You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे- पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली तर आपल्याला भारी पडेल
कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, म्हणून तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळेच इतर सणांप्रमाणे दिवाळीतही खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (8 नोव्हेंबर) दुपारी दीड वाजता फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
'गणपती, नवरात्री, दहिहंडी, ईद हे सगळे सण आपण संयमानं घरातल्या घरात पार पाडले. आता दिवाळी आली आहे. जवळपास सगळं उघडलं आहे. गर्दी वाढत चाललीय. त्यामुळे खबरदारी घ्यावी,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
- दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढत आहे, पाश्चिमात्य देशांत पेशंट वाढत आहेत. दिल्लीत प्रदूषण वाढलंय. त्यामुळे कोरोनाचा विषाणू घातक परिणाम करतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे दिवाळीत हे प्रदूषण टाळण्यासाठी फटाके फोडण्याआधी विचार करा.
- बंदी घालण्यापेक्षा सामंजस्यानं फटाके वाजवायचे नाहीत, हे ठरवा. सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवायचे नाहीत.
- रोषणाई जरूर करा, दिवे पेटवा, पण फटाके वाजवू नका. आपल्या परिसरात कुणाला त्रास होणार नसेल तर वाजवू शकता.
- दिवाळीनंतरचे 15 दिवस फार कसोटीचे आहेत. कारण पाश्चिमात्य देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. इंग्लंडमध्ये तर पुढचे 4 ते 6 आठवडे कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. थंडीला सुरुवात होत आहे आणि कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, त्यामुळे आता ही दुसरी लाट नाही तर त्सुनामी आहे.
- उद्या कोरोनाची दुपटी-तिपटीची लाट आली, तर आपली त्रेधातिरपीट उडू शकते. त्यामुळे आता ज्या वैद्यकीय सुविधा सुरीू आहेत त्या तशाच ठेवणार आहोत.
- एक कोरोना रुग्ण मास्क न घातल्यास गर्दीत फिरल्यास तो 400 जणांना संक्रमित करतो. त्यामुळे तुम्हाला मास्क घालावाच लागेल. मास्क न घातल्यास दंड आकारला जाईल.
- दिवाळीनंतर मंदिर उघडण्याविषयी एक नियमावली करू. गर्दी टाळा, हीच नियमावली असेल.
- संकटाच्या काळात महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी महाराष्ट्र बदनामीचं जे काम केलं, कायदा व्यवस्था कोलमडली, असे आरोप केले. पण ते मोडून आपण जूनमध्ये 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले. यातलं प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होईल. गेल्या आठवड्यात 35 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत.
- मुंबई मेट्रो शेडच्या जागेवरून सरकारवर टीका केली जात आहे. ती जमीन मीठागराची आहे असं म्हणतात. पण, मुंबईच्या प्रकल्पात तुम्ही मीठाचा खडा टाकता. आम्ही काही डोळं बंद करून काम करत नाही आहोत.
- लोकल सुरू करण्यासंदर्भात केंद्राकडे बोलणं सुरू आहेत. पीयूष गोयल चांगलं सहकार्य करत आहेत.
- सरकारनं पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत.
- कापसाची खरेदी सुरू केली आहे. सोयाबीन, मूग, उडीद पिकांची खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.
- आरक्षणाचे वारे वाहत आहेत. धनगर, ओबीसी या सगळ्यांच्या मागण्या आहेत. आपण कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाहीत. तुम्हाला न्याय द्यायचा नाही, तर मग कुणासाठी काम करायचं? कायदेशीर बाबींचा सामना करत आपण पुढे जात आहोत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)