You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक : तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी कोण आहेत?
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात यावेळी दोन उपमुख्यमंत्री असतील.
नितीश कुमार यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात भाजपचे सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. मात्र आता त्यांच्या जागी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत. कोण आहेत हे दोघं?
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी आज शपथ घेतली.
नितीश यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात भाजपचे सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होते. मात्र आता त्यांच्याऐवजी अन्य काही नावं चर्चेत आहेत. एकाऐवजी भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपद दिली गेलं आहे.
सुशीलकुमार मोदी यांच्याऐवजी तारकिशोर प्रसाद यांना संधी मिळण्याची चिन्हं आहेत. बिहार विधानसभा आणि विधानपरिषद भाजप नेते म्हणून तारकिशोर यांच्या नावाची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली.
64 वर्षीय तारकिशोर 2005 पासून कटिहार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आरजेडीच्या राम प्रकाश महतो यांना दहा हजार मतांच्या फरकाने हरवलं.
तारकिशोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न होते. त्यांचं मूळ गाव सहरसा जिल्ह्यातील तलखुआ हे आहे. तारकिशोर यांना कलवार वैश्य समाजाची पार्श्वभूमी असून, बिहारमध्ये या समाजाला मागासवर्गीय दर्जा आहे.
तारकिशोर यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. मेडिकल स्टोअरही त्यांनी चालवलं आहे. 2001 मध्ये ते कटिहार चेंबर ऑफ कॉमर्सचे ते अध्यक्षही होते.
कटिहारच्या व्यापारी वर्गावर त्यांची चांगली पकड आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे नेते म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर कटिहारमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
तारकिशोर यांनी 2005मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली. अटीतटीच्या मुकाबल्यात त्यांनी डॉ. प्रकाश रामप्रकाश महतो यांना अवघ्या 165 मतांनी नमवलं होतं.
त्यानंतर 2010 2015 मध्ये त्यांनी दणदणीत मताधिक्यासह विजय मिळवला.
कशिश न्यूजचे प्रतिनिधी रितेश रंजन यांच्या मते, यंदाच्या निवडणुकीत वातावरण त्यांच्या बाजूने नव्हतं मात्र तरीही ते 10,000च्या फरकाने निवडून आले.
कटिहार इथं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. पुरामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. ठिकठिकाणी पाणी साठण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले होते. कटिहारमधल्या काही नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. यंदा तारकिशोर यांचा विजय अवघड मानला जात होता. मात्र तरीही ते जिंकून आले.
रेणू देवी
तारकिशोर यांच्याबरोबरीने बेतिया इथल्या उमेदवार रेणू देवी यांची विधिमंडळाच्या उपनेत्या म्हणून निवड झाली. रेणू देवीही वैश्य समाजाच्या आहेत.
तारकिशोर आणि रेणू देवी भाजपचे जुनेजाणते नेते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक महत्त्वाची आहे.
ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर यांनी रेणू देवींच्या वाटचालीविषयी सांगितलं. ते म्हणाले, भाजपचे अनेक नेते असं म्हणत आहेत की बिहार भाजपमध्ये सर्व महत्त्वाच्या पदांवर बनिया समाजाची माणसं आहेत. नेत्यांची निवड करताना जातीची समीकरणं लक्षात घेतलेली नाहीत असा सूर उमटतो आहे.
मणिकांत ठाकूर यांच्या मते तारकिशोर कटिहारमधल्या विद्यार्थी राजकारणाचाही भाग होते. मात्र त्यांना तेवढा जनाधार नाही. तारकिशोर आणि रेणू देवी यांना संधी मिळणं म्हणजे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचं महत्त्व कमी झालं आहे.
सर्वसामान्य माणसं आणि भाजप नेत्यांमध्ये अशी चर्चा रंगू लागली की सुशीलकुमार मोदी हे भाजपपेक्षा नितीश कुमार यांच्या जवळचे आहेत. भाजपमध्येच त्यांच्याविरोधात सूर उमटू लागला होता. त्यामुळेच ते सर्वमान्य नेतृत्व होऊ शकले नाहीत. म्हणूनच एनडीएच्या नव्या सत्तासमीकरणातून सुशील मोदींना बाजूला करण्यात येईल अशी चिन्हं आहेत.
सुशील कुमार यांची भूमिका बिहार भाजपपुरती मर्यादित ठेऊन अन्य कुठली तरी जबाबदारी दिली जाऊ शकते.
तारकिशोर आणि रेणू देवी यांचं महत्त्व वाढण्यामागचं कारण देताना ठाकूर सांगतात, नितीश यांचा बोलबाला असता तर भाजपला सुशीलकुमार मोदींना बाजूला करता आलं नसतं. सुशीलकुमार मोदी बाजूला होणं याचा अर्थ सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार असले तरी सत्तेच्या चाव्या भाजपच्याच हातात आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)