बिहारमध्येही आता भाजप आणि जेडीयूमध्ये छोटा भाऊ - मोठा भाऊ वाद रंगणार?

    • Author, नीलेश धोत्रे
    • Role, बीबीसी मराठी

'नितीश सब के है,' (ज्या वरून सर्व जातींचे की सर्व पक्षांचे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती) हा नारा बिहार निवडणुकांमध्ये जनता दल संयुक्त म्हणजेच जेडीयूने दिला आणि लगोलग अमित शहांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन बिहारमध्ये भाजप मोठा पक्ष ठरला तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील हे जाहीर करून टाकलं.

नितीश कुमार यांनी 'हा' नारा देणं, भाजपनं त्यांनाच मुख्यमंत्रिपदाचं उमेदवार म्हणून जाहीर करणं आणि चिराग पासवान यांनी एनडीतून बाहेर पडून फक्त जेडीयूच्या विरोधात उमेदवार देणं. या घटना आणि निवडणुकांच्या निकालांचा अर्थ लावायला गेलं तर बिहारमध्येही आता अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलं 'लहान भाऊ, मोठा भाऊ' राजकारण सुरू होणार का, हा सवाल उपस्थित होत आहे.

त्याला कारणही तसंच ठरत आहे, बिहारच्या निवडणुकांचे कल स्पष्ट होताना दिसल्यावर भाजपच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष अजितकुमार चौधरी यांनी आता बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातली ही मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होऊ देण्यासाठी नितीशकुमार तयार होतील की 'नितीश सबके है' या घोषवाक्यचा भाजपला पुन्हा प्रत्यय येईल की जेडीयू आणि भाजपमध्ये शिवसेना-भाजप सारखं द्वंद्व सुरू होईल?

बिहारमध्ये कोण मोठा भाऊ कोण छोटा भाऊ?

2014 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-भाजप युतीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यांच्या भूमिकेत बदल झाल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. त्या अनुषंगाने झालेल्या कुरघोड्या, टीकाटिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी फार जुन्या नाहीत.

बिहारमध्ये जेव्हा जेव्हा याआधी 'मोठा भाऊ आणि छोटा भाऊ' हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे, तेव्हा 'आम्ही जुळे भाऊ आहोत' असंच दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं आहे.

पण आता मात्र परिस्थिती वेगळ आहे. जेडीयूपेक्षा जास्त जागा निवडून येत असल्यामुळे भाजप सत्तेत जास्तीचा वाटा मागेल की अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्मुला ठेवला जाईल याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

त्यातच 'शिवसेनेला धन्यवाद दिले पाहिजेत. भाजप आता त्यांच्या मित्रांना व्यवस्थित वागवतंय,' असं म्हणत संजय राऊत यांनी नितीश यांना महाराष्ट्राच घडलेल्या घडामोडींची आठवण करून दिली आहे.

बिहारच्या राजकारणाचा अभ्यास असलेले पत्रकार अभिजीत ब्रह्मनाथकर यांना मात्र बिहारमध्ये छोटा भाऊ, मोठा भाऊ स्थिती येणार नाही असं वाटतं.

"बिहारच्या राजकारणात भाजपला मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असं होऊ द्यायचं नाही. आम्ही आमच्या मित्र पक्षांना धोका देतो आम्ही त्यांना सामावून घेत नाही हा संदेश भाजपला राष्ट्रीय पातळीवर जाऊ द्यायचा नाही. त्यामुळे नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार हे निवडणुकीच्या आधीपासूनच सांगत आहेत. आजही बिहारचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जैस्वाल यांनी सुद्धा नितीशच मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे," असं अभिजीत ब्रह्मनाथकर यांना वाटतं.

"स्वतःचे कमी आमदार असताना मुख्यमंत्रिपद राखणं आणि सत्ता चालवणं नितीश कुमार यांच्यासाठी कठीण आहे," असं बीबीसी हिंदीचे डिजिटल एडिटर राजेश प्रियदर्शी सांगतात.

"जेडीयूचे भाजपबरोबर काही मुलभूत मुद्द्यांवर मतभेद आहेत. सीएए किंवा एनआरसीसारख्या मुद्द्यांवर त्यांची वेगळी मतं आहेत. अशावेळी युतीतल्या मोठ्या भावाला छोट्या भावाचं स्थान देऊन सत्ता चालवणं नितीश यांच्यासाठी कठीण आहेत. अशा स्थितीत ते एक कमजोर मुख्यमंत्री असतील. तसंच त्यांना सर्व महत्त्वाच्या निर्णयांसाठी भाजपवर अवलंबून राहावं लागेल. जास्त आमदार येऊनही भाजपच्या नेत्यांना दुय्यम स्थान किती पचनी पडतं हासुद्धा मुद्दा आहे," असं राजेश प्रियदर्शी सांगतात.

2015च्या निवडणुकांमध्येसुद्धा जेडीयूच्या आरजेडीपेक्षा कमी जागा आल्या होत्या. तेव्हा लालूप्रसाद यादव यांनी ठरल्याप्रमाणे नितीश यांना मुख्यमंत्री केलं खरं, पण अशा प्रकारे दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचं मुख्यमंत्रिपद सांभाळताना पहिल्या क्रमांकाचा पक्ष कसा वागवतो याचा चांगला अनुभव नितीश यांच्या गाठीशी असल्याची आठवण राजेश प्रियदर्शी करून देतात.

बिहारच्या राजकारणाचा जवळून अभ्यास करणारे ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर यांच्या मते आता नितीशकुमार यांना छोट्या भावाची भूमिका मान्य करावी लागेल. आता दोन्ही पक्षांच्या रोलमध्ये बदल होईल.

नावापुरतं मुख्यमंत्रिपद घेऊन सत्तेच्या चाव्या भाजपकडे ठेवण्यात नितीशकुमार राजी होण्याची शक्यता फार कमी आहे, अशी बिहारमध्ये चर्चा आहे. अशाच नितीश स्वतःच भाजपला मुख्यमंत्रिपद देऊन टाकतील का? हा प्रश्नही विचारला जात आहे.

नितीश कुमारांना बदलणं भाजपसाठी कठीण?

"पण बिहारमध्ये एनडीएची सत्ता स्थापन करताना नितीश यांचा चेहरा लगेच बदलणं भाजपलं तितकं सोपं नाही," असं बीबीसी हिंदीचे संपादक मुकेश शर्मा यांना वाटतं.

पण त्या मागची काय कारणं आहेत? बिहार भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही की सुशीलकुमार मोदी यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास नाही?

भाजपला गेल्या पंधरा वर्षांत काही करून मोठ्या भावाच्या भूमिकेत येता आलं नाही हे त्या मागचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जातं. शिवाय भाजपला तिथं कुणालाही पक्षाचा चेहरा म्हणून पुढे आणता आलं नाही.

मणिकांत ठाकूर यांच्या मते, सुशीलकुमार मोदी हे बिहार भाजपचे सर्वमान्य नेते नाहीत. भाजपचे इतर गट त्यांना जुमानत नाहीत. शिवाय 15 वर्षांत त्यांना बिहार भाजपचा चेहरा बनण्यातही अपयश आलं.

"बिहारमध्ये सुशीलकुमार मोदी यांना नितीश यांच्या गोटातले नेते म्हणूनच पाहिलं जातं, एक अर्थी ते दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत," असं विश्लेषण ठाकूर करतात.

ठाकूर यांच्या या वक्तव्यावरून हे लक्षात येतं की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सुशीलकुमार मोदी यांच्यावर विश्वास का नसावा.

पण अशी काय कारणं आहेत, ज्यामुळे भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आणि जेडीयूला एवढा तोटा सहन करावा लागला.

चिराग यांनी एनडीएमध्ये आग लावली?

ऐनवेळी एनडीएतून बाहेर पडत चिराग पासवान यांनी बिहारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. नितीशकुमार यांनाच त्यांचा विरोध असल्याचं त्यांनी जाहीर केलं. शिवाय त्यांनी फक्त जेडीयूच्याविरोधातच उमेदवार दिले. त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीनं 136 जागी उमेदवार दिले होते.

"भाजपला आपला विरोध नाही, नरेंद्र मोदी माझ्या मनात वसतात, मी त्यांचा हनुमान आहे. पाहिजे तर माझी छाती फाडून पाहा," या चिराग यांच्या वक्तव्याने तर निवडणुकांमध्ये आणखी रंगत आणली.

पण चिराग यांच्या या पवित्र्यामुळे नितीशकुमार आणि जेडीयू मात्र चांगलेच भडकले. जेडीयूने चिराग यांच्याविरोधात आघाडीच उघडली.

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोकांसाठी व्हीडिओ शूट करताना चिराग यांनी केलेल्या वक्तव्यांचा आधार घेऊन जेडीयूकडून चिराग यांच्याविरोधात रान उठवण्याचा प्रयत्न झाला.

लोजपा म्हणजे भाजपची बी टीम आहे असा आरोपसुद्धा त्यांच्यावर झाला.

"लोजपाच्या उमेदवारांमुळे नितीश यांच्या जेडीयूच्या उमेदवारांचा जेवढा तोटा झाला तेवढाच आरजेडीच्या उमेदवारांचा झाल्याचं दिसून आलं आहे. जर चिराग पासवान यांचा पक्ष नितीश यांच्याविरोधात उभा राहिला नसता तर सत्ताविरोधी सगळीच्या सगळी मतं ही तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला मिळाली असती. चिराग यांनी हा अतिशय विचारपूर्वक हा डाव खेळला आहे. त्यांच्यामुळे जेडीयूच्या जागा कमी झाल्या तर त्याचा फायदा भाजपला होणारच आहे. ते भाजप आणि जेडीयूला पाहिजेच आहे," असं अभिजीत ब्रह्मनाथकर सांगतात.

लोकांची नाराजी फक्त नितीश यांच्या वाट्याला गेली का?

15 वर्षांची अॅंटिइन्कबन्सी आणि आरजेडीशी घरोबा तोडून पुन्हा भाजप बरोबर थाटलेला संसार यामुळे नितीशकुमार यांची छबी पलटूरामची झाली होती. त्यात त्यांनी सातत्याने भूमिका बदलली.

"बिहारमध्ये बिजली, सडक, पाणी या गोष्टी आल्यानंतर लोकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा वाटत होता. पण नितीश कुमार यांचं त्यावर फारसं काम नव्हतं. त्यातच कोरोनाच्या काळात स्थलांतरीत मजुरांना सुविधा देण्यात ते असमर्थ ठरले, त्यामुळे जनतेमध्ये रोष पसरला. त्यातच तेजस्वी यांनी रोजगाराचा उपस्थित केलेला मुद्दा नितीश यांच्यासाठी भारी पडला," असं अभिजीत सांगतात.

तर "लोकांची नितीशकुमार यांच्यावर नाराजी होती आणि ती 15 वर्षांची अॅंटिइन्कबन्सी फक्त नितीशकुमार यांच्या वाट्याला जाईल याची तजवीज करण्यात भाजपला यश आलं. आम्ही सत्तेत दुय्यामस्थानी होतो हे लोकांना पटवण्यात भाजपला यश आलं असं," मणिकांत ठाकूर सांगतात.

"भाजपनं जागा वाटपात चांगल्या जागा त्यांच्या पदरी पडतील आणि कुठलाही चेहरा न देता मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली, त्याचा त्यांना फायदा झाला," असं अभिजीत सांगतात.

लोकांची मतं कुणाला?

अभिजीत यांच्या मते, 'बिहारमध्ये लोकांनी मतं नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याला दिली आहे.'

"योजनांच्या अंमलबजावणी बिहारमध्ये नरेंद्र मोदी सरस दिसतात. नितीन गडकरी यांच्या मंत्रालयानं तयार केलेल्या रस्त्यांमुळे विकास आपल्यादारी आल्याचं लोकांना वाटलं. शिवाय महिलांसाठी आणलेल्या योजनांमुळे त्याही मोदींवर खूष आहेत," अस अभिजीत सांगतात.

ते पुढे सांगतात, "नितीश यांच्या सरकारनं मुलींना सायकल दिल्या. महिलांना नितीश यांच्या राज्यात मोकळा श्वास घेता आला. बलात्कार, खून-मारामाऱ्या यांच्या शृंखलेवर नितीश यांनी जरब बसवला. पण लालूंबरोबर सत्तेत गेल्यानंतर त्यांची प्रशासनावर कमी झालेली पकड तसंच त्यांनी सातत्यांनी बदलेल्या भूमिकांमुळे एक विशिष्ट वर्ग त्यांच्यावर नाराज झाल्याचं दिसून आला आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)