एकनाथ खडसे : '...म्हणून ब्राह्मणाला मुख्यमंत्रिपद दान दिलं' - #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. ...म्हणून ब्राह्मणाला मुख्यमंत्रिपद दान दिलं - एकनाथ खडसे

भारतीय जनता पक्षातून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

फडणवीस यांच्याबद्दल नाराजी दर्शवताना खडसे यांनी चक्क त्यांच्या जातीचा उल्लेख केला. मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रिपद दान केलं, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात खडसे बोलत होते.

"नाथाभाऊ इतका दिलदार आहे की, आम्हाला सांगितलं गेलं नाथाभाऊ तू आता घरी बस मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशिर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं घे रे, तू भी क्या याद करेगा. मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे," अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

"भाजपानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं," अशी टीकाही खडसे यांनी केली. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

2. मागच्या सुनावणीत इतका घोळ, आता आमचा विश्वास नाही - संभाजीराजे

राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रकरणी मागील सुनावणीत इतका घोळ घातला होता. त्यामुळे त्यांच्यावर आता आमचा विश्वास नाही, अशी भूमिका राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.

नांदेडमध्ये आयोजित मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

मराठा आरक्षणाच्या संबंधित राज्यातील विद्वानांची समिती गठीत करून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्याआधी आम्हाला त्या संदर्भातील माहिती सांगा, असं संभाजीराजे म्हणाले.

तसंच MPSC परीक्षा पास झालेल्या 420 विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्त्या का देण्यात आल्या नाहीत? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. अन्वय नाईक प्रकरण आधीच्या सरकारने दाबलं, जयंत पाटील यांचा आरोप

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. राज्य सरकारचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाही. आधीच्या सरकारनेच हे प्रकरण दाबलं होतं, असा आरोप जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

कोकण दौऱ्यावर सिंधुदूर्गमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

अर्णब यांना पत्रकारितेप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. त्यांनी वैयक्तिक आयुष्यात एका कुटुंबाचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्या कुटुंबातील दोघांनी आत्महत्या केल्या. सुसाईड नोटमध्येही अर्णब यांच्यासह इतर दोघांचं नाव आहे. या प्रकरणीच अर्णब यांना अटक झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

4. बिहारमध्ये आम्ही 20 ते 22 जागा जिंकू, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार आहे. या निवडणुकीत आमच्या प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्सला 20 ते 22 जागा मिळतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

बिहार निवडणुकीमध्ये कुणालाही बहुमत मिळेल, अशी परिस्थिती नाही. निवडणुकीअगोदर एकीबरोबर लग्न कारायचं आणि निवडणुकीनंतर मैत्रिणीबरोबर पळून जायचं असं बिहारमध्ये होईल," असं भाकितही आंबेडकर यांनी केलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.

5. 'ममतादीदींच्या माणसांनो, सुधरा नाहीतर हात तुटतील, डोकी फुटतील'

"पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या ममता दीदींच्या माणसांनी स्वतःला 6 महिन्यांत सुधारावं, अन्यथा हात, डोकं आणि बरगड्या तुटतील, घरी जाण्यापूर्वी तुम्हाला रुग्णालयात जावं लागेल," असं वक्तव्य बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केलं आहे.

गेल्या महिन्यात वर्धमान जिल्ह्यात दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर दिलीप घोष यांनी हे वक्तव्य केलं.

त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर याप्रकरणी आरोप केले, पण तृणमूल काँग्रेसने त्यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)