संजय राऊत-अर्णब गोस्वामी: रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही #5मोठ्या बातम्या

विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांनी दिलेल्या बातम्यांमधील मुख्य बातम्यांचा घेतलेला आढावा

1. रामाचे राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही

प्रभू राम हे विजय प्राप्त करून अयोध्येत आले तेव्हा लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. तो उत्सव म्हणजे दिवाळी. अयोध्येत राममंदिर पूजन झालं आहे.

बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच जय श्रीरामचे नारे दिले पण रामाचं राज्य येऊनही कोरोनाचा रावण मारला जात नाही. संजय राऊत यांनी रोखठोक सदरात पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. रोखठोक सदरात राऊत यांनी हे म्हटलं आहे.

तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते असे सांगत राऊत यांनी अर्णब गोस्वामी यांना टोला लगावला आहे. वृत्तवाहिनीचा प्रमुख गुन्हेगारी स्वरुपाच्या कृत्याबद्दल तुरुंगात गेला. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे तो तुरुंगातून सुटून बाहेर पडला तेव्हा भारतमाता की जय घोषणा देऊ लागला. येथे भारतमातेचा काय संबंध?

ज्या तरुण उद्योजकाने छळास कंटाळून आत्महत्या केली, त्या अन्वय नाईक यांचीही भारतमाता होतीच व अन्वय नाईकाच्या पत्नीचीही भारतमाता आहेच. भारतमातेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा उत्सव एका व्यक्तीपुरता नसतो. भारतमाता सगळ्यांची आहे.

बिहारच्या निवडणुकीतील राजकीय पीछेहाट, पराभवसुद्धा सण म्हणून साजरे केले जात आहेत. मग मुंबई, महाराष्ट्रातल्या लोकांनी सण, परंपरांचे पालन का करू नये असा सवाल राऊत यांनी केला आहे.

2. आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाही, ते स्वत:हूनच पडेल- गिरीश महाजन

राज्यात सरकारविरोधात असंतोष आहे. शेतकरी, एसटी कर्मचारी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता नाराज आहे. भाजप, सरकार पाडणार असल्याची आवई उठवली जाते. तिघांचे पायात पाय अडकून तेच पडणार आहेत असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

शिवसेनेने आमचा घात करून ते सत्तेत बसले आहेत. त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या आहेत. आम्ही विरोधी पक्षाचं काम करत आहोत. परंतु सत्ताधारी पक्षच घाबरलेल्या स्थितीत आहे. राज्यात सरकारमधील मंत्री आणि नेते अस्वस्थ आहेत. या सरकारचा काळ आणि वेळ निश्चित येईल असंही ते पुढे म्हणाले.

3. भाजपकडून ईव्हीएमचा गैरवापर; काँग्रेस नेत्यांचा आरोप

बिहारमधील निवडणूक निकाल आणि इतर राज्यातील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांनी अपयशाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडलं आहे.

"मध्य प्रदेशातील जनतेची देहबोली ही काँग्रेसच्या बाजूने होती. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्या अर्थाने ही निवडणूक एकतर्फी होती.

महाआघाडीचा बिहार आणि काँग्रेसचा मध्य प्रदेशमध्ये विजय निश्चित होता. मात्र भाजपने ईव्हीएम मशीनचा गैरवापर केला. विकसित देशांनी ईव्हीएमचा वापर थांबवला आहे. मग आपण का ईव्हीएम वापरतोय? ज्या दिवशी बॅलेट पेपरच्या मदतीने निवडणुका आयोजित केल्या जातील त्या दिवशी भाजपला त्याची औकात समजेल", असं काँग्रेस नेते एसएस वर्मा यांनी म्हटलं आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

4. बीडमध्ये तरुणीवर अॅसिड हल्ला

पुण्याहून गावी परतत असलेल्या तरुणीवर रस्त्यातच अॅसिड हल्ला करण्याची घटना बीड येळंब घाट परिसरात घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगावातील ही तरुणी आहे. ती पुण्याहून आपल्या गावी परतत असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास, निमर्नुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज रस्त्यावर हा प्रकार घडला.

आरोपीने तरुणीवर अॅसिड फेकलं, त्यानंतर आरोपीने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिलं. त्यानंतर आरोपी फरार झाला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोल यामुळे 48 टक्के शरीर भाजले असून, तिची प्रकृती स्थिर आहे. पहाटे तीन ते दुपारी दोन वाजेपर्यंत तरुणी रस्त्याच्या बाजूलाच पडली होती. 'लोकमत न्यूज18' ने ही बातमी दिली आहे.

5. लागिरं झालं जी मालिकेतील जिजींचे निधन

लागिरं झालं जी मालिकेत जिजींची भूमिका साकारणाऱ्या कमल ठोके यांचं शनिवारी दीर्घ आजाराने निधन झालं. कमल यांना कर्करोग झाला होता. कराड येथील त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

कमल यांनी 33 वर्ष अध्यापनाचं काम केलं. 2005 मध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या कार्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता.

सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात काम केलं. बाबा लगीन, माहेरचा अहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, आम्ही असू लाडके, मुख्यमंत्री गावडे या चित्रपटांमधून भूमिका केल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)