सौमित्र चॅटर्जी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं. कोव्हिडशी निगडीत गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. ते 85 वर्षांचं होते.

ऑस्करविजेते दिग्दर्शक सत्यजित रे यांच्याबरोबर सौमित्र यांनी काम केलं होतं.

त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा प्रदीर्घ काळ विस्तारली होती. सौमित्र यांनी तीनशेहून अधिक चित्रपटात अभिनय केला. ते संहितालेखक, रंगभूमीकार आणि कवीही होते.

काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आली. मात्र त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

अप्पू ट्रायॉलॉजीतील अपूर संसार हा सौमित्र यांचा पहिला चित्रपट. सत्यजित रे यांच्या 14 चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली.

2012मध्ये सौमित्र यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. 2004 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार 'लीजन द ऑनर'ने गौरवण्यात आलं.

सौमित्र यांनी शाळेत असतानाच काम करायला सुरुवात केली. कॉलेजात असताना एका मित्राने सौमित्र यांची सत्यजित रे यांच्याशी ओळख करून दिली. ही अवचित झालेली भेट होती. पण यातूनच रे आणि सौमित्र यांचे ऋणानुबंध जुळले.

रे यांनी मला चित्रपटासाठी विचारलं, तेव्हा काय उत्तर द्यावं ते मला कळलं नाही. रंगभूमी आणि सिनेमा यातला फरक मला माहिती नव्हता. मी अभिनयात थोडा अति ठरेन असं मला वाटलं होतं असं सौमित्र यांनी मॅरी सेटन या चित्रपट समीक्षकाशी बोलताना सांगितलं होतं.

सोनार केला चित्रपटात त्यांनी शेरलॉक होम्सप्रमाणे डिटेक्टिव्ह साकारला होता. देवी चित्रपटात लग्नाळू तरुण साकारला. अभिजानमध्ये त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका केली होती. असानी संकेत चित्रपटात गावातल्या धर्मगुरूची व्यक्तिरेखा साकारली होती. चारुलता या गाजलेल्या चित्रपटात रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारली होती.

नैसर्गिक संवेदनशील अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य होतं असे सेटन यांनी लिहिलं आहे.

रे यांची आठवण निघाली नाही असा एकही दिवस गेला नाही. ते सदैव माझ्या स्मरणात आहेत आणि असतील. ते माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत असं सौमित्र यांनी सेटन यांना सांगितलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)