You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वीज बिल माफ व्हावं या मागणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक का?
मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती. अनेकांची कामं, उद्योग ठप्प होते.
त्यामुळं या काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी होते आहे. यासाठी राज्यभर सरकारविरोधात संतप्त भावना आहेत.
कोरोना काळात वापरलेल्या विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी उर्जामंत्र्यांनी वीज बिल भरण्याचे आवाहन केल्याने सगळीकडे नाराजी व्यक्त होतेय.
लॉकडाऊन काळातील भरमसाठ वीजबिल आल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.
घरगुती वीज बिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये चक्क चौकातच भव्य होर्डिंग लावत सरकारला इशारा देण्यात आला आहे. 'वीज बिल भरणार नाही' कृती समितीने मिरजकर तिकटी चौकात हे होर्डिंग उभारले आहे. यावर सहा महिन्यांचे वीज बिल माफ करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
एवढंच नाही तर 'कोरोना काळातील वीज बिल मागणाऱ्या सरकारला, वीज कट करणाऱ्याला, जनतेवर जबरदस्ती करणाऱ्याला, खणखणीत झटका अस्सल कोल्हापूरी तेल लावलेले पायताण' असा मजकूर होर्डिंगवर आहे. कोल्हापूरी भाषेत हा इशारा देण्यात आल्याने सध्या या होर्डिंगची चर्चा सुरू आहे.
याबाबत बोलताना कृती समितीचे निवास साळोखे यांनी सांगितले की , सहा महिन्याचे बिल सरकारने भरावे. त्यासाठी जनतेवर सक्ती करु नये ही आमची मागणी आहे. आंदोलन उभारण्यात येणार आहे.
येत्या मंगळवारी (24 नोव्हेंबर) पुढील भूमिका जाहीर करण्यात येईल असं साळोखे यांनी सांगितल.
वीज जोडणी तोडायला आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देण्यात आला आहे. सरकारने या मागणीकडे लक्ष दिले नाही तर जनताच सरकारला जागा दाखवेल असं कृती समितीने म्हटलं आहे.
दरम्यान, सर्वपक्षीय कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशनने देखील या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली याबाबत वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये महावितरणच्या कार्यालयाला 'टाळे ठोको' आंदोलन करण्यात आलं.
गनिमी काव्याने या कार्यालयाला ठाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडत चार तास ठिय़्या आंदोलन करण्यात आल्याचं समितीचे सदस्य रमेश मोरे यांनी सागितलं. वारंवार निवेदनं देऊनही सरकार याबाबत कार्यवाही करत नसल्याने नाराजी व्यक्त होतेय.
याच समिती अंतर्गत अनेकदा आंदोलनं करण्यात आली आहेत. त्यामुळं राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. या साठी येत्या मंगळवारी इचलकरंजी तहसिल कार्यालायावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीजबिलांची होळी करत 'बोंबठोक आंदोलन' केलं होतं.
ही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)