प्रताप सरनाईक : वर्ध्यात जन्म, ठाण्यातून सलग तीनवेळा आमदार, असा आहे प्रवास

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. त्यांच्याशी संबंधित ईडीने 2 फ्लॅट आणि एक जमीन जप्त केली आहे. या जप्त केलेल्या प्रॅापर्टीची किंमत 11.35 कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत 3254 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलंय.

NSCL प्रकरणातील आस्था ग्रुपने 21.74 कोटी रूपये विहंग आस्था हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर केले होते. यातील 11.35 कोटी रूपये विंहग एंटरप्रायझेस आणि विहंग इम्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं आहे. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात आहेत.

त्यानिमित्ताने प्रताप सरनाईक हे पुन्हा चर्चेत आले आहेत. प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवास बीबीसी मराठीने शब्दबद्ध केला आहे. तो तुम्हाला या ठिकाणी वाचता येईल.

वर्ध्यात जन्म, ठाण्यातून आमदार

आधी ठाण्यातील बांधकाम व्यवसायात नाव कमावलेल्या प्रताप सरनाईक यांनी 1997 साली राजकारणात प्रवेश केला. 1997 सालच्या ठाणे महापालिका निवडणुकीत ते विजय होऊन पहिल्यांदा नगरसेवक झाले. ठाणे महापालिकेत ते सलग दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले.

मग 2008 साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवळा-माजीवडा मतदारसंघातून आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते सलग तीनवेळा म्हणजे 2009, 2014 आणि 2019 साली आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले.

प्रताप सरनाईक हे आता ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि तिथूनच विधानसभेत प्रतिनिधित्व करत असले, तरी ते मूळचे ठाण्याचे नाहीत.

प्रताप सरनाईक यांचा जन्म 1964 साली वर्धा जिल्ह्यात इंदिराबाई आणि बाबुराव सरनाईक यांच्या पोटी झाला. मग हे कुटुंब मुंबईतील दादरमध्ये स्थलांतरित झालं. तिथून मग ते ठाण्यात स्थलांतरीत झालं.

आचार्य अत्रेंचे सहकारी बाबूराव सरनाईकांचा मुलगा

तुम्हाला इथं एक गोष्ट थोडीशी कुतुहलजनक वाटली असेल, ती म्हणजे 'बाबूराव सरनाईक'.

हो, तेच बाबूराव सरनाईक आहेत, जे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रमुख नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे सहकारी होते. बाबूराव सरनाईक यांनी आचार्य अत्रेंच्या 'दैनिक मराठा'मध्ये मुख्य मुद्रितशोधक म्हणून काम केलं होतं. अत्रेंवरील त्यांचं 'तो एक तळपता सूर्य' हे पुस्तक खूप गाजलं.

'बाबूजी' या टोपणनावाने सर्वांना परिचित असणाऱ्या बाबूराव सरनाईक यांनी काही मराठी पुस्तकांचं लेखन केले. 'हा कुंभ अमृताचा', 'तो एक सूर्य होता', 'कोरांटीची फुले', 'ज्योतिषशास्त्र एक दिव्य दृष्टी', 'स्वप्न साक्षात्कार' ही पुस्तकं बाबूराव सरनाईकांच्या नावे आहेत. 2017 साली त्यांचं निधन झालं.

एक मुलगा नगरसेवक, दुसरा मुलगा MCA सदस्य, पत्नी नगरसेविका

बाबूराव सरनाईक यांना तीन मुलं, प्रताप सरनाईक आणि विलास सरनाईक, तर प्रतिभा सरनाईक ही मुलगी. यांपैकी प्रताप सरनाईक यांचं कुटुंब राजकारणात आहे.

कुटुंब राजकारणात म्हणजे काय, तर स्वत: प्रताप सरनाईक आमदार आहेत, पत्नी परिषा सरनाईक या नगरसेविका, तर दोन्ही मुले विहंग आणि पूर्वेश हे राजकारणात सक्रीय आहेत.

पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आणि नगरसेवक आहेत, तर विहंग सरनाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत.

प्रताप सरनाईक यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांच्या व्यावसायिक कामांची सुद्धा नेहमी चर्चा होत राहते. बांधकाम क्षेत्रातील त्यांची कामगिरी नेहमीच चर्चेत असते. बांधकाम आणि हॉटेलिंग क्षेत्रातील 'विहंग ग्रुप ऑफ कंपनी'चे प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत.

तसंच, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन ते करतात. यातील दहीहंडीचं आयोजन अनेकांना परिचितही आहे.

'मातोश्री'वर थेट पोहोच

दैनिक लोकमतचे ठाणे ब्यूरो चीफ नारायण जाधव सांगतात, "प्रताप सरनाईक हे मूळचे ठाण्याचे नसले तरी त्यांनी आता आपली जागा निर्माण केलीय. दोन-अडीच दशकांहून अधिक काळ ते ठाण्यातील राजकारणात सक्रीय सुद्धा आहेत."

"राष्ट्रवादीत असताना अजित पवार यांच्या जवळचे होते, तसे आता ते उद्धव ठाकरे यांच्याही जवळचे आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद राखून असतात. या सर्व गोष्टींचा त्यांना त्यांच्या राजकीय वाटचालीत फायदाच झालाय."

"व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या प्रताप सरनाईक यांनी राजकारणात आल्यापासून आजवर मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास लक्षात येतं की, त्यांच्या पदांचा आलेख कायमच चढता राहिलाय," असंही नारायण जाधव सांगतात.

ठाण्यातील सर्व नेत्यांशी ते मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असतात. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतची त्यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे.

राष्ट्रवादीत असताना प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना दिलेल्या हिरेजडित मोबाईल भेटीचीही खूप चर्चा झाली होती.

अजित पवारांना हिरेजडित मोबाईल गिफ्ट

2008 साली राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडण्याआधी प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना तब्बल 15 लाख 55 हजार 555 रुपयांचा हिरेजडित मोबाईल भेट दिला होता.

अज्ञात भाविकाने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात हा हिरेजडित मोबाईल दान केला होता. मंदिराच्या विश्वस्तांनी या मोबाईलचा लिलाव केला. त्यावेळी ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या प्रताप सरनाईक यांनी तो मोबाईल खरेदी केला आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना भेट दिला होता.

मात्र, पुढे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुन्हा तो मोबाईल सिद्धिविनायक मंदिराकडे सुपूर्द केला. त्यावेळी या सर्व घटनाक्रमाची प्रचंड चर्चाही झाली होती.

'पहिल्यांदाच सरनाईक चौकशीच्या फेऱ्यात'

"प्रताप सरनाईक यांची राजकीय कारकीर्द वीस-पंचवीस वर्षांची आहे. या काळात त्यांची अशाप्रकारे चौकशी कधीच झाली नाही. त्यामुळे ईडीच्या निमित्ताने त्यांना पहिल्यांदाच चौकशीला सामोरं जावं लागतंय," असं वरिष्ठ पत्रकार रवी मांजरेकर सांगतात.राजकारणात येण्याच्या आधीपासूनच ते व्यवसायात होते आणि ते जगजाहीर होतं, त्यामुळे त्याबाबत कुणी आक्षेपही घेतले नाही, असं मांजरेकर म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)