राज ठाकरे : मनसेचा वीजबिलाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा, 'शॉकसाठी तयार राहा'

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारविरोधात वीज बिलाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

ठाकरे सरकारचा निषेध करण्यासाठी 26 नोव्हेंबरला मनसेने राज्यभरात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेच्या वीजबिलाबाबतच्या भूमिकेवर बीबीसीशी बोलताना मनसे नेते बाळा नांदगावर यांनी म्हटलं, "राज्य सरकारने वीजबिलावरून घूमजाव केलं. लोकांना सरकारने दिलासा दिला नाही. त्यामुळे मनसेने राज्यभरात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 26 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता मनसे आंदोलन करेल. हा मोर्चा अत्यंत शांतपणे होईल. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल."

"मुंबईतील वांद्रेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल. या मोर्चात सामान्य नागरिकांचा सहभाग असणार आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता लोकांना सूचना देण्यात येतील, " असं ते पुढे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वाढीव बिलासंदर्भात ही भेट घेतल्याचं राज ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं.

"नागरिकांना मोठ्या रकमेची बिलं येत आहेत, लोक कुठून भरणार आहे. हा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कानावर घालणार आहोत," असंही राज यांनी या भेटीनंतर सांगितलं.

"वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे. तेव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती पक्षातर्फे करण्यात आली," असं मनसेनी सांगितलं.

राज्यपालांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी म्हटलं, "राज्यात अनेक प्रश्न आहेत पण त्यावर हे सरकार निर्णय घेताना दिसत नाहीये."

"लोकांच्या भावना लक्षात घेता सरकारनं एक-दोन दिवसांत निर्णय घ्यावा, असं मी राज्यपालांना सांगितलं आहे. पण, सध्या सरकार आणि राज्यपाल यांचं फारच सख्य असल्यामुळे निर्णय कधी होईल मला माहिती नाही, पण सरकारचे प्रमुख म्हणून मी राज्यपालांशी बोललो आहे."

"सरकारनं कोरोनाच्या बाबतीत सगळ्या गोष्टींचा विचार करून काय होणार काय नाही, ते सांगायला पाहिजे. लोकल, शेतकरी अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कमतरता नाही, निर्णयांची कमतरता आहे, ते घेतले जात नाहीयेत सरकार का कुंथत " असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

सरकारनं जनतेशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या 2 विषयांवर तातडीनं पावलं उचलायला हवीत, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लिहिलं होतं

राज्यपालांना दिलेल्या पत्रातील मनसेच्या 2 प्रमुख मागण्या -

1.दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था शेतकऱ्याला एका लिटरच्या मागे 17 ते 18 रुपये देतात. पण त्यावर स्वत: भरघोस नफा कमावतात. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, यामुळे शेतकरी आधीच गांजलेला असतो. त्यामुळे शेतकऱ्याला एका लीटरमागे किमान 27 ते 28 रुपये मिळायला हवे आणि यासाठी राज्य सरकारनं लक्ष घालायला हवे.

2.लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांना वाढीव वीजबिलं आली आहेत. आधीच उदरनिर्वाहाती साधनं बंद, त्यात मुंबईसारख्या ठिकाणी रेल्वे गेले 7 महिने बंद असल्यामुळे अनेकांनी रोजगार गमावला आहे. अशापरिस्थितीत विजबिलांनी दिलेला शॉक जबरदस्त आहे. ह्या संदर्भात माझे सहकारी वीजमंत्र्यांना भेटून आले, आम्ही आंदोलनं केली, पण सरकार अजूनही ह्यात मार्ग काढायला तयार नाही. सरकारनं वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढी रक्कम परत करायला हवी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)