहरू कुटुंबाद्वारे चालविल्या जाणाऱ्या जवाहर भवन ट्रस्टचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हा ट्रस्ट सामाजिक कार्यासाठी निधी उपलब्ध करून देतो.

हळूहळू अहमद पटेल हे गांधी-नेहरू कुटुंबाच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. राजीव गांधी यांचा त्यांच्यावर जेवढा विश्वास होता, तेवढाच विश्वास सोनियांचाही अहमद पटेल यांच्यावर होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)