You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : कोव्हिड दुसऱ्यांदा झाल्यानंतर रुग्णाची परिस्थिती झाली 'अधिक गंभीर'
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
अमेरिकेतल्या एका रुग्णाला कोव्हिड दोनदा झाला. पण पहिल्यावेळपेक्षा दुसऱ्यांदा झालेला संसर्ग हा कितीतरी पटींनी अधिक गंभीर असल्याचं डॉक्टर्सनी म्हटलंय.
25 वर्षांच्या या रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.
कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणं दुर्मिळ आहेत आणि हा तरूण आता यातून बरा झालेला आहे.
पण एखाद्या रुग्णाच्या शरीरात या व्हायरससाठीची रोगप्रतिकार क्षमता कितपत तयार होते, याविषयी 'लॅन्सेट इन्फेक्शस डिसीजेस' मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत.
नेव्हाडामधल्या या तरूण रुग्णाला यापूर्वी कोणतेही आजार वा तक्रारी नव्हत्या. किंवा कोव्हिड होण्याचा त्याला असलेला धोका इतरांपेक्षा जास्त ठरवणारे रोग प्रतिकार क्षमतेचे दोषही त्याच्यात नव्हते.
कधी, काय घडलं?
- 25 मार्च - लक्षणं पहिल्यांदा दिसू लागली. घसा खवखवणं, खोकला, डोकेदुखी, मळमळणं, अतिसार या गोष्टींचा यात समावेश होता.
- 18 एप्रिल - या तरुणाची चाचणी पहिल्यांदा पॉझिटिव्ह आली.
- 27 एप्रिल - सुरुवातीची लक्षणं पूर्णपणे बरी झाली.
- 9 आणि 26 मे - दोन्ही दिवशी त्याची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली.
- 28 मे - लक्षणं पुन्हा दिसायला सुरुवात, यावेळी ताप, डोकेदुखी, चक्कर येणं, खोकला, मळमळणं आणि अतिसाराचा त्रास.
- 5 जून - दुसऱ्यांदा कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह. रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि धाप लागू लागली.
या तरुणाच्या शरीरातला संसर्ग काही काळ आटोक्यात येऊन मग त्याच संसर्गाने पुन्हा डोकं वर काढलं नसून या रुग्णाला कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा - म्हणजे दुसऱ्यांदा झाला असं संशोधकांचं म्हणणं आहे.
दोन्ही संसर्गांदरम्यान लक्षणं आढळत असताना, या रुग्णाच्या शरीरातल्या विषाणूच्या जेनेटिक कोडची तुलना करून पाहण्यात आली. हे जेनेटिक कोड्स अतिशय विभिन्न होते. म्हणजेच हा समान संसर्ग नसून हे दोन वेगवेगळे संसर्ग (Infection) होते.
"पहिल्यांदा झालेल्या संसर्गामुळे पुढच्या संसर्गांपासून संरक्षण मिळेलच असं नाही, असं आम्हाला आढळंय," युनिव्हर्सिटी ऑफ नेव्हाडाचे डॉ. मार्क पांडोरी सांगतात.
"कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा होऊ शकतो याचा खूप मोठा परिणाम कोव्हिड 19साठीची रोग प्रतिकारक्षमता जाणून घेण्यावर होणार आहे."
जे लोक यातून बरे झाले आहेत त्यांनीही सोशल डिस्टंन्सिंग, मास्क वापरणं, हात धुणं यासारख्या गोष्टी करत राहणं महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.
कोरोना व्हायरस आणि त्यासाठीची प्रतिकारक्षमता याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. खरंच या रोगासाठीची रोग प्रतिकारक्षमता निर्माण होते का? सौम्य लक्षणं आढळणाऱ्यांमध्ये कितपत प्रतिकारक्षमता निर्माण होते? ही प्रतिकारक्षमता कितपत संरक्षण देऊ शकते?
या व्हायरसचा आपल्यावर किती दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यावर या प्रश्नांचा मोठा परिणाम होणार आहे. या विषाणूवरची लस आणि हर्ड इम्युनिटीसारख्या संकल्पना यावरही याचा परिणाम होणार आहे.
कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणं सध्या दुर्मिळ आहेत. जगभरात आतापर्यंत अशा मोजक्याच केसेस आढळल्या आहेत.
हाँगकाँग, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये आढळलेल्या अशा केसेसमध्ये दुसऱ्यांदा झालेल्या संसर्गाची तीव्रता पहिल्यापेक्षा जास्त गंभीर नव्हती.
एक्वेडोरमध्ये आढळलेलं एक प्रकरण अमेरिकन रुग्णाप्रमाणेच गंभीर होतं, पण या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं नाही.
पण तरीही याविषयीचा अंदाज बांधायला जागतिक साथीचा हा सुरुवातीचा टप्पा आहे. पण कोरोना व्हायरसच्या इतर विषाणूंकडे पाहिलं तर या विषाणूसाठीचं संरक्षण काही काळाने कमी होत जातं.
पण जगभरातल्या देशांमध्ये जशी या संसर्गाची दुसरी लाट येईल, तशी या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील.
संसर्गाच्या लाटेमुळे अनेकांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली असल्याने कोव्हिडची दुसरी लाट कदाचित सौम्य असेल असा अंदाज बांधण्यात आला होता.
पण नेव्हाडातला हा तरूण रुग्ण दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यानंतर इतका गंभीररित्या आजारी का पडला, हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कदाचित दुसऱ्यांदा तो कोरोना व्हायरसला जास्त प्रमाणात 'एक्स्पोज' झालेला असू शकतो, असा एक अंदाज आहे.
एक शक्यता अशीही आहे की रोग प्रतिकारक्षमतेमुळेही हा दुसरा संसर्ग अधिक गंभीर झाला असावा. डेंग्यूच्या तापाबाबत असं घडल्याची नोंद आहे. एका प्रकारच्या डेंग्यूच्या विषाणूंसाठीची रोग प्रतिकारक्षमता ही दुसऱ्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्यास अडथळा ठरली होती.
दोन संसर्गांच्यादरम्यानचा कमी कालावधी आणि दुसऱ्या संसर्गाची तीव्रता पाहता, हे संशोधन काळजी वाढवणारं असल्याचं प्रा. पॉल हंटर सांगतात.
"आतापर्यंत जगभरातल्या साडेतीन कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे. ते पाहता जर ही गोष्ट कॉमन असती, तर आपल्याला अशा अनेक प्रकरणांविषयी समजलं असतं. या संशोधनांचे परिणाम काय आहेत, हे आताच सांगणं कठीण आहे. पण यावरून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते, ते म्हणजे आपल्याला या संसर्गासाठीच्या रोग प्रतिकारशक्तीविषयी अद्यापही पुरेशी माहिती नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)