You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्यास पुन्हा लॉकडाऊनची गरज पडणार नाही?
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली तर लॉकडाऊन लावायची गरज पडणार नाही असं त्रैराशिक आहे का?
कोव्हिड-19 काळात लॉकडाऊनने सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मोठ्या प्रमाणावर कोव्हिड चाचण्या केल्यास म्हणजेच मास टेस्टिंग केल्यास नव्याने लॉकडाऊन लादण्याची गरज पडणार नाही, सामान्य आयुष्य जगता येईल, असा एक समज आहे.
कोरोना विषाणूचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यासारखा दुसरा प्रभावी पर्याय नाही, असं मत ब्रिटनच्या काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी यूके आणि लिव्हरपूरमध्ये अशा प्रकारच्या मास टेस्टिंगची घोषणा केली आहे. मात्र, मास टेस्टिंगमधून नेमकं काय साधलं जाईल?
ऑक्सफोर्ड विद्यापीठातील सर जॉन बेल लाईफ सायंसेससंबंधी सरकारचे सल्लागार आहेत. सर जॉन बेल यांच्या मते, "मास टेस्टिंगमुळे धोका कमी होऊ शकतो. मात्र, त्याविषयी अवास्तव प्रचार करू नये, हे महत्त्वाचं आहे."
मास टेस्टिंग
मास टेस्टिंगची कॅन्सर स्क्रिनिंगशी तुलना करता येईल. कॅन्सर स्क्रिनिंगमध्ये ज्याप्रमाणे सुदृढ व्यक्तींची स्क्रिनिंग करतात आणि त्यात काही समस्या आढळल्यास त्यावर तात्काळ उपाय करता येतात. तसाच हा प्रकार आहे.
कॅन्सर स्क्रिनिंगमध्ये कुणाला कॅन्सर होऊ शकतो, हे शोधलं जातं. तसंच कोव्हिड-19 च्या चाचणीत सुदृढ व्यक्तींची चाचणी करून असिम्पोमॅटिक रुग्णांची ओळख पटवली जाते.
मास टेस्टिंग करून जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील त्यांना क्वारंटाईन करून या विषाणूपासून सुटका होऊ शकले, असं सांगितलं जातं. पॉझिटिव्ह रुग्ण आयसोलेट झाल्याने लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही.
चीनमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा प्रकारे मास टेस्टिंग करण्यात आलं आहे.
मास टेस्टिंग करण्यासाठी आणखीही काही मार्ग आहेत.
- हॉस्पिटल्स किंवा केअर होममध्ये नियमितपणे, अगदी रोज चाचण्या केल्या तरीसुद्धा कोव्हिड-19 चा सर्वाधिक धोका असणाऱ्यांचा या आजारापासून बचाव करणं शक्य आहे.
- शिवाय शाळा, महाविद्यालयं सुरू केल्यास तिथेही नियमितपणे चाचण्या करून कोव्हिड-19 ला आळा घालता येईल.
- आणखी एक मार्ग म्हणजे चित्रपटगृह किंवा एखादा सामना बघायला जाण्याआधी एकदा (one-off) चाचणी करून घेणे.
मात्र, बर्मिंगघम विद्यापीठातले प्रा. जॉन डिक्स म्हणतात, "one-off चाचण्या उत्तम उपाय आहे आणि त्याची आपल्याला गरज आहे. मात्र, त्याचा किती चांगला उपयोग होईल, हे नेमकं समजून घेतलं पाहिजे आणि त्यावर फार अवलंबून राहता कामा नये."
मास टेस्टिंग तंत्रज्ञान
मास टेस्टिंगसाठी प्रयोगशाळेत नमुना पाठवून चाचणी करण्याची गरज नाही. त्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट विकसित करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचा निकाल अगदी एक ते दोन तासात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणं शक्य झालं आहे.
कोव्हिडच्या रॅपिड चाचण्यांची किट ही प्रेगनंसी चाचण्यांच्या किटप्रमाणेच आहे. शिवाय, सोप्या, स्वस्त आणि कमी वेळेत रिझल्ट देणाऱ्या आहेत.
नाकातून घेतलेला स्वॅब किंवा तोंडातल्या लाळेचा नमुना पट्टीच्या एका बाजूला ठेवायचा, व्यक्ती कोरोनाबाधित असेल तर पट्टीवर रेषा उमटते. यासाठी लॅबोरेटरीजची गरज पडत नाही.
व्यापक प्रमाणावर चाचण्या किंवा रॅपिड चाचण्यांचा विषय निघाला की आणखी एका चाचणीविषयी आवर्जून बोललं जातं. ती आहे LAMP (Loop-mediated Isothermal Amplification) चाचणी.
मात्र, या चाचणीतही नाकातून किंवा तोंडातून लाळेचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत पाठवावा लागतो. तिथे प्रशिक्षित कर्मचारी त्या नमुन्यांची चाचणी करतात. या चाचणीसाठीही वेळ लागतो.
वेगवान आणि सुलभ विरुद्ध अचूकता
शरीरात कोरोना विषाणू आहे की नाही, हे शोधून काढण्यासाठी सध्या ज्या PCR चाचण्या केल्या जातात त्या रॅपिड चाचण्यांपेक्षा अधिक अचूक आहेत.
बीबीसीशी बोलताना सर जॉन म्हणाले, "रॅपिड चाचण्या निर्दोष नाहीत. तुम्हाला जर ती PCR चाचणी वाटत असेल तर तुम्ही चूक करत आहेत."
रॅपिड चाचण्या किती अचूक आहेत, यासंदर्भातला सार्वजनिक डेटा अजून उपलब्ध नाही.
सर जॉन म्हणतात पाचशेपैकी एक आणि हजारांमधून एकाला कोरोनाबाधित नसूनही कोरोनाची लागण झाल्याचं (फॉल्स पॉझिटिव्ह) सांगण्यात आलं आहे.
जेव्हा व्यापक प्रमाणावर चाचण्या घेतल्या जातात तेव्हा ही आकडेवारी खूप मोठी होते. आठवड्यातून दोनवेळा 6 कोटी व्यक्तींच्या चाचण्या केल्या तर त्यात 'फॉल्स पॉझिटिव्ह' असणाऱ्यांची संख्या खूप मोठी असेल.
इतकंच नाही तर शरीरात विषाणूची पातळी जास्त असेल तर या चाचण्या 90% बरोबर येतात. मात्र, विषाणूची पातळी कमी असेल तर चाचण्यांची अचूकता 60 ते 70 टक्केच असते.
पॉझिटिव्ह की संसर्ग वाहक?
पीसीआर चाचणी या कोरोना विषाणूचा संसर्ग शोधून काढण्यासाठीची सर्वोत्तम चाचणी आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन बराच काळ ओलांडून गेला असेल आणि अशा व्यक्तीच्या शरीरात विषाणू असूनही तो सक्रिय नसेल तर ती व्यक्ती संसर्ग पसरवू शकत नाही. मात्र, अशा व्यक्तीची पीसीआर चाचणी केल्यास ती पॉझिटिव्ह येते. ही या चाचणीतली मोठी अडचण आहे.
या उलट रॅपिड चाचण्यांमध्ये चाचणी पॉझिटिव्ह येण्यासाठी शरीरातली विषाणूची पातळी अधिक असणे गरजेचं असतं. नाहीतर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सक्रिय कोरोना विषाणू असूनही त्याची चाचणी निगेटिव्ह येऊ शकते.
मात्र, रॅपिड चाचण्यांमुळे 'पॉझिटिव्ह' रुग्णांवर लक्ष केंद्रित करायला मदत होते, असा युक्तिवाद ब्रिटनच्या पंतप्रधानांपासून अनेकांनी मांडला आहे.
प्रा. डिक यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात, "रॅपिड टेस्टचा काहीच डेटा उपलब्ध नाही. मला वाटतं आपण घाई करतोय. लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी ही चाचणी किती उपयुक्त ठरेल, सांगता येत नाही."
याचाच अर्थ सुरुवातीच्याच टप्प्यात विषाणूचा संसर्ग शोधून काढण्यासाठी दर दोन दिवसांनी चाचणी करावी लागेल. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे जास्त चाचण्या म्हणजे जास्त 'फॉल्स पॉझिटिव्ह' रिझल्ट्स.
रॅपिड चाचण्या उपयुक्त ठरतील का?
सर जॉन यांच्या मते रॅपिड चाचण्यांमुळे लक्षणं नसणाऱ्या निम्म्या कोरोनाग्रस्तांचीही ओळख पटवता आली तरीही या चाचण्या उपयुक्त आहेत.
ते म्हणतात, "याचा अर्थ ज्यांची तुम्ही कधी चाचणीच केली नसती (लक्षणं नसल्यामुळे) अशा निम्म्या व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचं कळू शकेल."
एका व्यक्तीचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं. तर...
- लॉकडाऊन. 1000 लोकांना एका दिवसासाठी आयसोलेट करावं लागतं.
- अॅप नोटिफिकेशनवरून 70 लोकांना एका दिवसासाठी आयसोलेट करावं लागतं.
- पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या आणि लक्षणं असणाऱ्या 5 लोकांना एका दिवसासाठी आयसोलेट करावं लागतं.
- लॅटरल फ्लो चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या किमान 2 ते 3 लोकांना दिवसभरासाठी आयसोलेट करावं लागतं.
ही ब्रिटनची आकडेवारी आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातल्या प्रा. टिम पेटो यांनी यासंदर्भातलं विश्लेषण लवकरच प्रकाशित होणार आहे.
व्यापक चाचण्यांमधल्या त्रुटी
कुठल्याही प्रकारची व्यापक स्क्रिनिंग किंवा चाचणी करायची असेल तर त्याची उपयुक्तता आणि दुष्परिणाम यांचा समतोल साधला गेला पाहिजे. ब्रिटनमध्ये ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग कार्यक्रम राबवला जातो. मात्र, याचेही फायद्यांपेक्षा तोटेच अधिक असल्याचं काही डॉक्टरांचं मत आहे.
प्रा. डिक्स म्हणतात, "चाचण्यांमधल्या चुकांमुळे त्याचे दुष्परिणाम आणि स्क्रीनिंग करताना अनेक चुका होतात."
एखाद्याला विषाणूची लागण झालेली नसताना लागण झाली आहे, असं सांगितल्यास त्याच्यावर विनाकारक आयसोलेट राहण्याची वेळ ओढवेल.
इतकंच नाही तर फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट असणारे व्यक्ती समाजासाठी अधिक धोकायदायक ठरू शकतात. कारण चाचणी निगेटिव्ह आल्यावर ते समाजात मोकळेपणाने वावरतील.
लोक कदाचित चाचणी करणारही नाही
केवळ चाचण्या करून हे आरोग्य संकट परतवून लावता येणार नाही. लोक चाचण्या करून घेतील का आणि चाचणीत रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यास ते स्वतःला आयसोलेट करून घेतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ब्रिटन सरकारच्या आरोग्य आणीबाणीविषयक सल्लागार गटाच्या म्हणण्यानुसार केवळ 30% लोक चाचण्यांसाठी पुढे येतात किंवा चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर आयसोलेट होतात.
युनिव्हर्सिटी ऑफ रिडिंगचे डॉ. अॅलेक्झँडर एडवर्ड म्हणतात, "लोक घरी थांबत नाहीत. कदाचित ते थांबू शकत नाहीत. कारण घरी राहिले तर नोकरी किंवा रोजगार गमावण्याची भीती त्यांना असते."
"आयसोलेट राहण्यासाठी आपण लोकांना मदत करत नाहीत तोवर ते स्वतःही जोखीम घेतली आणि इतरांनाही विषाणूचा संसर्ग देतील."
शिवाय, जर लोकांनाच स्वतःची चाचणी करण्यासाठी किट उपलब्ध करून दिली तर लोक खरी माहिती देणार नाहीत, अशीही भीती आहे.
व्यापक प्रमाणावर चाचण्या घेतल्यास लॉकडाऊनची गरज पडणार नाही का?
सर जॉन बेल म्हणतात, "याचं उत्तर 'हो' आहे असं मी म्हणेन. मात्र, असं म्हणतानाच मी हेदेखील सांगेन की जोवर लस येत नाही तोवर आपल्याकडे फारसे पर्यायही नाहीत. त्यामुळे मास टेस्टिंगचा उपयोग होतो का, हेसुद्धा आपण पडताळून बघायला हवं."
तर प्रा. डिक म्हणतात, "याचा (व्यापक प्रमाणावर चाचण्या करण्याचा) निश्चितच उपयोग होईल. मात्र, घाई न करता अधिक अभ्यासपूर्ण कृती करण्याची गरज आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)