You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नितीन गडकरी अधिकाऱ्यांवर संतापले, 'मला तुमचे अभिनंदन करायचीही लाज वाटते' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. नितीन गडकरी अधिकाऱ्यांना म्हणाले, 'मला तुमचं अभिनंदन करायचीही लाज वाटते'
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी बुधवारी (28 ऑक्टोबर) झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कामात झालेल्या ढिलाईमुळे अधिकारी वर्गावर संतापले. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.
"250 कोटी रुपयांचा हा प्रकल्प 2008 मध्ये निश्चित झाला होता. या प्रकल्पाचे टेंडर 2011 मध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर 9 वर्षांनंतर हा प्रकल्प पूर्ण झाला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन सरकारे आणि 8 चेअरमन लागले. विद्यमान चेअरमन आणि सदस्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. मात्र ज्या महान व्यक्तिमत्त्वांनी हे काम करण्यासाठी 2011 ते 2020 हा 9 वर्षांचा कालावधी लावला त्यांचे फोटो नक्कीच या कार्यालयात लावा. याच लोकांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यास 9 वर्षे लावली हे कळावे," असं गडकरी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "आपण अभिमानानं सांगत असतो की 80 हजार ते 1 लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षांत पूर्ण करणार आहोत. मग जर एवढ्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या मोठ्या कामाला फक्त तीन साडेतीन वर्ष लागणार असतील, तर या दोनशे कोटींच्या कामासाठी आपण दहा वर्षं घालवली. हे अभिनंदन करण्यासारखं आहे का?
"हे काम पूर्ण झालेलं बघण्यासाठी 3 सरकारं बदलली. हे पाहता मी तुमचं काय अभिनंदन करणार. मला तुमचं अभिनंदन करायचीही लाज वाटत आहे," असं नितीन गडकरी म्हणाले.
2. 'शिवसेना भगवा एकहाती फडकवणार, हे मी 30-35 वर्षांपासून ऐकतोय'
"महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीनं आतापासूनच तयारीला लागा," असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंगळवारी (27 ऑक्टोबर) रात्री जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
"कोणत्याही पक्षाचा प्रमुख हेच सांगत असतो. त्यात काही नवीन नाही. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले 30 ते 35 वर्ष ऐकतोय. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे. त्याच्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
3. अंबानी बंधूंची Z प्लस सुरक्षा रद्द करा, या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
मुकेश अंबानी आणि त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासहित त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणारी झेड प्लस सुरक्षा मागे घेण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
सुप्रीम कोर्टानं यावेळी उच्चस्तरीय सुरक्षा ज्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना दिली जावी, जे त्यासाठी पैसे मोजू शकतात त्यांना नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.
हिमांशू अगरवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने हिमांशू अगरवाल यांची अंबानी बंधूंची झेड प्लस सुरक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली होती.
अंबानी बंधू आपल्या सुरक्षेची व्यवस्था करु शकतात इतके श्रीमंत असताना राज्य सरकार जनतेच्या पैशांवर त्यांना सुरक्षा पुरवत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
4. सीरमची कोरोना लस डिसेंबरपर्यंत तयार असेल - अदर पुनावाला
भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठानं विकसित केलेल्या लशीचं उत्पादन करत आहे. 'कोव्हिशिल्ड' असं या लशीचं नाव आहे. भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल. 2021च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे 10 कोटी डोस बनून तयार होतील.
अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी दिली आहे. NDTVनं ही बातमी दिली आहे.
"कोव्हिशिल्ड लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते," असं पुनावाला यांनी म्हटलं आहे.
"यूकेनं तेथील डेटा शेयर केल्यानंतर आणि ही लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आम्ही पुढच्या 2 ते 3 आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे" असंही पुनावाला म्हणाले.
5. दिवाळीनिमित्त दररोज 1000 जादा एसटी बसेस
एसटी महामंडळानं दिवाळी सणानिमित्त 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज जवळपास 1 हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे.
या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असून, त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. असे देखील आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)