अर्णब गोस्वामी : संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात जुंपली, सामनातील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी ( 4 नोव्हेंबर) पोलिसांनी अटक केली. या अटकेवरून राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

भाजपच्या आरोपांना शिवसेनेने आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात 'एका नौटंक्यासाठी रडणे, ऊर बडवणे बंद करा!", म्हणत उत्तर दिलं आहे.

त्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करून अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागल्याचा पलटवार केला आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक होताच बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यंमत्री आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी याची तुलना आणीबाणीशी केली होती.

1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यम स्वातंत्र्यावरही गदा आणली होती. तसाच हा प्रकार असल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं.

त्यावर आज (गुरुवार, 5 नोव्हेंबर) सामनामध्ये अग्रलेख लिहून शिवसेनेनं उत्तर दिलं आहे. या अग्रलेखात म्हटलं आहे, "सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्नीपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होतं. सीतेची अग्नीपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरमाची हुकूमशाही वाटली काय?"

"एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केलं. यात चौथा स्तंभ कोसळला सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखढू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, ऊर बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील."

गोस्वामी यांना एका आत्महत्या प्रकरणात अटक झाली आहे, सरकारविरोधात बोलल्यामुळे नाही, असं म्हणत याचा राजकारणाशी किंवा पत्रकारितेशी संबंध नाही, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

सामनात म्हटलं आहे, "आपल्या पतीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी, असा अर्ज (अन्वय) नाईक यांच्या पत्नीने पोलीस आणि न्यायालयासमोर केल्यावर कायद्याने जे व्हायचे तेच झालं. पोलिसांनी गोस्वामी यांना ताब्यात घेतलं. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल. यात 'आणीबाणी' आली, काळा दिवस उजाडला, पत्रकारितेवर हल्ला झाला, असे काय आहे?"

अर्णब गोस्वामी आणि त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते आणि त्यांना कुणाची फूस आहे, हे जगजाहीर असल्याचं म्हणत अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे, असंही त्यात म्हटलं आहे.

सामनाने लिहिलं आहे, "गुजरातमध्येही सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले. तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? महाराष्ट्रातल्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत."

"पण, भाजपवाल्यांना सवतीचं पोर मांडीवर खेळवण्यात अलिकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे", असं लिहित त्यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांवर ताशेरे ओढले आहेत.

तर "आणीबाणीचा काळ ज्यांनी अनुभवला आहे त्यातले एक लालकृष्ण आडवाणी हयात आहेत आणि आणीबाणी काय होती हे सध्याच्या नवशिक्यांनी त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे," म्हणत भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

दरम्यान, सामनाच्या अग्रलेखाला भाजप आमदार आशिष शेलार यांनी तुमच्या अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागल्याचं म्हणजे पलटवार केला.

आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीचा मुद्दा काढत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

यासंबंधी दोन ट्वीट करत आशिष शेलार म्हणतात, "रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा. अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा. पण, एक मराठी कुटुंब उभे करून तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करून 'दिशा सालियान'बाबत बोलणाऱ्यांची तोंडं का बंद करता? बात और भी निकलेगी."

पुढच्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटं ठरवून आता एका 'सिंह' यांना 'परमवीर' का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका 'युवराज'ला वाचवायला महाराष्ट्राला खोटे ठरवताय? पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत."

एकूणच अर्णब गोस्वामी प्रकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये रंगलेला हा कलगीतुरा येत्या काळातही पाहायला मिळणार, अशी चिन्हं आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)