You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महावितरण, अदानी, टाटा, बेस्ट कंपन्यांचं वीज बिल एवढं जास्त का आलंय?
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
'अरे बापरे! हे वीजबिल एवढं जास्त कसं आलंय?'
महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या घरात हा प्रश्न गेल्या काही दिवसांत विचारला गेला असेल. कारण गेल्या काही महिन्यांचं बिल एकत्रित लागून आल्यामुळे घरोघरी सध्या पंखा, फ्रिज, एसी सुरू करण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागतोय.
अभिनेत्री रेणुका शहाणे आणि तापसी पन्नू यांनी तर आपापली वीजबिलं ट्विटरवर टाकत वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना थेट जाब विचारला आहे. तुम्हीही तशी तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे केला असेलच.
त्यामुळे एकंदरच वीजबिलं एवढी का वाढून आली आहेत? त्यात काही गडबड झालीय का? आणि त्याची तक्रार कुठे आणि कशी करायची? या काही प्रश्नांची उत्तरं आपण शोधू या.
नेमक्या तक्रारी काय?
महाराष्ट्रात महावितरण ही प्रमुख वीजपुरवठा करणारी कंपनी आहे, त्याशिवाय मुंबई महानगर क्षेत्रात टाटा, अदानी, रिलायन्स आणि बेस्टतर्फे वीज पुरवठा होतो.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. अशात वाढून आलेल्या बिलांमुळे लोकांचा बीपीसुद्धा वाढू लागला आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्वीट करून यासंदर्भातली तक्रार अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML)कडे केली.
"मला 9 मे रोजी आलेल्या मेसेजनुसार बिल होतं 5,510. मग एका महिन्याने मे आणि जूनचं एकत्रित बिल आलं 29,700 रुपये. त्या बिलात मे महिन्याचं बिल 18,080 रुपये झालं होतं. असं कसं?"
तापसी पन्नूची सुद्धा अशीच काही तक्रार आहे.
सर्वसामान्यांच्या बिलांमध्ये देखील मोठे आकडे दिसून आल्यामुळे चिंता व्यक्त होतेय.
ट्विटरवरच रजनीश पांडे नावाच्या टाटा पावरच्या एका ग्राहकाने म्हंटलय की मला नेहमीपेक्षा दहापट बिल आलंय. "हे बिल भरलं तर जगणं कठीण होऊन बसेल," असं त्यांनी म्हटलंय.
तर काही जणांची वेगळीच समस्या आहे.
पुण्यात काम करणारे स्वप्नील वटारे हे लॉकडाऊन लागू होताच आपल्या गावी म्हणजेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला गेले. तेव्हापासून ते भाड्याने राहायचे, ते पुण्यातलं घर बंदच होतं. मात्र रीडिंग घेता न आल्यामुळे महावितरणने त्यांना सरासरी बिल पाठवलं, त्यामुळे घर बंद असताना, कुठलाही खप नसताना स्वप्नील यांना प्रत्येक महिन्याला 500 ते 650 रुपये बिल आलं.
बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "मी तक्रार केली तेव्हा महावितरणाच्या ऍपवर बिलाचा फोटो काढून टाका, असं मला सांगण्यात आलं. मात्र तो फोटो ज्या दिवशी मीटर रीडिंग घेणारी व्यक्ती येते, त्याच तारखेचा असावा, असं ते ऍप सांगतं. त्यामुळे ते शक्य झालं नाही आणि ती तारिख गेली. त्या अॅपचा फार काही उपयोगी नाही."
एवढी मोठी बिलं का आली?
कोरोना व्हायरसमुळे सुमारे मार्चच्या मध्यात लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे घरोघरी जाऊन रीडिंग घेणं शक्य नसल्यामुळे प्रशासनाने सूचना केल्या की डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीच्याच रीडिंगच्या आधारे मार्चचं आणि एप्रिल महिन्यांचं सरासरी बिल आकारलं जावं.
तसं बिल लोकांना आलंसुद्धा. मात्र मे महिन्याच्या बिलाचा चटका उन्हाळ्यापेक्षाही जास्त बसला. महावितरणकडे याबाबतीत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, हिवाळी महिन्यांमध्ये वीजेचा वापर तुलनेनं कमीच होतो, त्यामुळे तुम्हाला-आम्हाला मार्चचं आणि एप्रिलचं बिल हिवाळी महिन्यांच्याच सरासरीचं आलं.
त्याच दरम्यान, 1 एप्रिलपासून वीज नियामक आयोगाने वीज दरांमध्ये वाढ केली, ते वाढीव दर या बिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले.
जेव्हा जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल होताच, प्रत्यक्ष रीडिंग घेण्यास सुरुवात झाली. तेव्हा मार्च ते जून या दोन रीडिंगमधला फरक ओळखून, त्यातून मार्च आणि एप्रिलचं देण्यात आलेलं सरासरी बिल वजा करून जे रीडिंग आलं, ते आकारण्यात आल्याचं वीज कंपन्यांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमांनुसार हे करण्यात आल्याचं AEML तसंच महावितरणने स्वतंत्र निवदेनांद्वारे प्रसिद्ध केलं आहे.
याला आणखी एक कारण म्हणजे, लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडत नाहीयेत. उन्हाळा आणि त्याबरोबर आलेल्या उकाड्यामुळे लोकांना आपापल्या घरांमध्येच एसी किंवा पंख्याशिवाय राहाणं अशक्य झालं आहे. शिवाय टीव्ही किंवा इतर संसाधनांचा वापर वाढला आहे.
तसंच वर्क फ्रॉम होम करत असलेल्या लोकांचे लॅपटॉप आणि इंटरनेट सतत सुरू आहे, त्यामुळेदेखील बिल वाढण्याची शक्यता जास्त आहे, असा वीज मंडळांचा अंदाज आहे.
हे काही महिन्यांचं बिल एकत्रित दिसत असल्यामुळे मोठे आकडे दिसत आहेत, असंही कंपन्यांचं म्हणणं आहे. काही लोकांची तक्रार होती की दोन महिन्यांचे रीडिंग एकत्र केल्यामुळे ग्राहकांना वाढीव दराने बिल आलं आहे.
मात्र कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे की दोन महिन्यांचं बिल एकत्र असलं तरी दरांचे स्लॅब लावताना रीडिंग दर महिन्याने भागून मग लावण्यात आलं आहे.
बिलावरचं राजकारण
या वाढून आलेल्या बिलांच्या तक्रारींची दखल घेत विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
तर काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा लॉकडाऊनच्या तीन महिन्यांमध्ये आलेलं वीजबिल 50 टक्क्यांनी माफ करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
विशेष म्हणजे हा कारभार काँग्रेस नेते ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याच हाती आहे. यासंदर्भात एक निवेदन जारी करत त्यांनी स्पष्ट केलं की "कालपरवा आलेली ही बिलं एकरकमी भरण्याची तुमच्यावर सक्ती नाही. स्थानिक अभियंत्याशी चर्चा करून ती सुलभ हप्त्यात भरा. आम्ही तुमची मनगटे पिरगळणार नाही. आम्ही एक लोकाभिमुख सरकार आहोत, सावकार नाही!"
मात्र सुलभ हप्त्यांमध्ये बिलं भरण्याची "मखलाशी योग्य नाही, अन्यायकारक आहे," अशी टीका भाजपच्या आशिष शेलारांनी केली आहे.
ग्राहकांसाठी जाहीर केल्या सवलती
तर या वीजबिलांची घरबसल्या पडताळणी करण्यासाठी महावितरणने https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक दिलेली आहे. तुम्ही महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेऊ शकता, असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलंय.
"तसंच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचं वीजबिल गेलं असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल. काही ठिकाणी चुका घडल्याही असतील, पण ते प्रमाण अल्प आहे आणि त्यात सुधारणा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत," असंही ते म्हणाले.
याप्रकरणी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत नितीन राऊतांनी शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. तसंच काही सवलती जाहीर केल्या.
- त्यानुसार, जून 2020चं बिल तीन आठवड्यांमध्ये भरण्याची घरगुती ग्राहकांना मुदत देण्यात आली आहे.
- एकूण बिलाची कमीत कमी एक तृतीयांश रक्कम भरल्यास तुमचं कनेक्शन कापलं जाणार नाही.
- आणि जर तुम्ही संपूर्ण बिल भरलं तर दोन टक्क्यांची सूट दिली जाणार आहे.
- जर तुम्ही याआधीच संपूर्ण बिल भरलं असेल तर त्यांनाही हा लाभ मिळणार आहे.
- जे लॉकडाऊनमध्ये घरी गेले होते आणि वीजवापर एकदमच कमी असतानासुद्धा त्यांना रीडिंग घेता न आल्यामुळे सरासरी बिल आलं असेल, त्यांची बिलं दुरुस्ती करून देण्यात येईल, असंही राऊतांनी यावेळी सांगितलं.
"सर्व उपाययोजनांचा वापर करूनसुद्धा जर लोकांचं समाधान झालं नाही तर ग्राहक मला स्वतःहून संपर्क करू शकतात," असं नितीन राऊतांनी आज सांगितलं.
त्यांनी यावेळी स्वतःचा ईमेल आयडी आणि फोन नंबर दिले -
[email protected]+91-9833717777 | +91 9833567777
तसंच, जर तुम्ही बेस्टचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठीही काही विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ज्यांना लॉकडाऊनदरम्यान अंदाजे बिल देण्यात आलं होतं, त्यांना प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर एकूण देयक रकमेत असलेली तफावत परत मिळेल.
ज्यांना बिल कमी आले आहे, त्यांनाही प्रत्यक्ष रीडिंगच्या आधारे नवीन बिलं दिली जातील, असंही बेस्टने एक पत्रक जारी करून म्हटलं.
कोरोना व्हायरसचा संसर्ग असलेले रेड झोन वगळता सर्व भागांमध्ये नव्याने रीडिंग घेऊन ही प्रकरणं मार्गी लावली जातील, असं बेस्टने स्पष्ट केलं आहे.
याशिवाय, तुम्ही जर टाटा पावर, रिलायन्स किंवा AEMLचे ग्राहक असाल तर त्यांच्यात्यांच्या हेल्पलाईनवर बिल समजून घेऊ शकता किंवा तक्रार नोंदवू शकता. त्यांच्या ऍप्समध्येही काही समस्या असेल तर त्यांना सोशल मीडियावर टॅग करून तुम्ही बोलू शकता वा त्यांच्या ऑफिसेसना भेट देऊ शकता.
काही लोकांची मागणी आहे की मध्य प्रदेश सरकारप्रमाणे पहिल्या 100 युनिट्ससाठी फक्त 100 रुपये बिलासारखी एखादी योजना आणली जावी. तर काहींच्या मते दिल्ली सरकारप्रमाणे पहिले काही युनिट्स मोफत देण्याचीही योजना सरकारने आणावी.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)