You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक निकाल: नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरेंकडून काय शिकावं?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
बिहारची निवडणूक निर्णायक वळणावर येते आहे आणि असणा-या अनेक शक्यतांमध्ये 'एनडीए'चं सरकार पुन्हा येऊन नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता सर्वाधिक वर्तवली जाते आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की नितीश यांनी शिवसेनेचे आभार मानायला पाहिजे कारण जे शिवसेनेनं भाजपासोबत महाराष्ट्रात केलं त्यामुळे बिहारमध्ये नितीश यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल.
कारण 'जदयू'पेक्षा मोठा पक्ष बनलेल्या भाजपातून स्वत:चाच मुख्यमंत्री करण्याचे आवाज उठू लागले आहेत. त्यामुळे नितीश कुमारांना चौथी टर्म मिळाली तरीही त्यांच्यापुढची स्थिती वेगळी असणार आहे.
अशा स्थितीत नितीश यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून काय शिकलं पाहिजे? एका प्रकारे नितीश आणि उद्धव यांच्यात, म्हणजे त्यांच्या 'जदयू' आणि शिवसेना या पक्षांमध्ये 'भाजपा'शी मैत्री एका मुद्द्यावर साम्य आहे.
दोघेही 'एनडीए'मध्ये अनेक वर्षं भाजपाचे साथीदार राहिले आहेत. दोघेही भाजपाच्या जवळ येऊन परत लांब गेले आहेत आणि परिस्थिती बदलताच परत मित्रही झाले आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या राज्यांत जेव्हा भाजपाशी मैत्री केली तेव्हा 'मोठे भाऊ' होते, मात्र या मैत्रीसोबत निवडणुका लढवतांना एका टप्प्यावर 'छोटे भाऊ' झाले, हेही आकडे स्पष्टपणे दाखवतांत.
बिहारमध्ये नितीश कुमारांचं संख्याबळ घटलं आहे, भाजपाचं वाढलं आहे. नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या प्रत्येक नेत्यानं बिहारमध्ये नितीशच आमचे मुख्यमंत्री असतील असं जाहीररीत्या अनेकदा सांगितलं आहे. त्यामुळं वाढलेल्या संख्याबळाचा आधार घेऊन भाजपा लगेच मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणार नाही असं म्हटलं जातं आहे.
पण मुख्यमंत्री झाले तरी नितीश यांचा अधिकार आता गेल्या सरकारसारखा असणार नाही हेही खरं आहे. त्यांच्यावर भाजपाचा 'मोठा भाऊ' म्हणून दबाव असणार हे स्पष्ट आहे. अशा स्थितीत नितीश यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून काय शिकता येईल हा प्रश्न राजकीय कुतुहलाचा ठरतो.
मणिकांत ठाकूर हे बिहारचे वरिष्ठ पत्रकार आहेत आणि अनेक वर्षं इथलं राजकारण जवळून पाहत आहेत. त्यांच्या मते नितीश यांनी हे उद्धव यांच्या उदाहरणावरुन हे घेतलं का ते माहित नाही, पण त्यांनी स्वत: मुख्यमंत्री करण्याचं जाहीर आश्वासन भाजपाकडून घेतलं.
जे आश्वासन महाराष्ट्रात कथितरित्या बंद दाराआड दिलं होतं ते बिहारमध्ये नितीश यांनी जाहीरपणे घेतलं. "यामुळे नितीश यांना भाजपाला मुख्यमंत्री बनवावच लागेल आणि ते बनतील. तसं भाजपाकडे मुख्यमंत्रीपदासाठी दुसरा चेहराही नाही आहे," मणिकांत ठाकूर म्हणतात.
"पण या सरकारमध्ये त्यांच्याकडे इतक्या जागा कमी आहेत की ते भाजपाला अक्षरश: शरण जातील. त्यांच्या नेत्यांनी आज निकालाच्या दिवसापासूनच महाराष्ट्रासारखं इथं काहीही होणार नाही असं सांगायला सुरुवात केली आहे. आता नाही, पण उद्धव यांच्यासारखे अन्य मित्रांचे विकल्प मात्र नितीश खुले ठेवतील. तेवढं राजकीय चातुर्य त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी यापूर्वीही अनेकदा मैत्री तोडली आहे. भाजपाकडून 'राजद'कडे गेले आहेत आणि तिकडून परत भाजपाकडे आले आहेत," ठाकूर सांगतात.
भाजपासोबत मैत्री केली की स्थानिक पक्षांची ताकद कमी होऊ लागते हा शिवसेनेची राजकीय दिशा बदलणारा विचार 'जदयू' पण करेल असं कॉंग्रेसला वाटतं.
उद्धव ठाकरेंकडून हे नितीश कुमारांनी शिकावं असं महाराष्ट्रात फायदा झालेल्या कॉंग्रेसला वाटणं सहाजिकच आहे.
"अनेक राज्यांत स्वतःची काही ताकद नसताना स्थानिक पक्षाची साथ घेऊन भाजप वाढली. जर शिवसेना नसती तर भाजप महाराष्ट्रात इतका मोठा झालाच नसता. पण शेवटी स्थानिक पक्षांचीच मुळं खोदण्याचं काम भाजपनं केलंय. हे महाराष्ट्रानेही पाहिलंय. आता तीच परिस्थिती ते नितीश कुमारांची करू इच्छितात. आणि हे जाणण्याची ताकद नीतीश कुमारांसारख्या ज्येष्ठ राजकारण्याकडे नक्कीच आहे," असं 'बीबीसी मराठी'च्या चर्चेत कॉंग्रेस नेते भाई जगताप म्हणाले.
पण भाजपाच्या मते त्यांनी स्थानिक मित्रपक्षांना कायम मदत केली आहे, पण आसक्ती वाढल्यावर त्यांची स्थिती काय होते हे शिवसेनेकडून नितीश कुमार शिकू शकतील.
"जर लहान भाऊ मोठा भाऊ झाला तर ते भाजपच्या मेहनतीचं फळ आहे. सुरुवातीला भाजपचे 2 खासदार होते आता आम्ही पूर्ण बहुमतानं आलोय. हे मेहनत केल्यामुळेच आहे. स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे," असं भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेल्या विजया रहाटकर म्हणाल्या.
"मित्रपक्षाची आसक्ती जर वाढली असेल तर त्याला भाजप काही करू शकत नाही पण भाजपनं कधीच कोणत्याही मित्रपक्षाला कापलं नाही इलट आमच्यामुळे कायमच आमच्या मित्रपक्षांना फायदा झालाय," रहाटकर सांगतात.
बहुमताच्या आकड्यांच्या स्थितीत मुख्यमंत्रीपद वाट्याला येत असल्यानं नितीश यांना वेगळी चूल मांडावी लागणार नाही हे स्पष्ट दिसतं आहे. पण त्यांच्यापेक्षा अनेक जागा जास्त असलेला भाजपाचा सरकारमधल्या हिस्सा वाढलेला असेल आणि आत्मविश्वासही. तो मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश यांच्यासाठी नवीन असेल. अशा मोठ्या संख्येच्या भाजपासोबत राज्याच्या सरकारमध्ये सहभागी असण्याचा अनुभव उद्धव ठाकरेंकडे नितीश यांच्या अगोदर आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)