नितीश कुमार: 15 वर्षं मुख्यमंत्री राहिल्यानंतर पुढच्या डावाला तयार?

    • Author, किर्ती दुबे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नितीश कुमार यांनी पुर्णियामधल्या एका प्रचारसभेत म्हटलं होतं, "आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. परवा निवडणूक आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक असेल. शेवट गोड तर सगळं गोड..."

5 नोव्हेंबरला त्यांनी व्यासपीठावरून ही गोष्ट सांगितली तेव्हा काही लोकांना वाटलं की त्यांना आता आपल्या राजकीय जीवनाचा अस्त होताना दिसतोय. तर काही लोकांचं म्हणणं होतं ती नितीश यांनी भावनिक कार्ड खेळलं आहे म्हणजे लोक त्यांची ही निवडणूक शेवटची समजून त्यांना मत देतील.

दुसरीकडे जनता दल युनायटेड पक्षाने मात्र स्पष्ट केलंय की ही निवडणूक नितीश कुमारांची शेवटची निवडणूक नसेल. राजकारणातले कसलेले खेळाडू असणारे नितीश कुमार आपण कधी, काय आणि किती बोलायचं आहे हे चांगलंच जाणतात हे यावरून स्पष्ट होतं.

नितीश कुमारांच्या राजकारणाचा जवळून अभ्यास करणारे पाटण्यातल्या के एन सिन्हा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधले प्राध्यापक डीएम दिवाकर म्हणतात की, "नितीश कुमारांची समज तकलादू नाहीये. ते जे बोलतात ते फार विचारपूर्वक, मोजून-मापून बोलतात. पण या निवडणुकीत त्यांनी अशा अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत ज्या नितीश कुमारांनी बोलल्या आहेत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे."

त्यांनी केलेल्या 'शेवटची निवडणूक' या वक्तव्यावर बोलताना दिवाकर म्हणतात, "हे पहा, पक्षाचा जो अंतर्गत सर्व्हे होतो त्यात त्यांच्या लक्षात आलं असेल की विरोधात वातावरण तापलंय. अँटी इंकम्बेन्सीची पण लाट आहे. त्यामुळे हे विधान करून त्यांनी एक मार्ग काढला की उद्या समजा त्यांना काही पाऊल उचलावं लागलं तर लोकांना त्याची आधीच कल्पना होती असं म्हणता येईल."

पण आतापर्यंत हाती आलेले कल सांगतात की जनता दल युनायडेटची कामगिरी इतकीही वाईट झालेली नाही जितकी मतगणना सुरू व्हायच्या आधी असेल असं वाटत होतं.

भाजपने आधीच स्पष्ट केलंय की नितीश कुमारांच्या पक्षाला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री तेच बनतील.

टिकून राहण्याची कला

2010 मध्ये नितीश कुमारांच्या पक्षाची घोषणा होती - "गप्पा ठोकणाऱ्याला 15 वर्षं आणि काम करणाऱ्याला 5 वर्षं?"

पण या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांची 15 वर्षं आणि लालू यादवांची 15 वर्षं जनतेच्या समोर होती. समर्थक आणि विरोधकांच्या सुशासन आणि जंगलराज यांची टक्कर होती.

बिहारचे वरिष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर म्हणतात की, "नितीश कुमारांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात (2005-2010) खूप काम केलं. त्यांच्या कार्यकाळात मुलींसाठी युनिफॉर्म योजना आली, मुली शाळेत जायला लागल्या. त्यांचा दृष्टीकोन लोकहिताचा होता. त्यांच्या राज्यात खंडणीखोरांची सद्दी जवळपास संपुष्टात आली होती जी लालू यादवांच्या काळात प्रचंड फोफावली होती. पण गेल्या साडेसात वर्षांत नितीश कुमारांच्या कार्यकाळात खूप भ्रष्टाचार पसरला आहे. प्रत्येक योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे."

आपला पहिला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर नितीश कुमारांवर 'सत्तेत राहाण्याचं राजकारण करण्याचा' आरोप झाला. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकांमध्येे त्यांनी भाजपसोबत युती तोडून स्वतंत्र निवडणूक लढवली पण त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर अपयश आलं.

डीएम दिवाकर म्हणतात, "जीतनराम मांझींना नितीशकुमारांनी मुख्यमंत्री बनवलं कारण त्यांना 2014 साली सवर्णांची मतं मिळाली नाहीत. त्यांनी दलित समुदायाला संदेश देण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या समुदायातल्या व्यक्तीला ते राज्याच्या सर्वोच्च स्थानावर बसवत आहेत."

पण 2014 साली मुख्यमंत्रीपद सोडणाऱ्या नितीश कुमारांनी 2015 साली जीवनराम मांझी यांनी पक्षातून काढून टाकलं आणि स्वतः 130 आमदार घेऊन राजभवनात पोहचले आणि सत्तास्थापनेचा दावा केला.

यानंतर लगेचच लालूंच्या 15 वर्षांच्या सत्तेविरूद्ध लढून सत्तेत आलेल्या नितीश कुमारांना कळून चुकलं की युती केल्याशिवाय बिहारमध्ये सत्तास्थापन करणं शक्य नाही. त्यामुळे दोन राजकीय विरोधक एकत्र आले आणि लालू यादव - नितीश कुमारांची युती झाली. या युतीच्या 'सामाजिक न्यायासह विकास' या घोषणेने भाजपच्या 'विकासाच्या' घोषणेला धोबीपछाड दिली.

पण 27 जुलै 2017 ला राजधानी पाटण्यात राजकीय वातावरण तापलं. नितीश कुमारांनी राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांना आपला राजीनामा सादर केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर लगेचच त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याच पक्षाबरोबर ज्यांच्याविषयी नितीश कुमारांनी भरलेल्या सभागृहात म्हटलं होतं की, "मातीत मिळालो तरी चालेल पण भाजपसोबत जाणार नाही."

नितीश कुमारांसोबत उपमुख्यमंत्री असणाऱ्या तेजस्वी यादवांनी त्याच्या राजकीय चालीमुळे त्यांना 'पलटूराम' म्हणायला सुरूवात केली. नितीश कुमारांना काका म्हणणारे तेजस्वी आता त्यांच्याच विरोधात उभे ठाकले आहेत.

इंजिनियर बाबू' ते 'सुशासन बाबू' पर्यंत

पाटणा शहराला लागून असणाऱ्या बख्तियारपूरमध्ये 1 मार्च 1951 साली नितीश कुमारांचा जन्म झाला. त्यांनी बिहार इंजिनियरिंग कॉलेजमधून पदवी घेतली. या काळात ते 'इंजिनियर बाबू' म्हणून ओळखले जात. जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातले ते असे नेता आहेत जे 15 वर्षं बिहारच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले.

इंजिनियरिंग कॉलेजमध्ये त्यांचे मित्र आणि वर्गबंधू असणाऱ्या अरूण सिन्हा यांनी 'नितीश कुमार : द राईज ऑफ बिहार' या पुस्तकात लिहिलं आहे की नितीश कुमारांना 150 रूपये स्कॉलरशिप मिळायची ज्याच्यातून ते पुस्तकं आणि मासिकं खरेदी करायचे. त्याकाळात या गोष्टी इतर बिहारी विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत होत्या. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असणाऱ्या नितीश कुमारांचा कल नेहमीच राजकारणाकडे होता."

लालू प्रसाद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या सावलीत राजकीय जीवनाची सुरूवात करणाऱ्या नितीश कुमारांनी राजकारणात 46 वर्षांची प्रदीर्घ मार्गक्रमणा केली आहे. जेव्हा 1995 साली समता पार्टीला फक्त 7 जागा मिळाल्या होत्या, तेव्हा नितीश कुमारांच्या हे ध्यानात आलं ती राज्यात तीन पक्ष वेगवेगळी लढाई लढू शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी 1996 मध्ये भाजपसोबत युती केली.

तेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजेपायी यांच्या हातात नेतृत्व होतं. या युतीचा फायदा नितीश कुमारांना झाला आणि 2000 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. अर्थात हे पद त्यांना फक्त 7 दिवसांसाठीच मिळालं होतं पण ते स्वतःला लालू प्रसाद यादवांच्या विरोधातला सक्षम पर्याय म्हणून उभं करण्यात यशस्वी ठरले होते.

महादलितांचं राजकारण

2007 मध्ये नितीश कुमारांनी दलितांमधल्या सगळ्यात मागास जातींसाठी एक 'महादलित' कॅटेगरी बनवली. यांच्यासाठी सरकारी योजना आणण्यात आल्या. 2010 मध्ये घर, शिक्षणासाठी कर्ज आणि शाळेचे युनिफॉर्मसारख्या योजना आणल्या गेल्या.

आज सगळ्याच दलित जातींना महादलित कॅटेगरीत टाकलं गेलं आहे. 2018 साली पासवानांही महादलितांचा दर्जा दिला गेला.

तसं पाहिलं तर बिहारमध्ये दलितांचे सगळ्यांत मोठे नेते म्हणून रामविलास पासवानांकडे पाहिलं जायचं. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की राज्यात दलितांसाठी ठोस काम नितीश कुमारांनी केलं आहे.

नितीश स्वतः 4 टक्के लोकसंख्या असणाऱ्या कुर्मी जातीतून येतात. पण सत्तेत राहून त्यांनी कायम त्या पक्षासोबत युती केली ज्या पक्षाकडे एकगठ्ठा जातीची मतं आहेत.

आता नितीश कुमारांनी आपल्या शेवटच्या निवडणुकीचा मुद्दा उचलला आहे तर या वादाला तोंड फुटलं आहे की नितीश कुमार नसताना जनता दल युनायटेडचं भविष्य काय असेल? त्यांच्यानंतर पक्षाला पुढे नेणारं एकही नाव समोर येत नाही.

मणिकांत ठाकूर म्हणतात, "नितीश कुमारांशिवाय त्यांचा पक्ष काहीच नाही. आज पक्षाची जी अवस्था आहे त्याला तेच कारणीभूत आहेत. नितीश कुमारांनी कधीच कोणाला पुढे येऊ दिलं नाही. इतकंच काय, त्यांच्या पक्षात असा एकही मंत्री नाही जो आपल्या मंत्रालयाचे मोठे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकेल."

नम्र आणि मवाळ प्रतिमेचे नितीश कुमार राजकारणाच्या बाबतीत तितकेच क्रूर आहेत जितका आणखी कोणी राजकीय नेता असेल. मणिकांत ठाकूर म्हणतात, "त्यांनी शरद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत काय केलं ते सगळ्यांना माहिती आहे. जॉर्ज यांचे शेवटचे दिवस कसे गेले ही गोष्ट लपून राहिलेली नाही."

नितीश कुमारांच्या पक्षाकडे कोणताही संस्थात्मक आराखडा नाही. बिहारच्या लांबलांबच्या खेड्यात बूथ लेव्हलचे कार्यकर्ताही नाहीत. पण हे नितीश यांचं कौशल्य आहे की ते राज्यातल्या एकगठ्ठा मतदार आणि भरपूर कार्यकर्ते असणाऱ्या पक्षांना बाजूला करून 15 वर्षं सत्तेत टिकून राहिले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)