You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर : 'श्रीमंत मराठे मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून प्रयत्नशील'
मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील असून अशा लोकांचा आम्ही निषेध करतो, असं वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर हे सध्या बिहारमध्ये आहेत. मागासवर्गीयांच्या मुद्द्याबाबत बोलातना प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं.
"महाराष्ट्रातील मागासवर्गीय अधिकाऱ्यांची आरक्षणांतर्गत किती पदं भरण्यात आली असून किती पदं राहिली आहेत. शिवाय किती मागासवर्गीय अधिकाऱ्यांना आरक्षणाच्या आधारे प्रमोशन देण्यात आले आहे, याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे. मात्र ही माहिती उपलब्ध असूनही महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात द्यायला तयार नाही," असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने एका समितीचं गठन केलं असून ही समिती मागासवर्गीयांच्या आरक्षण संदर्भात माहिती घेणार आहे, असं सांगत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, "असं असले तरी हा सर्व प्रकार फसवा असून मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील आहेत."
यावेळी महाराष्ट्रातील प्रमोशनच्या यादीमध्ये असणाऱ्या सर्व मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रकाश आंबेडकर यांनी विनंती केली आहे की, आपण आपल्या कुटुंबासह सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन उभं करा.
राज्य सरकार किंवा महाराष्ट्रातील मराठा संघटनांची यावर अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. ती आल्यनंतर अपडेट केली जाईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)