फटाक्यांमुळे कोरोनाचा प्रसार कसा वाढू शकतो?

फटाके

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. पण यंदाची दिवाळी नेहमीसारखी असणार नाही. यावर्षीच्या दिवाळीवर कोरोना व्हायरसचं सावट आहे.

त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी साजरी करण्यावर अनेक मर्यादा असतील. या दिवाळीमध्ये फटाके उडवण्याच्या इच्छेला यंदाच्या वर्षी मुरड घालावी लागेल असं दिसत आहे.

देशात अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनेही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे.

दरवर्षी, दिवाळीपूर्वी फटाके आणि त्यांच्यामुळे होणारं प्रदूषण या मुद्द्यावर चर्चा होत असते. यंदा या चर्चेला कोरोनाची जोड मिळाली. सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणावरून वादविवादही होताना दिसत आहेत.

दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यांची फटाक्यांवर बंदी

कोव्हिड-19 हा श्वसनाशी संबंधित आजार आहे. त्याचप्रमाणे फटाक्यांच्या प्रदूषणाने सुद्धा अनेक श्वसनविकार जडतात. अशा स्थितीत या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यास त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Spl

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशानेच दिल्ली, हरयाणासह राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग रोखणं आणि नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं राज्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तसंच संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच केलं होतं.

त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारचाही फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

पण कोरोना काळात फटाके उडवल्यास काय अडचणी निर्माण होतील? कोरोना आणि फटाक्यांचा संबंध नेमका काय, याबाबत बीबीसीने तज्ज्ञांकडून माहिती घेतली.

प्रदूषक बनतील कोरोना वाहक

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचं जमशेदपूरमध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आलं होतं.

कोरोना

फटाक्यांमुले हवेत मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो. हिवाळ्यात धुक्यांमुळे हा धूर वर निघून न जाता. इथेच अडकून राहतो. हा धूर हवेत मिसळल्याने तयार होणारे धुरके अतिशय धोकादायक मानले जाता. यामध्ये विषारी प्रदूषक असतात. यामध्ये एअरोसोलही असतात.

हिवाळ्याच्या दिवसांत हे एअरोसोल आणि PM2.5 कोरोना व्हायरसचे वाहक म्हणून कार्य करू शकतात, अशी माहिती हैदराबादच्या KIMS हॉस्पिटलमधील फुफ्फुस रोग तज्ज्ञ डॉ. रामण्णा प्रसाद यांनी डेक्कन क्रोनिकलशी बोलताना दिली.

ते सांगतात, "कोरोना व्हायरस हा हवेतून पसरणारा व्हायरस आहे. छोट्या छोट्या पाण्याच्या थेंबाच्या माध्यमातून तो इतरत्र पसरतो. फटाक्यांच्या धूरामुळे हवेत त्यांना वाहक मिळतो. ते बराच काळ हवेत तरंगत राहू शकतात."

कोव्हिड होऊन गेलेल्या रुग्णांना जास्त धोका

कोरोना व्हायरस हा मानवाच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला चढवतो. कोव्हिड झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांची श्वसनयंत्रणा कमकुवत बनल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

कोरोनाची लागण होऊन गेलेल्या डॉ. अब्दुल मोहिद खान यांची मुलाखत बीबीसी मराठीने घेतली होती.

कोव्हिड होऊन गेल्यानंतर आपल्याला खालील अडचणी येत असल्याचं डॉ. खान यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

  • - चालताना धाप लागणे
  • - जास्त वेळ उभं राहता न येणे
  • - श्वास घेण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणे

आपलं आरोग्य पूर्वीप्रमाणे बनवण्यासाठी डॉ. खान यांना पुन्हा उपचार घ्यावे लागत आहेत.

म्हणजेच कोव्हिड होऊन गेलेल्या व्यक्तींना जास्त धोका निर्माण होऊ शकतो.

याबाबत मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांच्याकडून आम्ही अधिक माहिती घेतली.

ते सांगतात, "कोरोना काळात श्वसनयंत्रणा आणि रोगप्रतिकारशक्ती निरोगी राखण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. फटाक्यांचा यांच्यावर परिणाम होऊ शकतो. पण सर्वाधिक धोका 'पोस्ट कोव्हिड' रुग्णांना होऊ शकतो. या रुग्णांना धूर आणि प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो."

दीर्घकाळ ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरवर राहून कोव्हिड-19 मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये फुप्फुसांचे आजार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा रुग्णांसाठी मुंबईतील केईएम, फोर्टिस, सेंट जॉर्ज आणि इतर रुग्णालयात पोस्ट-कोव्हिड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. तिथं कोव्हिड होऊन गेलेले अनेक रुग्ण पुन्हा फुफ्फुसांबाबत तक्रारी घेऊन येतच आहेत. यामुळेच फटाक्यांच्या धुराची समस्या आणखी गंभीर बनते.

दमा, अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता

फटाक्यांमधून नायट्रोजन डायऑक्साईड, पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन, वोलाटाईल कंपाऊंड यांसारखे विषारी घटक हवेत सोडले जातात. यामुळे दमा, अस्थमा, COPD किंवा अॅलर्जीच्या तक्रारी वाढू लागतात. दिवाळीच्या काळात या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त असल्याची माहिती भिवंडी येथील जनरल फिजिशियन डॉ. कमल जैन यांनी दिली.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. जैन यांच्या मते, "फक्त वृद्धत्वाकडे झुकलेल्या श्वसनाचे विकार असणाऱ्या लोकांनाच या फटाक्यांचा त्रास होतो, असं नाही. या स्थितीचा निरोगी व्यक्तीलाही त्रास होऊ शकतो. धुरामुळे दमा, अस्थमा, COPD असे आजार झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची जास्त शक्यता आहे."

कोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर मानवी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. कोरोनाची लागण होऊन गेलेल्या रुग्णांना श्वसनाचे व्यायाम करण्यास सांगितलं जातं. त्यांना जास्तीत जास्त शुद्ध आणि मोकळी हवा घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून नेहमी दिला जातो. पण फटाक्यांमुळे यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

डॉ. जैन सांगतात, "फटाक्यांच्या धुराने हवेचं संतुलन बिघडतं. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन अनेक विषारी वायूंचं प्रमाण हवेत वाढू लागतं. ही स्थिती केवळ कोरोना रुग्णच नव्हे तर सर्वसामान्य निरोगी व्यक्तींसाठीही प्रतिकूल आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)