You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर: 'कोरोनामुळे मृत्यू होत आहेत याला पुरावा काय आहे?'
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का, की कोरोनामुळे मृत्यू झाला आहे? माझा यावर आजिबात विश्वास नाही. कारण मी माणसं जगताना बघतोय. " वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपला कोरोना आरोग्य संकटावर, जागतिक आरोग्य संघटनेवर आणि सरकारवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.
विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीकडून मंदिरं सुरू करण्यासाठी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आज (31 ऑगस्ट ) आंदोलन करण्यात आले.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी 15 जणांना त्यांच्यासोबत जाण्याची परवानगी देण्यात आली.
राज्य सरकारने आठ दिवसांत मंदिरं सुरू करू असे आश्वासन दिल्याचे सांगत प्रकाश आंबेडकरांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले. पण आश्वासन पूर्ण केले नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.
या निमित्त वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत बीबीसी मराठीने घेतली. पाहूयात ते काय म्हणाले आहेत.
प्रश्न - धार्मिक स्थळं खुली करण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? गर्दी होऊ नये असे प्रयत्न केले जात असताना अशी मागणी का केली जात आहे ?
प्रकाश आंबेडकर -सरकारला कोरोनाविषयी काहीही कल्पना नाही असे मला वाटते. दुकानं सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावे लागत आहे. आज मंदिरं उघडा यासाठी आंदोलन केले. हे शासन कोरोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे. कोरोना आहे यावर माझा विश्वास नाही.
प्रश्न - महाराष्ट्रात दररोज दोनशे ते अडीशे लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होत असताना तुम्हाला असे का वाटते की सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे?
प्रकाश आंबेडकर -जो माणूस जन्माला आला त्याचा मृत्यू एकेदिवशी होणारच. जर दहा कोटी लोकांमध्ये 200-250 लोकांचा मृत्यू झाला तर त्यात नवीन काय आहे? भारतीय स्वत:शी तर लढत असतात पण निसर्गाशी लढण्याचा आव आणत असतो. यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला तर मी मान्य करेल. कोरोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत.
प्रश्न - कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे तुम्हाला का मान्य नाही?
प्रकाश आंबेडकर -कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का की कोरोनामुळे मृत्यू झाला आहे? माझा यावर आजिबात विश्वास नाही. कारण मी माणसं जगताना बघतोय.
लॉकडॉऊन पूर्णपणे खुलं करावं ही आमची मागणी आहे. आम्ही सरकारला राज्य चालवण्यासाठी पाच वर्षे दिली आहेत. आमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याचा सरकारला अधिकार नाही. मला कुठे जाता येईल, कुठे नाही याचा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. त्यामुळे लॉकडॉऊन हे घटनाबाह्य आहे.
प्रश्न - जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संसर्ग हा साथीचा रोग असून पॅनडेमिक (आरोग्य संकट) असल्याचे जाहीर केले आहे. यावर तुमचा विश्वास नाही का?
प्रकाश आंबेडकर - जागतिक आरोग्य संघटनेवर अमेरिकेने आरोप केला आहे की ते खोटं बोलत आहेत. काही शास्त्रज्ञांचा सुद्धा हाच दावा आहे. तेव्हा माझाही कोरोनावर विश्वास नाही. आपल्यातून काही लोक जाणारच आहेत. मृत्यू हे वास्तव आहे ते आपण स्वीकारायला हवे असे मला वाटते.
प्रश्न - मग मार्च महिन्यापासून लॉकडॉऊन लागू झाले आहे. तुम्ही हे वक्तव्य आत्ता का करत आहात ? आंदोलन एवढ्या महिन्यांनी आज का केले ?
प्रकाश आंबेडकर - मी पाच महिन्यांपासून सतत हे बोलत आहे. माझ्या पत्रकार परिषदेत हे मुद्दे मी मांडले आहेत. यापूर्वी दुकानं, व्यापार, एसटी सेवा हे सुरू करा यासाठी आंदोलन करत होतो. तेव्हा मंदिरांसाठी आंदोलन आता केले.
प्रश्न - वंचित बहुजन आघाडीने प्रामुख्याने दलित, मुस्लिम वर्ग आणि वंचित घटकांसाठी आवाज उठवण्याचे काम केले असताना आता धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी करूनतुम्ही वेगळा राजकीय संकेत देत आहात का?
प्रकाश आंबेडकर -हा वेगळा संकेत नाही. आम्ही महात्मा गांधी, आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचाराने काम करतो. धर्म ही संकल्पना कुणीही नाकारली नाही. प्रत्येकजण आपली विचारसरणी निवडू शकतो.
प्रश्न - मग तुम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करत आहात का?
प्रकाश आंबेडकर - भाजप ही हिंदुत्ववादी संघटना नाही. ती मनुवाद्यांची संघटना आहे. हिंदुंचा वापर करून घेणारा पक्ष आहे. मनुवाद्यांना विषमता हवी आहे आणि विषमता मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ही वैचारिक लढाई सुरू राहिल.
शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असताना आणखी एक कशाला घेईल? आगीतून फुफाट्यात कशाला जाईल? ते आता स्थिर आहेत.
प्रश्न - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपब्लिकन चळवळ संपत आहे असे विधान केले. शिवाय, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत ऐक्य करण्यासाठीते तयार आहे असंही ते म्हणाले. तुमची तयारी आहे का ?
प्रकाश आंबेडकर -काही महान नेते असतात, इतके महान असतात की त्यांची तुलना करता येणार नाही. इतक्या माहन नेत्यांच्या वक्तव्यावर मी काय बोलणार? वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आम्ही चालवत आहोत. रिपब्लिकन चळवळीशी माझा आता संबंध नाही. त्यामुळे महान नेत्यांच्या वक्तव्यावर मी कधीही कॉमेंट करत नाही.
प्रश्न - तुम्ही काही दिवसांपूर्वी भगवी पगडी घातलेला फोटो व्हायरल झाला होता. लोकांमध्ये ही उत्सुकता आणि चर्चा आहे की तुम्ही वेगळे राजकीय समीकरण करू पाहताय का ?
प्रकाश आंबेडकर - तुम्ही पेशवाईच्या पगडीविषयी बोलत आहात. आता कुठली तरी संस्था पेशवाईशी संबंधित असते आणि ते कार्यक्रमात मान-सन्मान म्हणून पगडी देतात. आता पेशवाई संपली, पेशवाईची विचारसरणी संपली त्यामुळे इतिहासात आता घोळ घालत बसणं मला पटत नाही. इतिहासात मी अडकत नाही. पेशवाईच्या बाहेर पडून लोक लोकशाहीच्या मार्गाने जात आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)